Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedजॅक मा यांचे काय झाले..?

जॅक मा यांचे काय झाले..?

– अभिजित कुलकर्णी, उद्योगजगताचे अभ्यासक

जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये ज्यांची गणना होते, असे अलिबाबा ग्रुपचे प्रमुख जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्याविषयी चीनमधील जनभावनाही बदलली असून, त्यांच्याविषयी तिरस्कार व्यक्त होत आहे.

- Advertisement -

जॅक मा यांनी चीनच्या नियामक यंत्रणेवर आणि चिनी बँकांवर टीका केली होती. चीनमध्ये बहुतांश बँका सरकारी असल्यामुळे ही थेट सरकारवरील टीका मानली जाणे शक्य आहे. गेल्या दोन महिन्यांत जॅक मा यांच्या संपत्तीतही 11 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि अलिबाबा या ई-कॉमर्स कंपनीचे मालक जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. ही माहिती उशिरा उघड झाली असली, तरी नोव्हेंबरपासून त्यांना कोणीच पाहिलेले नाही. त्यांच्या गायब होण्याच्या घटनेवरून तर्कवितर्क लढविले जात आहेत. विशेष म्हणजे, चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला होता, त्यामुळे संशयाचे धुके आणखी गडद झाले आहे. चीनच्या कम्युनिस्ट राज्यकर्त्यांविरुद्ध आवाज उठविल्यानंतर कुणालाच न दिसलेल्या अनेक व्यक्ती आहेत.

अनेक ‘हाय प्रोफाइल’ लोक अशा प्रकारे गायब झाले आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी 2013 मध्ये सत्तासूत्रे हाती घेतल्यापासून आपल्या सोयीनुसार कायदे बदलले. मनमानी आणि गुप्त प्रतिबंध कायदेशीर घोषित करण्याचा तुघलकी कायदा त्यांनी आणला. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या नावाखाली कैद्यांच्या हक्कांची पायमल्ली करण्यासाठीही अशा कायद्यांचा दुरुपयोग होऊ शकतो. गेल्या काही महिन्यांत या कायद्यांची अंमलबजावणी धडाक्यात करण्यात आली. चित्रपट अभिनेत्री फॅन बिंगबिंग आणि जनुक बदलांच्या क्षेत्रातील शास्त्रज्ञ जियानकुई अशा व्यक्ती अचानक बेपत्ता होणे हा याच कायद्याचा परिपाक असल्याचे मानले जाते.

नव्या कायद्याची झळ बसलेल्यांची संख्या गोपनीयतेमुळे चपखलपणे सांगता येत नसली तरी ती शेकड्यांमध्ये असावी, असा अंदाज चीनमधील संशोधक आणि ‘द पीपल्स रिपब्लिक ऑफ डिसेपर्ड’ या पुस्तकाचे लेखक मायकेल केस्टर यांनी बांधला आहे. याखेरीज दहा लाख उइगर मुस्लिम आणि अल्पसंख्यांक समूहांचे सदस्यही यात सामील असू शकतात, अशी शक्यता व्यक्त करून त्यांनी सांगितले की, लोकांना काही आठवड्यांसाठी, महिन्यांसाठी किंवा प्रदीर्घकाळ तुरुंगात डांबले जाऊ शकते. कधी-कधी तर अशी माणसे परत येतच नाहीत. बहुतांश लोकांना कैदेत असताना शारीरिक आणि मानसिक यातनांचा सामना करावा लागतो.

गेल्या वर्षी अनेक ‘हाय प्रोफाइल’ लोक अचानक गायब झाले असून, आता ते कुठे आहेत, हे कुणालाच सांगता येत नाही. अभिनेत्री फॅन बिंगबिंग ही चीनमधील सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री असून, तिने कथितरीत्या करचोरी केल्याप्रकरणी अधिकार्‍यांनी तिला गेल्या वर्षी जूनमध्ये ताब्यात घेतले होते. शंभर दिवसांहून अधिक काळ बिंगबिंगचा ठावठिकाणा लागला नाही. ‘वीबो’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ती ऑक्टोबरमध्ये आली आणि काही चित्रपटांसाठी आणि अन्य प्रकल्पांसाठी आपण ‘स्पिट कॉन्ट्रॅक्ट’ केल्याचे कबूल करून तिने देशाची माफी मागितली. त्यानंतर ती ‘लो प्रोफाइल’ राहू लागली. तिची कंपनी बीजिंगमध्ये असून, क्वचितप्रसंगी ती तेथे दिसते.

कॅनडामधील हुआवेई या चिनी दूरसंचार कंपनीच्या प्रमुख वित्तीय अधिकारी मेंग वानझू यांना अटक केल्यानंतर मायकेल स्पॉवर हे उद्योजक आणि माजी राजनैतिक अधिकारी मायकेल कोवृग यांनाही पाठोपाठ ताब्यात घेण्यात आले होते. वानझू यांची अटक आणि स्पॉवर तसेच कोवृग यांना ताब्यात घेण्याच्या घटनेत कोणताही संबंध दिसून येत नाही, असे कॅनडा सरकारने अनेकदा सांगितले. कॅनडाच्या नागरिक असलेल्या सारा मॅकिव्हर यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. सध्या कोवृग आणि स्पॉवर नजरकैदेत आहेत. मॅकिव्हर यांना मागील आठवड्यात सोडून देण्यात आले. चिनी शास्त्रज्ञ जियानकुई यांना तर नोव्हेंबरपासून कोणीही पाहिलेले नाही.

इंटरपोलचे माजी अध्यक्ष मेंग होंगवेई हे पत्नी आणि मुलांसह फ्रान्समध्ये राहत होते. सप्टेंबरमध्ये ते चीनमध्ये परतले होते. सार्वजनिक सुरक्षितता या खात्याचे ते उपमंत्रीही होते. मात्र 29 सप्टेंबरला ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने दिली. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी जॅक मा गायब झाल्यामुळे या प्रकारांमागील गूढ वाढले आहे.

चीनमधील वित्तीय नियामक यंत्रणा आणि बँकांवर जॅक मा यांनी सार्वजनिकरीत्या टीका केली होती. त्यांच्यावर चीन सरकारने केलेल्या कारवाईनंतर गेल्या दोन महिन्यांत जॅक मा यांची संपत्ती 11 अब्ज डॉलरनी घटली आहे. वस्तुतः चीनमधील वित्तीय नियामक यंत्रणा कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही, यासाठी त्यांनी या यंत्रणेवर टीका केली होती. चिनी बँका व्याजाला चटावलेल्या शेठजींसारख्या आहेत, असेही त्यांनी म्हटले होते. चिनी बँका तारण घेतल्याखेरीज कोणतेही कर्ज देत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

चीनमधील बहुतांश बँका सरकारी आहेत, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळेच बँकांच्या विरोधात केलेले वक्तव्य थेट सरकारच्या विरोधातील वक्तव्य मानले जाण्याची शक्यताच अधिक आहे. जॅक मा यांची अलिबाबा ही ई-कॉमर्स कंपनी आणि तिचा वित्तीय कारभार सांभाळणारी शाखा म्हणजेच एन्ट ग्रुपवर चीन सरकारने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईवरून जगभरात उलटसुलट चर्चा केली जात आहेत. दुसरीकडे, चीनमधील बाजाराचे नियमन करणार्‍या यंत्रणेचे म्हणणे असे आहे की, बाजारात मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न जॅक मा यांनी केल्यामुळेच त्यांच्या कंपनीवर कारवाई होत आहे. चीन सरकारच्या कारवाईमुळे कंपन्यांमध्ये अशी काही भीतीची लाट पसरली, की केवळ दोनच दिवसांत चीनच्या बड्या कंपन्यांचे 15 लाख कोटी रुपये एवढे नुकसान झाले. जॅक मा यांच्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने केल्याचा जाणकारांचा कयास आहे.

एका अहवालानुसार, कोरोनाचे संकट असतानासुद्धा जॅक मा यांची संपत्ती 45 टक्क्यांनी वाढली होती. सरकारी कारवाईनंतर मात्र ही संपत्ती 11 अब्ज डॉलरनी घटली. जॅक मा हे ई-कॉमर्स क्षेत्रातील बादशहा मानले जातात आणि यावर्षी त्यांच्या संपत्तीत मोठी भर पडल्याने त्यांची एकूण संपत्ती 61.7 अब्ज डॉलरवर पोहोचली होती. आता ती 50.9 अब्ज डॉलरवर आली आहे. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत जगातील 500 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील जॅक मा यांचे स्थान घसरून 25 वर पोहोचले आहे. त्यांच्याविषयी चीनमधील जनभावनाही बदलली असून, त्यांच्याविषयी तिरस्कार व्यक्त होत आहे.

चीन सरकारने जॅक मा यांना कमकुवत करण्यासाठी एन्ट ग्रुपचे शेअर बाजारात होणारे लिस्टिंग रोखले होते. हा निर्णय घेण्यापूर्वी एन्ट ग्रुपचे मूल्य 316 अब्ज डॉलर होते. एन्ट ग्रुपच्या आयपीओला (इनिशियल पब्लिक ऑफर) चांगलाच प्रतिसाद मिळत होता. चीनच्या नियामक यंत्रणेने लिस्टिंग रोखले आणि सांगितले की एन्ट ग्रुपने आपल्या कारभारात सुधारणा करणे आवश्यक आहे. एन्ट ग्रुप ही जगातील सर्वांत मोठी फायनॅन्शियल टेक्नॉलॉजी कंपनी मानली जाते. तथापि, एन्ट ग्रुपने व्यवस्थापन यंत्रणा कमकुवत आहे, असा आक्षेप चीनच्या नियामक यंत्रणेने घेतला. तसेच या ग्रुपने नियामकीय नियमांचा भंग केला आहे असेही सांगितले. कंपनीने बाजारातील आपल्या स्थानाचा वापर आपल्या प्रतिस्पर्ध्यांना बाहेर काढण्यासाठी केला असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या कारणामुळे ग्राहकांच्या अधिकारांना आणि हिताला बाधा पोहोचली असल्याचा आक्षेप घेतला गेला आहे.

24 ऑक्टोबर रोजी जॅक मा यांनी एका व्यापारी संमेलनात चीनच्या नियामक यंत्रणेवर टीका केली होती. चिनी बँकांची मानसिकताही योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. अलिबाबा ही चीनमधील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आता त्यांनी चीनमधील सर्वांत मोठी बँक उभी करण्याचे स्वप्नही एन्ट ग्रुपच्या रूपाने साकार केले होते. त्यांच्यावर झालेली कारवाई आणि त्यामुळे त्यांच्या संपत्तीत झालेली घसरण हा घटनाक्रम पाहता चीनच्या सरकारविरोधात बोलल्यामुळेच त्यांच्यावर ही आफत ओढावली असे म्हणता येते.

सरकारविरोधात बोलणार्‍यांची नेहमीच चीनमध्ये अशी गत होते. 2017 मध्ये अब्जाधीश फायनान्सर शियान जियानहुआ यांना हाँगकाँग येथील एका हॉटेलमधून चीनमध्ये आणण्यात आले होते. या घटनेची अधिकृत माहितीसुद्धा कुणाला नव्हती. परंतु त्यांना तीन वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले, असे सांगण्यात येते. कोरोना विषाणूच्या संदर्भाने सर्वप्रथम इशारा देणारे डॉक्टर ली वेन्लियांग यांच्याही विरोधात सरकारविरोधात कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 31 डिसेंबर 2019 रोजी वीचॅटवर त्यांनी चीनमधील लोकांना विषाणूबाबत इशारा दिला होता. त्यावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. नंतर ते स्वतःच कोरोना विषाणूला बळी पडले. अशा स्थितीत जगभरातील कोट्यवधी लोकांचे प्रेरणास्थान असलेल्या जॅक मा यांच्यावरील कारवाईने जगाला आणखी एक हादरा बसला असून, जॅक मा बेपत्ता असल्यामुळे काळजीचा सूरही उमटत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या