माणसाचे कमाल आयुर्मान किती?

माणसाचे कमाल आयुर्मान किती?

- प्रा. विजया पंडित

पौराणिक ग्रंथांमध्ये आणि कथांमध्ये अशा काही पात्रांचा उल्लेख येतो, ज्यांचे आयुर्मान खूप मोठे असल्याचे सांगितले जाते. आपल्याला अनेकदा आपल्या भोवतालीही वयाची शंभरी ओलांडणारी माणसे दिसतात. माणसाचे कमाल आयुर्मान किती असते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न विज्ञानानेही नेहमी केला आहे. परंतु माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो, याविषयी शास्त्रज्ञ एकमताने कोणतेही विधान करत नाहीत.

माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो? हा काही आजच पडलेला नवा प्रश्न नाही. केवळ शास्त्रज्ञच नव्हे तर जिज्ञासू लोकांनाही अनेक वर्षे हा प्रश्न सतावतो आहे. हा प्रश्न आपल्या मनात सतत घोळत राहण्यामागे आणखीही एक कारण आहे. जुन्या काळात लोक आजच्यापेक्षा कितीतरी अधिक वर्षे जगत होते, असे आपण ऐकलेले आहे. अर्थात त्याचे लेखी पुरावे, दस्तावेज उपलब्ध नाहीत. परंतु जगातील बहुतेक सर्वच समुदायांमध्ये पूर्वीच्या काळी लोक अधिक काळ जगत होते, असे सांगणार्‍या कहाण्या सांगितल्या जातात. विशेषतः आपल्या देशात तर अशा कहाण्या जरा जास्तच ऐकायला मिळतात.

आपल्याकडे काही संतमहात्मे शेकडो वर्षे जगले असे मानले जाते. आजच्या काळाचा विचार केल्यास वाराणसीचे (उत्तर प्रदेश) स्वामी शिवानंद यांच्या बाबतीत असे मानले जाते की, त्यांनी वयाची १२५ वर्षे पूर्ण केली आहेत. काही दिवसांपूर्वी म्हणजे मार्च २०२१ मध्ये स्वामीजी वाराणसीहून गोरखपूरला गेले होते. त्यावेळी माध्यमांत अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की, स्वामीजींचे नाव जगातील सर्वाधिक आयुर्मान असलेली जीवित व्यक्ती म्हणून गिनीज बुकात नोंदविले जावे, यासाठी त्यांचे शिष्य प्रयत्नशील आहेत. कारण स्वामीजींच्या वयाचा लेखी दस्तावेजही आहे.

वास्तविक त्यांच्या पासपोर्टवर त्यांची जन्मतारीख ८ ऑगस्ट १८९६ अशी नोंदविली गेली आहे. परंतु पासपोर्टवर नोंदविलेल्या या जन्मतारखेला आधार काय, हे मात्र ठाऊक नाही. परंतु त्यांचे हे वय बरोबर असल्यास ते खरोखर जगातील सर्वांत अधिक वय असलेले जीवित व्यक्ती आहेत. असे असल्यास त्यांनी १२२ व्या वर्षी गिनीज बुकमध्ये नोंद करणार्‍या फ्रान्सच्या जीन कालमे या महिलेचा विक्रमही मोडला आहे.

एखादा माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो, यावर जगभरात सातत्याने संशोधन सुरू असते. मॉन्ट्रियल (कॅनडा) येथील मॅक्गिल विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञांच्या एका चमूने या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी अनेक वर्षे संशोधन केले आहे. त्यांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, आतापर्यंत जेवढे संशोधन झाले आहे, त्यावरून माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो, हे नेमकेपणाने सांगणे अवघड आहे. परंतु या संशोधनाचे नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ सिग्फेड हेकीमी यांच्या म्हणण्यानुसार, १९६८ नंतर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान या देशांमध्ये सर्वाधिक जगणार्या व्यक्तींवर नजर ठेवण्यात आली आणि हजारो व्यक्तींच्या वयासंबंधीची आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. त्यातून असा निष्कर्ष निघतो की, माणूस जास्तीत जास्त ११५ वर्षे जगू शकतो. मॉन्ट्रियल येथील मॅक्गिल विद्यापीठाचे हे संशोधन २०१७ मध्ये ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते आणि त्यावर जगभरात खूप चर्चा झाली होती, हे येथे उल्लेखनीय आहे.

या चर्चेचे कारणच मुळात असे होते की, जास्तीत जास्त जगण्याविषयीच्या वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या कहाण्या सांगितल्या जातात. परंतु प्राप्त नोंदींनुसार फ्रान्सच्या जीन कालमे याच जगात सर्वाधिक वर्षे जगलेल्या महिला आहेत. १९९७ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा त्या १२२ वर्षांच्या होत्या.

मॅक्गिल विद्यापीठाच्या संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांनी एक आश्चर्यचकित करणारा निष्कर्ष असा काढला आहे की, जे लोक आज ११० वर्षांचे असून जीवित आहेत, ते आणखी जगण्याची शक्यता १९७० च्या दशकात जेवढी होती, तेवढीच आजही आहे. याचा अर्थ असा की, जीवन आणखी सुखद बनविणारी औषधे आणि अन्य सहायक सामग्री यामुळे आयुष्य वाढतच जाईल.

या संशोधनाचा निष्कर्ष शब्दबद्ध करण्यासाठी मदत करणारे अल्बर्ट आइन्स्टाइन कॉलेज ऑफ मेडिसिनचे मॉलिक्यूलर जेनेटिसिस्ट ब्रँडन मिल्होलँड यांच्या म्हणण्यानुसार, माणूस १२५ वर्षे जगण्याची शक्यता दहा हजारांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असते.

मिल्होलँड यांच्या मते, माणसांचे सरासरी आयुर्मान वाढत आहे हे खरे असले तरी महत्तम आयुर्मर्यादा नेहमीच वाढू शकणार नाही. त्याला एक विशिष्ट सीमा आहे. एकोणिसाव्या शतकापासून आतापर्यंत सरासरी आयुर्मानात खूपच वाढ झाली आहे. चांगल्या लशी, अँटीबायोटिक औषधे, कर्करोगासारख्या घातक आजारांवरील उपचार आणि खाण्यापिण्याविषयी समाजात आलेली जागरूकता ही त्यामागील कारणे आहेत.

परंतु वयोमान वाढण्याची ही प्रक्रिया एकसारखी वाढत जाणार नाही. कारण एका मर्यादेनंतर माणसाच्या पेशी निष्क्रिय होण्यास सुरुवात होते आणि माणसाच्या आयुष्याला पूर्णविराम मिळतो. त्याचबरोबर असेही पाहायला मिळाले आहे की, जे लोक खूप चांगल्या प्रकारचे जीवन जगतात, आरोग्याच्या बाबतीत कधीच चालढकल करत नाहीत, अशा व्यक्तींचे शरीरसुद्धा ११० वर्षांनंतर हळूहळू क्षीणच होते. अशा रीतीने विज्ञान ११५ वर्षांचे महत्तम आयुष्य मानते.

विज्ञानाच्या दुनियेत माणसाच्या आयुष्याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये एकमत नाही. इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एजिंग, कॅलिफोर्निया आणि चीनमधील नानजिंग विद्यापीठ येथील शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे एक संशोधन केले होते आणि त्याचे निष्कर्ष ‘सेल रिपोर्ट्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या मते माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य ४०० ते ५०० वर्षे यादरम्यान असू शकते. या संशोधनाशी निगडीत शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढण्यामागे जो आधार होता तो म्हणजे त्यांनीच शोधून काढलेला ‘सिनर्जिस्टिक सेलुलर पाथवे’ होय. यामुळे माणसाचे आयुष्य ५०० वर्षांपर्यंत वाढू शकते.

या शास्त्रज्ञांनी सी एलिगेन्स नावाच्या कीटकाच्या जीवनकाळात पाचपट वाढ करण्यात यश मिळविले होते. याच आधारावर माणसाच्या जीवनकालातही ४०० ते ५०० टक्के वृद्धी होऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. याच अंदाजानुसार, माणूस ४०० ते ५०० वर्षे जिवंत राहू शकतो, असे म्हटले जात आहे. सांगण्याचा मुद्दा असा की, माणसाचे वय जास्तीत जास्त किती असू शकते, म्हणजेच एखादी व्यक्ती जास्तीत जास्त किती जगू शकते, या बाबतीत सध्या कोणताही ठोस आकडा देता येत नसला तरी माणसाचे सरासरी आयुर्मान गेल्या काही दशकांत वाढतच गेले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com