पेट्रोलपंपांवर शुकशुकाट का?

पेट्रोलपंपांवर शुकशुकाट का?

मालेगाव । हेमंत शुक्ला Malegaon

पेट्रोल-डिझेल व गॅस या इंधनाच्या वाढत्या दरवाढीचा उद्रेक सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणारा ठरत आहे. तर दुसरीकडे इंधन दरातील राज्या-राज्यात असलेली तफावत महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांची चिंता वाढविणारी ठरली आहे. या दराच्या तफावतीमुळे पेट्रोलपंपांवर शुकशुकाट पसरला आहे....

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलची किंमत जास्त आहे. सर्वाधिक विक्री असलेल्या डिझेलच्याच किमतीत सरासरी चार ते सात रूपयांचा फरक लिटरमागे पडत आहे. यामुळे कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, तामीळनाडू या राज्यातील वाहनचालक जिल्ह्यात डिझेल भरणे टाळत आहे. यामुळे जिल्ह्यातील 450 पेट्रोल पंपांना विशेषत: राष्ट्रीय व राज्य महामार्गावर असलेल्या सुमारे 300 ते 350 पेट्रोलपंपांना डिझेल विक्रीत मोठा फटका बसत आहे. गत दोन महिन्यात सरासरी 30 ते 40 टक्के डिझेल विक्रीत घट झाल्याने जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालक चिंताक्रांत झाले आहे.

इंधनाच्या दरवाढीमुळे शासनाला अपेक्षित महसूल मिळत असला तरी दराच्या तफावतीमुळे जिल्ह्यात इंधन विक्रीत होत असलेली घट शासनाचे महसूल बुडविणारी ठरत आहे. दराच्या तफावतीचे संकटाबरोबर अवैधरित्या विकले जात असलेले बायोडिझेल पेट्रोलपंप व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ करणारे ठरले आहे. पोलीस-प्रशासन यंत्रणेतर्फे या अवैध विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र बायोडिझेलची अवैध विक्री थांबू शकलेली नाही. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक करत इंधन विक्रीचा सुरू केलेला व्यवसाय या दुहेरी संकटाने अडचणीत आल्याने पेट्रोलपंप चालक अक्षरश: त्रस्त झाले आहेत.

केंद्र सरकारने दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेल या इंधनाचे भाव कमी केले. या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या सर्व राज्यांनी देखील आपल्या सोयीनुसार भाव कमी केले आहेत. आज महाराष्ट्रात डिझेल 92 रूपये 34 पैसे तर पेट्रोल 109 रूपये 54 पैसे लिटर या दराने विकले जात आहे. मात्र महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये 7 ते 7.50 रूपये, मध्यप्रदेश 3.50 रूपये, गुजरात 4 रूपये कमी दराने डिझेल पंपांवर विकले जात आहे. राजस्थान, तामीळनाडू या राज्यात देखील महाराष्ट्रापेक्षा कमी दरानेच इंधनाची विक्री होत आहे. मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांच्या सीमा नाशिक जिल्ह्याच्या जवळच आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अधिक दराचे इंधन मिळत असल्याचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यास बसत असल्याची व्यथा अनेक पेट्रोलपंप चालकांनी व्यक्त केली.

इतर राज्यात दर कमी असल्याने वाहन चालक तेथेच आवश्यक तेवढे इंधन भरून घेतात. त्यामुळे त्यांना शक्यतो महाराष्ट्रात इंधन भरण्याची गरज पडत नाही. अपवादाने इंधनाची गरज भासल्यास महाराष्ट्राची सीमा ओलांडली जाईल इतकेच इंधन ते भरू लागले आहे. या दर तफावतीचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसत आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश व गुजरात व राजस्थान या राज्यातील वाहन चालक जिल्ह्यात इंधन भरण्याचे प्रमाण खुपच कमी झाले आहे. त्यामुळे विक्रीत मोठी घट आली आहे. तर दुसरीकडे अवैधरित्या विकले जाणार्‍या बायोडिझेलसदृष्य इंधनाचा फटका देखील पेट्रोल पंपचालकांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. 25 ते 30 रूपये कमी दराने बायोडिझेल उपलब्ध होत आहे. त्यामुळे अनेक चालकांचा कल बायोडिझेल नामक इंधन भरण्याकडे वळू लागला आहे. या इंधनामुळे गतीवर होत असलेला परिणाम तसेच वाहन इंजिनाचे आयुष्य कमी होणार असले तरी या मुद्यांकडे दुर्लक्ष करीत चालक बायोडिझेल भरत आहेत. त्यामुळे डिझेल विक्री गत दीड महिन्यात निम्म्यावर आल्याने अर्थकारण पूर्णत: कोलमडू लागत असल्याने पेट्रोलपंप चालक चिंताक्रांत झाले आहेत.

ढाबे चालक देखील त्रस्त

इंधन दराच्या तफावतीचा फटका पेट्रोलपंप चालकांबरोबर हॉटेल, ढाबे चालक तसेच इतर किरकोळ व्यावसायिक यांना देखील बसू लागला आहे. वाहने पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबतात व शक्यतो तेथेच जेवणाची चांगली सोय असेल तर थांबून जेवणसुध्दा करतात. यामुळे अनेक हॉटेल ढाबा चालकांनी लांब पल्ल्यांच्या वाहन चालकांसाठी विश्रांतीगृहाची देखील सोय करून ठेवली आहे. मात्र आता वाहन चालक इंधन भरण्यासाठी पंपावर थांबत नसल्याने हॉटेल-ढाबा चालकांसह इतर किरकोळ व्यावसायिकांना देखील मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे.

Related Stories

No stories found.