पाऊस का दूर पळतोय?

पाऊस का दूर पळतोय?

- राधिका बिवलकर

सध्या देशभरातील बहुतांश भागात मॉन्सून दिशाहीन झाल्याची बातमी आहे. विशेष म्हणजे पावसाने वेळेआधी अनेक राज्यांना गाठले, लोकांना भिजवले, वर्तमानपत्रात फोटो छापले, आकाशाकडे टक लावून बसलेल्या शेतकर्‍याच्या चेहर्‍यावरचा आनंदही पाहिला. पण आता काही आठवड्यातच विरला. पावसाची हुलकावणी ही नवीन बाब नाही.

दरवर्षी मॉन्सून भरटकत असतो. हवामान खात्याकडून त्याचा शोधही घेतला जातो, परंतु त्याच्या भविष्यवाणीवर फार कमी लोकांचा विश्वास बसतो. कोरोनापुढे सर्वांनीच हात टेकले आहेत. आता लहरी पावसामुळे महागाई भडकण्याची चिन्हे आहेत. हतबल जनतेला आधार मिळेल अशी मॉन्सूनकडून आशा होती, परंतु त्याने धोका दिला आहे.

हवामान खात्याने मॉन्सून वेळेपूर्वीच येण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर पाऊस दमदार होईल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे लोकांनी पाऊस, पूरापासून बचाव करण्यासाठी तयारीही केली. शेतकर्‍यानेही मशागतीची कामे पूर्ण केली. गावातील सावकारही कर्जवसुलीच्या शक्यतेने आनंदी झाला. व्यापारी वर्गातही खूशीची लहर आली. बाजारपेठेत वर्दळ वाढेल, अशी त्याची अपेक्षा होती आणि हा पाऊस दुप्पट फायदा मिळवून देईल, असे वाटू लागले. परंतु असे काही घडले नाही. मॉन्सून मात्र भरकटला.

प्रत्येकवेळी तो कोठेतरी लपून बसतो. त्याची मनधरणी करावी लागते. तरीही तो शेतकर्‍याचे समाधान करेलच असे नाही. अर्थात पावसाने आपली वर्दी दिली खरी, पण आता त्याने दडी मारली आहे. आता त्याने जोरदार बरसायला हवे. आता तो कोठे असेल आणि कोठून शोधून आणायचे हा एक प्रश्न आहे. प्रत्येकजण पावसाची वाट पाहत आहे. परंतु पावसाच्या अडचणी कोणीही जाणून घेतल्या नाहीत.

तो उष्णतेने पळतो. ही बाब सत्य आहे. त्याला उष्णता आवडत नाही. अर्थात ही गोष्ट कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? आपले शरिर जेव्हा उष्ण होऊ लागते, तेव्हा आपल्याला ताप आल्याचे जाणवते. आपण उपचारापोटी औषध घेतो आणि काही गोष्टीचे पथ्य पाळतो. पृथ्वीचेही असेच आहे.

प्रत्येकवेळी पृथ्वीवरचे तापमान वाढते. तिलाही ताप येतो. परंतु तिचा ताप दूर करण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. आता तिचा ताप वाढला आहे. संपूर्ण शरिर आग ओकत आहे. पण आपण तिला थंड करु शकत नाही. अशा उष्ण पृथ्वीपासून पाऊस मात्र पळ काढत आहे. त्यामुळे पाऊस पडण्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. दररोज आपल्याकडून कोणत्या ना कोणत्या चुका होतात आणि त्यामुळे पृथ्वीची हानी होते. धरती आपली माता आहे आणि आपण रोज तिच्यावर अत्याचार करतो. तिच्या गर्भातील संपूर्ण पाणी काढून घेतले. एवढे पाणी शोषूनही आपली तहान भागलेली नाही.

पृथ्वीमातेचे झाडावर विलक्षण प्रेम.पण आपण तिला काय दिले. झाडांची कत्तल करुन सिमेंटचे जंगल उभारले. तिला हिरवळ आवडते. परंतु आपण तिही नष्ट करुन टाकली. पृथ्वीचे तापमान कमी राहील, असे कोणतेही काम आपल्याकडून होत नाही. मग मॉन्सन भटकणार नाही तर आणखी काय होणार. शेवटी त्याचेही पृथ्वीमातेवर प्रेम आहे.

धरतीमातेला आवडणारे काम तो करत असतो. आपण एक रोपटेही लावले नाही, अपेक्षा मात्र झाडांच्या सावलीची. पृथ्वी आपल्याला शाप देत नसून ती वारंवार सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. पर्यावरण सांभाळण्याची वेळ निघून गेली आहे, परंतु जे काही राहिले आहे, ते वाचवण्याचा प्रयत्न करा, असे ती सतत सूचित करत असते. आपण वेळीच जागे झालो नाही तर काहीच वाचणार नाही. सर्वकाही नामशेष होईल. रडण्यासाठी अश्रू देखील नसतील. अश्रूंसाठी संवेदनशील असणे गरजेचे आहे. आपण तर संवेदनाहीन व्यक्ती झालो आहोत.

मॉन्सनच नाही तर संपूर्ण मनुष्यजात भरटकली आहे. मॉन्सून तर उशिरा येईल, पण तो आपले काम पूर्ण करुनच जाईल. पृथ्वीला थंड करण्याचा तो प्रयत्न करेल. परंतु मनुष्यप्राणी कधी मार्गावर येईल हे कोणास ठावूक. आपल्या पूर्वजांनी जे पराक्रम केले, त्यांच्या बळावर आपण जीवन जगण्याचे शिकलो. आपण हिरवीगार वनराई अनुभवली. नदी, नाले, ओढे, पर्वतरांगाचे निसर्गसौंदर्य अनुभवले. परंतु आपण पुढच्या पिढीला काय देत आहोत.

सिमेंटचे जंगल, ओसाड माळरान. वास्तविक मॉन्सूनच महागाईचे मोठे रुप आहे. पाऊस भरकटल्यास महागाई आणखी वाढेल.

त्यामुळे आपण महगाईसाठी तयार राहणे गरजेचे आहे. पावसाचे मन वळवा, महागाईला पळवा. पृथ्वीवरचे तापमान कमी झाल्यावरच मॉन्सून बरसेल. तापमान कमी करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. आपण पृथ्वीला वनराई बहाल करण्याचे वचन देत असाल तर सज्ज राहा, दमदार पावसाचे, हिरवी चादर ओढलेल्या पृथ्वीचे आणि चांगल्या माणसाच्या स्वागतासाठी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com