Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedहागणदारीमुक्तीला पाणीटंचाई आडकाठी

हागणदारीमुक्तीला पाणीटंचाई आडकाठी

दिंडोरी । संदीप गुंजाळ | Dindori

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तापमानांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पाण्याची पातळीत कमालीची घट होत आहे. त्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई (Water scarcity) मोठ्या प्रमाणात जानवू लागली आहे. काही ठिकाणी तर दिवसाआड पाणीपुरवठा (Water supply) होत आहे.त्यामुळे शासनाची महत्वाची योजना हागणदारीमुक्त योजनेला पाणी टंचाईची आडकाठी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisement -

शासनाने हागणदारी मुक्तीसाठी (Hagandari Mukti) विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने काटेकोर अंमलबजावणी सुध्दा केली गेली. उन्हाची तीव्रता (intensity of the sun) दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई ची भीती वर्तवली जात असल्याने या महत्वपूर्ण योजनेला खीळ बसते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आता काही ठिकाणी लोटा बहादरांचे दर्शन घडत असल्याने भविष्यात पाणीटंचाईमुळे (Water scarcity) अशी परिस्थिती निर्माण होईल यांचे जणु हे लोटाबहादर संकेत तर देत नसतील ना? अशी चर्चा काही गावांमध्ये ऐकायला मिळत आहे.

स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत (Swachh Bharat Mission Campaigns) स्वच्छतेकडून समृद्धीकडेअसा नारा देत जिल्ह्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायत (grampanchayat) व पंचायत समिती (panchayat samiti) प्रशासनाला सुचना देऊन घरोघरी शौचालय बांधकाम करणे, शासकीय अनुदान देणे, जनजागृती आदी बाबींवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गाव पातळीवर गुडमॉर्निंग पथक तयार करून हे पथक पहाटे पाच ते सकाळी आठ या वेळेत उघड्यावर शौचास जाणार्‍या व्यक्तीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत होते.

त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत होते.त्यामुळे गावे हागणदारीमुक्त होण्याचा प्रशासनाने यशस्वी प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला होता.काही गावांमध्ये फक्त अनुदान लाटण्यासाठी जोरदार योजना कागदोपत्री राबविली गेली. पावसाळ्यात तर काही ठिकाणी शासनाने बांधून दिलेल्या शौचालयात गवर्‍या, लाकडे ठेवण्यासाठी वापर झाला. अनुदानात वाढ करून उपयोगात येतील असे शौचालय बांधून देवून देश हागणदारीमुक्त करण्याच्या संकल्पनेला लोकांची न बदललेली मानसिकता आडकाठी येत होती. त्यात आणखी भर उन्हाळ्यातील पाणी टंचाईने पडली आहे.

कारण सध्या उन्हाची तीव्रता वाढत असुन बहुतेक गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. बहुतेक गावांमध्ये एक-दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. ग्रामीण भागातील लोकांकडे पाणी साठवण्यासाठी आवश्यक सामग्री नसते. पिण्याच्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी जेमतेम भांडी असतात. त्यामुळे दोन ते तीन दिवस पाणी पुरेल इतका पिण्याच्या पाण्याची साठा करून ठेवण्यासाठी पाण्याच्या टाक्या उपलब्ध नसतात.

त्यामुळे साठवलेले पाणी दोन-तीन दिवस पिण्यासाठी वापरण्यासाठी महत्व ग्रामीण भागात दिले जाते. त्यामुळे शौचालयासाठी पाण्याची साठवणूक करता येत नसल्याने शौचालयासाठी उघड्यावर जाण्याचा पर्याय शिल्लक रहातो. त्यामुळे लोकांच्या मानसिकतेत बरोबरच पाणीटंचाई हा एक मुद्दा हागणदारीमुक्तीसाठी अडसर ठरला आहे. शासनांच्या या महत्त्वाच्या हागणदारीमुक्त योजनेला आडकाठी येते की काय ही भीती वाटू लागली आहे.

पाण्याचे नियोजन हवे

जिल्ह्यातील काही ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असते.त्यात शौचालयासाठी मुबलक पाणी आणायचे कोठून असा गहन प्रश्न सध्या नागरिकांपुढे उभा राहात असून ,येणार्‍या काळात पाणीटंचाई हेच एकमेव कारण स्वच्छ भारत अभियानाला अडथळा बनण्याच्या मार्गावर दिसत आहे. ही समस्या जर दूर करायची असेल, तर आताच नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शासनाच्या या योजनेला यशस्वी करण्याचा प्रयत्न करावा.असे जाणकारांकडून बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या