चीन भारताकडून आयात का वाढवतोय?

चीन भारताकडून आयात का वाढवतोय?

- ब्रिगेडियर हेमंत महाजन

भारताने चीनविरोधातील आपली कठोर भूमिका कायम ठेवत अलीकडेच आणखी काही चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. याखेरीज अन्यही अनेक मार्गांनी भारत चीनचा आर्थिक फटके देत आहे. यामुळे चीन बधणार नाही, असे अनेक तज्ज्ञांकडून सांगितले जात असले तरी याबाबत एक घडामोड विचारात घ्यावी लागेल.

अलीकडेच चीनने भारताच्या ऑईल सीड क्रशर सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशनकडे एरंडेलाच्या बियांच्या खरेदीबाबत विचारणा केली आहे. चीनला दक्षिण आशियामधील देशांकडून भारतापेक्षा स्वस्त दराने एरंडेल तेल मिळू शकते. असे असूनही चीन भारताकडून ते घेत आहे, हा भारताच्या दबावाचा परिणाम आहे का?

गेल्या वर्षीच्या दिवाळीत चीनने 40 हजार कोटी रूपयांचे साहित्य, फटाके, लाईटच्या माळा भारतीय बाजारात विकल्या होत्या. यावर्षी मात्र चीनकडून कोणतेही सामान विकत घ्यायचे नाही, असा एक निग्रह केला गेल्याने चीनला मोठा आर्थिक फटका बसलेला असू शकतो. विशेष म्हणजे, याविषयी भाष्य करताना चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने असे म्हटले आहे की, भारतीयांना त्यांचेच नुकसान होते आहे हे कळत नाही.

चीनी वस्तूंवर बहिष्कारामुळे त्यांना स्वस्तात वस्तू मिळणार नाहीत. भारताच्या आक्रमक लढाईमध्ये चीनचे उत्तर हे अतिशय मिळमिळीत आहे. चीन भारताबरोबर तीव्र आर्थिक लढाई करेल असे दिसत नाही. उलटपक्षी अलीकडेच एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे भारताच्या ऑईल सीड क्रशर सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन असोसिएशन यांना चीनने विचारणा केली की ते भारताकडून एरंडेलाच्या बिया मोठ्या प्रमाणात विकत घेऊ इच्छितात. यामुळे एरंडेल बियांच्या व्यापार्‍यांना आश्चर्य वाटले. चीन भारताकडून एरंडेल तेल विकत घेणारा देश आहे. परंतू ज्या प्रमाणात ते आता तेल विकत मागत आहेत ते आश्चर्यकारक आहे. कारण चीनला दक्षिण आशियामधील देशाांकडून भारतापेक्षा स्वस्त दराने एरंडेल तेल मिळू शकते. असे असूनही चीन भारताकडून ते का विकत घेतो आहे? आज भारत-चीन सीमेवर लष्करी तणाव आहे.

भारत चीनविरूद्ध महत्त्वाची पावले उचलत आहे. त्यावरून भारत ऑलआऊट लढाई करण्याच्या मनःस्थितीत आहे. क्वाडची स्थापना, मलबार सराव अभ्यास, अमेरिकेच्या मंत्र्याची भारत भेट आदी घडामोडी होत असताना भारताविरोधात आर्थिक लढाईत उतरण्यापेक्षा भारताकडून मोठ्या प्रमाणात एरंडेल तेल विकत घ्यायचा प्रस्ताव चीनने का दिला आहे?

चीनची ही विनंती आल्यानंतर काही तज्ज्ञांना असे वाटते की चीन मोठ्या प्रमाणात एरंडेल तेल गोळा करून ठेवत आहे, जे त्यांच्या प्रत्यक्ष गरजेपेक्षा अधिक आहे. हिवाळ्यानंतर चीन मोठ्या प्रमाणात लढाई सुरू करू शकतो का अशी शंका व्यक्त केली जाते आहे. पण तूर्त तरी तशी शक्यता वाटत नाही. कारण एरंडेल तेल फार काही विशेष तेल नाही. इतर देशांकडून इतर प्रकारची तेले विकत घेता येतात. परंतु हे तेल भारताकडूनच का विकत घेतले जाते आहे. कारण चीन ऑस्ट्रेलियाकडून विकत घेतल्या जाणार्‍या शेतीच्या सामानावर निर्बंध लावत आहे. त्याशिवाय इतर देश जे चीनच्या विरोधात जात आहेत, त्या देशांकडून विकत घेतल्या जाणार्‍या शेतीमालावर चीनने निर्बंध लावले आहेत. अशा वेळी चीनमध्ये शेतीमालाची महागाई 15 ते 20 टक्क्यांनी वाढली आहे.

चीनमध्ये अन्नसंकटही निर्माण झालेले आहे. भारताचा विचार करता आपण चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालणे असो, थेट परकीय गुंतवणूक थांबवणं असो की चिनी कंपन्यांना रस्ते निर्मिती कंत्राटातून बाहेर काढणे असो, अशा विविध मार्गांनी चीनचे आर्थिक व्यवरहार भारतात वाढवण्याची क्षमता कमी करतो आहोत. चीन मात्र उलट करतो आहे. गेल्या तीन महिन्यात चीनने भारताकडून 20 मिलिअन टन एवढे आयर्नोड विकत घेतले आहेत. ते गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा खूपच जास्त आहेत. एवढेच नव्हे तर ऑस्ट्रेलियाकडून आयनोड विकत घेणे थांबवले आहे. याशिवाय भारताकडून इतर छोट्या गोष्टीही चीन विकत घेतो आहे. साहजिच, याचा परिणाम भारत-चीन यांच्या व्यापारादरम्यानची तूट कमी होण्यावर होऊ शकतो.

आजवरची स्थिती पाहिली असता चीनकडून भारताला होणारी निर्यात अधिक होती. प्रचंड मोठ्या प्रमाणावर वस्तू आणि माल चीनमधून भारतीय बाजारपेठेत येत होता. मात्र दुसर्‍या बाजूला चीनची भारताकडून केली जाणारी आयात ही खूप कमी होती. पण गेल्या सहा महिन्यांत ही तफावत 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. ही बाब भारताच्या दृष्टीने निश्चितच चांगली आहे. याचा अर्थ लावायचा तर चीनच्या वर्तमानपत्रातून भारताविरोधात जी आक्रमक भाषा वापरली जायची, ती कमी होताना दिसते. आज अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांनंतर विजयी झालेल्या जो बायडेन यांच्या सरकारच्या चीनविषयक धोरणाचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जी एक प्रकारची लढाई सुरू आहे त्याची तीव्रता कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. असे असताना चीन पुन्हा एकदा वुहान स्पिरिटचा वापर करून भारताशी मैत्री कऱण्याच्या प्रयत्नात आहे का असा प्रश्न पडतो. यासाठी आर्थिक ताकदीचा वापर करून भारत आणि चीन यांच्यातील व्यापारातील तूट कमी करत आहे का, अशी शंकाही येते. या माध्यमातून चीन भारताला खूष करण्याच्या प्रयत्न करत आहे का, याचा सांगोपांग विचार करणे गरजेचे आहे.

या प्रश्नांचा विचार करतानाच, राष्ट्रीय हित लक्षात ठेवून चीनने भारताकडून वस्तू खरेदी करत राहाण्यात आपलाच फायदा आहे. अर्थात हे घडत असताना चिनी वस्तूंना भारतीय बाजारपेठेत शिरकाव करू देऊ नये. कारण यामुळे आपले चीनवरचे अवलंबित्व वाढत आहे. ही लढाई अनेक वर्षे सुरू राहाणार आहे. त्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या वस्तुंवर चीनवरील अवलंबित्त्व टप्प्याटप्प्याने कमी करत जावे लागणार आहे.

तसे झाले तर चीनला भारताच्या बाजारपेठेवर ताबा मिळवता येणार नाही. चीनने जर सीमावाद थांबवून, भारताविरोधातील इतर पातळ्यांवरील लढाई थांबवली तर आपण व्यापार्‍याबाबतच्या धोरणावर पुनर्विचार करू शकतो. पण त्याआधी भारताविरोधातील 365 दिवस चालणार्‍या हायब्रीड युद्धाला प्रत्युत्तर देणे महत्त्वाचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com