मनपाकडून प्रशिक्षणाचा शुभारंभ कधी?

मनपाकडून प्रशिक्षणाचा शुभारंभ कधी?

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) महिला व बालकल्याण समितीच्या (Women and Child Welfare Committee) माध्यमातून शहरातील महिलांसाठी विविध प्रकारचे कोर्स सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी सुमारे 7 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याची तरतूद देखील करण्यात आली मी आहे तर याबाबतची प्रक्रिया पूर्ण होऊन सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे, तरी अद्याप प्रशिक्षण (Training) सुरू झालेले नाही. महिलांसाठी मोठमोठ्या घोषणा करणार्‍या राजकीय पक्षांनी अशा कामांमध्ये विशेष लक्ष देऊन महिलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रशिक्षण सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.

मध्यंतरी प्रशिक्षणाचा ठेका देण्यावरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) दोन गटांमध्ये चुरस निर्माण झाल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे स्थायी समितीची मुदत संपली असून महापौरांसह सर्व नगरसेवक यांची मुदत चालू महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात संपणार आहे. असे असतानाही महिला प्रशिक्षण सुरू झालेले नाही. यामुळे महिलांचे एक प्रकारे नुकसान होत आहे.

नाशिक शहरातील सहा विभागात हे प्रशिक्षण सुरू होणार होते. यासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती भामरे (Chairperson of Women and Child Welfare Committee Swati Bhamre) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) प्रभाग 14 च्या नगरसेविका समीना मेमन (Corporator Samina Memon) यांच्यासह सर्व सदस्यांनी मोठ्याप्रमाणात पाठपुरावा केला आहे.

शहरातील गोरगरीब तसेच कमी शिक्षित महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महापालिकेच्यावतीने ब्युटी पार्लर कोर्स (Beauty parlor course), शिलाई मशीन कोर्स (Sewing machine course), डिझायनिंग कोर्स (Designing course), हॉटेल कोर्स आदी मोफत शिकवण्यात येणार होते. यामुळे हजारो महिलांच्या हाताला काम मिळाला असता, मात्र मागील तीन वर्षापासून याबाबतची प्रक्रिया लालफितीत अडकल्याचे दिसत आहे. वेळोवेळी महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांनी याबाबत पाठपुरावा केला. अनेक वेळा आंदोलनाचे (agitation) देखील इशारा देण्यात आला होता, तरीही प्रशासनाने आपली कासव चाल सुरू ठेवली होती. तर अंतर्गत राजकारणाचा फटका देखील बसल्याची चर्चा आहे.

सहा महिन्यांपूर्वी याबाबत निविदा प्रक्रिया (Tender process) या पूर्ण करण्यात आली होती. तर अंतिम निर्णय झाला होता, मात्र भारतीय जनता पक्षाच्या (bjp) एका गटाने त्याला विरोध केल्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा थांबली होती, अशी चर्चा सुरू होती. दरम्यान प्रशिक्षणासाठी ठेवलेल्या निकषांमध्ये बदल करण्यात यावे, अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत नगरसेविका समीना मेमन यांनी वारंवार केली आहे. याबाबत स्थायी समितीचे सभापती गणेश गीते (Standing Committee Chairman Ganesh Gite) यांनी देखील प्रशासनाला आदेश देत शिक्षणाची अट बारावी पासून कमी करून आठवी पर्यंत ठेवण्याचे आदेश दिले होते,

त्याचप्रमाणे सर्व महिलांसाठी हे प्रशिक्षण खुले ठेवण्यात यावे, याबाबत कोणत्याही प्रकारचे आरक्षण ठेवण्यात येऊ नये तर वयाची अट देखील कमी करण्याची सूचना सभापती यांनी केली होती. तरीही प्रशासनाने याबाबत शिथिलता दिले नसल्याचे समजते. त्यामुळे महापालिका महिला बालकल्याण समितीचा हेतू जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचण्याचा आहे, तो अशा कडक निकषांमुळे पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com