स्वागतार्ह पुढाकार

स्वागतार्ह पुढाकार

- सुभाषिनी अली,

माजी खासदार

उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी 40 टक्के तिकीट महिलांना देणार असल्याची घोषणा केली. एवढेच नाही तर हे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आपली तयारी होती, असेही त्या म्हणाल्या. अनेकांनी काँग्रेस पक्षाच्या निर्णयाचे स्वागत केले असून या निर्णयामुळे महिलांचा राजकीय व्यवस्थेत आणखी सहभाग वाढेल, असा आशावाद व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे महिलांना निवडणूक लढवण्याच्या अधिकारावरून होणार्‍या चर्चेला बर्‍याच काळानंतर फुंकर घातली आहे.

कोणत्याही लोकशाही व्यवस्थेला प्रभावशाली आणि अर्थपूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा समावेश करणे आणि त्यास प्रतिनिधीत्व देणे गरजेचे आहे. समाजात आजही असे अनेक घटक आहेत, की त्यांना पुरेशा प्रमाणात अधिकार आणि प्रतिनिधित्व बहाल केले जात नाही. सध्या आपण प्रत्येक निवडणुकीत एक गोष्ट प्रकर्षाने पाहतो की, मतदानाच्या रांगेत आणि जिंकणार्‍यांत अल्पसंख्याक समुदायातील लोकांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे अब्जाधीश आणि कोट्याधीशांची संख्या वाढत असून मजूर आणि शेतकरी कुटुंबाची संख्या ही कमी म्हणजेच असून नसल्यासारखी राहत आहे. विशेष म्हणजे देशातील निम्मा भाग म्हणजे महिलावर्ग हा लोकसभा आणि विधानसभेत नगण्य रुपातूनच दिसतो. याचाच अर्थ आपली लोकशाही व्यवस्था संकुचित होत असून त्यावर पुरुषांचे राज्य वाढत असल्याचे दिसून येते. ही गोष्ट लोकशाही व्यवस्थेला हानीकारक असून त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

यादृष्टीने महिलांच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे पाहणे गरजेचे आहे. कोणत्याही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत निवडून येणार्‍या महिलांची संख्या ही पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक राहिली नाही. याचाच अर्थ असा महिलांना लोकशाही अधिकारापासून, प्रतिनिधीत्व करण्याच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात आहे. 1996 मध्ये म्हणजेच 25 वर्षांपूर्वी विधानसभा आणि लोकसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्यासाठी लोकसभेत विधेयक आणले होते. तेव्हापासून ते आजतागायत विधेयक मंजूर होऊ शकलेले नाही. यामागे पुरुषप्रधान विचारसरणीशिवाय अन्य कोणतेही कारण असू शकत नाही. डावे पक्ष वगळता उर्वरित पक्षांंवर ही विचारसरणी किती प्रभावी आहे, हे लक्षात येते. लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडले तेव्हा काही पक्षांच्या भूमिका या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या मानसिकतेच्या होत्या. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 40 टक्के तिकीटे महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा करणार्‍या प्रियांका गांधी यांचा काँग्रेस पक्ष आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या सरकारांनी हे विधेयक प्रलंबित ठेवले. एका अर्थाने आपण लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याची संधी हातची गमावली आहे.

सध्या आपल्या देशात पंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत महिलांसाठी जागा आरक्षित आहेत. महिलांना जेव्हा स्वतंत्र रुपाने काम करण्याची संधी मिळते, तेव्हा त्या संधीचे सोने करतात. पात्रता आणि क्षमता महिलावर्गांनी जगाला दाखवून दिली आहे. या कारणांमुळेच केरळसारख्या प्रांतात महिलांची संख्या 42 टक्के पोचली आहे. कारण जागा राखीव नसतानाही महिला निवडून येण्याचे प्रमाण केरळमध्ये लक्षणीय राहिले आहे. आता तर अनेक राज्यांनी या जागांचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे महिलांना एकप्रकारे बळ मिळत आहेे. त्याचवेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, भारतीय समाजातील एक मोठा गट महिलांना अशा रितीने सार्वजनिक क्षेत्रात पुढे जाण्यास किंवा प्रगती करण्याबाबत उदासिन राहतो. अशी मंडळी निवडून आलेल्या महिलांवर सातत्याने टीका करत असतात. महिला बाहुले असतात, भ्रष्टाचारी असतात अशा प्रकारचे बेछुट आरोप केले जातात. यावरून असे चित्र निर्माण केले जाते की, महिलांना मागे खेचण्यात पुरुषप्रधान मानसिकता कारणीभूत नाही आणि निवडून आलेले लोक तर प्रामाणिक आणि इमानदारीचे पुतळे आहेत.

एकीकडे महिला आरक्षण वाढवले जात असताना दुसरीकडे त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. हरियानात तर महिला उमेदवारांना आता दहावी पासची अट देखील घालण्याची तयारी सुरू आहे. म्हणजेच ते न शिकण्यामागे सरकारी धोरण जबाबदार नसून त्या स्वत:च कारणीभूत असल्याचे समाजमनावर ठसवले जात आहे. अशा प्रयत्नांना वेळीच थांबवणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत लोकशाहीला सर्वसमावेशक करणार्‍या आणि त्याचा विस्तार करणार्‍या शक्तींत संघर्ष सुरू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपली लोकशाही संकुचित आणि स्वार्थी लोकांत अडकवण्याचे प्रयत्न आजही सुरू असून ते सध्या अधिक प्रकर्षाने जाणवत आहेत. या प्रयत्नांना हाणून पाडण्याचे मोठे आव्हान लोकशाहीवादी शक्तींसमोर आहे. हे आव्हान स्वीकारणार्‍या मंडळींना संघर्ष करताना महिलांच्या प्रतिनिधीत्वचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवावा लागेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com