Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedभर उन्हात लग्नांचा धुमधडाका

भर उन्हात लग्नांचा धुमधडाका

निफाड । आनंदा जाधव | Niphad

गेली दोन वर्षे करोना (corona) प्रादूर्भावामुळे सण, उत्सव, यात्रा, जयंती, पुण्यतिथी, विवाह सोहळे यासह धार्मिक कार्यक्रम, वर्षश्राद्ध, दशक्रिया विधी यांना बंधने आली होती.

- Advertisement -

याकाळात कोणीही कुणाच्या घरी की बाजारपेठेत फारसे फिरकत नव्हते. मात्र आता करोना प्रादूर्भाव ओसरला अन् शासनाने निर्बंध शिथिल (Restrictions relaxed) केले. शाळा (school), महाविद्यालये (college) सुरू झाली. बाजारपेठा गजबजल्या, आठवडे बाजार, यात्रा सुरू झाल्या. साहजिकच दोन वर्षांपासून आनंदोत्सवाला मुकलेली तरुणाई यावर्षी मात्र मागची सर्व कसर काढत जयंती, विवाह सोहळ्यात बेभान होऊन नाचू लागली आहे. आता तर उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढत असतानाही विवाहांचा धुमधडाका मात्र जोरात सुरू झाल्याचे दिसत असून विवाह सोहळ्यांना पूर्वीसारखीच गर्दी होऊ लागली आहे. वाढती गर्दी बघता नागरिकांना जणू करोनाचा विसर पडल्याचेच दिसत आहे.

टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याच्या नादात करोना (corona) घरापर्यंत केव्हा आला हे प्रारंभी समजले नाही. जेव्हा समजले तेव्हा उशीर झाला होता. तो काळ आठवला तर आजही अंगावर शहारे येतात. काट्या टाकून बंद केले जाणारे गावाचे रस्ते, भर उन्हात (summer) गावाकडे पायी निघालेले मजूर, त्यात रस्त्याच्या कडेची बंद असलेली दुकाने अन् वाहनाविना सुनसान झालेले रस्ते. त्यावेळी तर नागरिक एकमेकांशी बोलणेदेखील टाळत असे. विवाह सोहळे (Wedding ceremonies) घरच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीतच साधेपणाने व कमी वेळेत होत असे.

दशक्रिया विधी, वर्षश्राद्धदेखील केवळ धार्मिक विधीपुरतेच मर्यादित राहिले होते. मजुरांना काम नाही, बाजारपेठा बंद, शेतमाल विक्रीची व्यवस्था नाही, किराणा घेण्याची पंचाईत अशा बिकट काळात कुरी कुणाला मदत करणेदेखील धोक्याचे वाटत होते. अवघे कुटुंब घरात बंदिस्त. त्यातच मृत्यूच्या बातम्या ऐकून मन चिंतीत होत असे. मात्र त्यानंतर शासनाने लसीकरणावर (vaccination) जोर दिला. नियम, अटींची कठोर अंमलबजावणी केली. परिणामी हळूहळू करोना प्रादूर्भाव घटण्यास मदत झाली. करोना प्रादूर्भाव (Corona outbreak) ओसरला तसे नागरिक मागचे दिवसदेखील विसरले. विवाह सोहळे मंगल कार्यालयात सुरू झाले. दशक्रिया विधी, वर्षश्राद्धाला प्रवचन, कीर्तनामुळे गर्दी होऊ लागली.

दोन वर्षे मात्र बंदमुळे आता होत असलेल्या यात्रांना गर्दीचा माहोल दिसू लागला. सण, उत्सव (festivals) पूर्वीसारखेच जल्लोषात होऊ लागले. विवाह सोहळ्यासाठी तर बॅण्ड, डी.जे. सह गर्दीचा माहोल. कुठलेही कार्य कमी माणसांत साजरे करणे अशक्य होऊ लागले. बाजारपेठेत आर्थिक मंदीच्या माहोलची चर्चा रंगत असताना विवाह सोहळे मात्र काही लाखांत होऊ लागले. मग प्रश्न पडता की आर्थिक मंदी (Economic downturn) नेमकी कुणाला अन् कुठे आहे? आजची परिस्थिती पाहिली तर अगदी सकाळपासूनच सूर्य आग ओकत आहे.

अंगातून घामाच्या धारा निघत असतानाही भर उन्हात विवाहस्थळी पोहोचण्याची वर्‍हाडींची लगबग पाहता खरेच अशा सोहळ्यांना उपस्थिती लावणे गरजेचे आहे का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. त्यातच अशा सोहळ्यांना होणारी गर्दी पाहता पुन्हा करोना प्रादूर्भाव पसरवण्यास हातभार लावत तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. करोना लाटेत अनेक घरातील कर्ती माणसे गेली. कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचे भाऊ, बहीण आपल्यातून निघून गेले. साहजिकच या सार्‍या घटना ताज्या असतानाच गर्दी करणे कितपत योग्य आहे? उन्हात सोहळ्यांना उपस्थिती म्हणजे आजारांना आमंत्रण आहे. गर्दी होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घेणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या