उपर्‍यांना मान, निष्ठावनांना टांग

उपर्‍यांना मान, निष्ठावनांना टांग

घोटी । जाकीर शेख

गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यात एकमेव आमदार निवडून आणणार्‍या ईगतपुरी तालुक्यातील काँग्रेस अध्यक्षपदाचा प्रदेशाध्यक्षांनी अगदी पोरखेळ केल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंंडावर तत्कालीन काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी सेनेचा भगवा हातात धरला. इगतपुरी तालुक्यातील काँग्रेस कमिटी अध्यक्ष, युवक, महिला अध्यक्षा आदींसह जवळपास सर्वच पदाधिकारी काँग्रेस सोडून गावित यांचेबरोबर शिवसेनेत गेले.पण इगतपुरीत काँग्रेस आमदार झाल्यानंतर आणि पक्षाला सुदिन आल्याने बाहेर पडलेले पुन्हा पक्षात आले. पण त्याना मानाचे स्थान हवे असल्याने हे उपरे मान मागत आहेत. तर पक्ष निष्ठावानांना टाळण्यासाठी टांग दाखवत आहे....

याआधीच काही वर्षांपूर्वी दिवंगत लोकनेते गोपाळराव गुळवे यांचे चिरंजीव अ‍ॅड संदीप गुळवे काँग्रेस सोडून शिवसेनेचे पाईक झाले. परंतु स्थानिक शिवसैनिकांनी त्यांचे नेतृत्व मान्य न केल्याने त्यांनी दोन चार वर्षांतच राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला.इगतपुरी तालुक्यातील काँग्रेस पक्षावर आलेल्या या अभूतपूर्व आणीबाणीच्या संकटातून पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर होता.

परंतु स्व. गोपाळराव गुळवे यांच्या पश्चात तालुक्यात काँग्रेस टिकवून ठेवणारा एक निष्ठावान वर्ग होता. या वर्गातील धुरिणांनी पडत्या काळाला नवसंजीवनी देण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतली. मा. जि. प. सदस्य जनार्दन माळी, मा. अध्यक्ष कचरु पाटील शिंदे, मा. सभापती मधुकर कोकणे, गणपतराव सहाणे,बाळासाहेब वालझाडे, संतू पा. खातळे, नथु पा. कुटके,रामदास धांडे, तत्कालीन युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, उत्तमराव भोसले, बाळासाहेब कुकडे,कमलाकर नाठे,पुंडलिक धांडे, संपतराव मुसळे,ज्ञानेश्वर कडू, बाळासाहेब लंगडे,दिलीप पाटील , ज्ञानेश्वर खातळे, निवृत्ती कातोरे यांचेसह असंख्य कार्यकर्ते पक्षासाठी पुढे येत घोटी येथे मिटींग लावली.तालुका काँग्रेसचे नेते सोडून गेले म्हणून काय झाले तालुक्यातील जनता काँग्रेस विचारालाच मानणारी आहे.

त्यामुळे कुणी येवो जावो ईगतपुरीचा आमदार काँग्रेस पक्षाचाच होणार असा एकमुखाने ठराव झाला.पहिला प्रश्न तालुका काँग्रेसला अध्यक्ष कोण असा पडला. सर्व जेष्ठांच्या सुचना आणि युवकांच्या पाठिंब्यावर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिक्कामोर्तब केले. पाडळी देशमुख येथील काँग्रेस निष्ठावंत रामदास पाटील धांडे यांची तालुका काँग्रेस अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. थोड्याच दिवसात सर्व पदांवर कार्यकर्त्याच्या नेमणुका झाल्या. तालुक्यातील काँग्रेस उभारी घेत अल्प काळात विधानसभा निवडणुकीत लढायला सज्ज झाली. हिरामण खोसकर यांना काँग्रेसचे तिकीट देण्यात आले.

मित्रपक्षासह सर्वांनी जीवाचे रान करून खोसकर यांच्या रुपाने नाशिक जिल्ह्यात काँग्रेसचा एकमेव आमदार निवडून आणला. संपूर्ण राज्यात इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुका चर्चेचा विषय ठरला. इगतपुरीत रामदास धांडे तर त्रंबकला संपत सकाळे यांच्या नेतृत्वाखाली आमदार हिरामण खोसकर यांच्या समवेत पक्षाची घोडदौड सुरू झाली. साहजिकच यामुळे पक्षाला सोडून बाहेर गेलेले लोक अडगळीत पडू लागले. काँग्रेस शिवाय आपल्याला स्थान नाही ही वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आली.

त्यांनी स्थानिक पातळीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फळ ठरल्याने प्रदेश पातळीवर प्रयत्न करुन गुपचूप पक्षात प्रवेश मिळवला. आमदारांचा गैरवापर करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेकडून अध्यक्षबदलाचे पत्र मिळवले. निष्ठावंतांनी मुंबई गाठली. ना. बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आमदारांंसमक्ष भेट घेतली. प्रदेशाध्यक्षांनी नवीन निवडीला स्थगिती देत रामदास धांडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जातील असे जाहीर केले. रामदास धांडे हेच अध्यक्ष अशा सर्व वर्तमानपत्रात छापून आले.

परंतु दोनच दिवसात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला निर्णय बदलवला. कुणास काही कळायला मार्ग उरला नाही. प्रदेशाध्यक्षांच्या भुमिकेवर सर्वत्र संशय निर्माण झाला.प्रदेश पातळीवर झालेल्या अध्यक्षपदाच्या डील वर तालुक्यातील काँग्रेसी काय निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com