‘कुप्रसिद्ध व्हिडिओ गल्ली’ होणार सेंट्रल मार्केट

‘कुप्रसिद्ध व्हिडिओ गल्ली’ होणार सेंट्रल मार्केट

नाशिक | फारूक पठाण Nashik

विविध प्रकारचे गैरप्रकार (Malpractice), बेकायदेशीर धंदे व व्हिडियो हॉलमुळे एक प्रकारने बदनाम झालेल्या भद्रकाली टॅक्सी स्टँण्ड (Bhadrakali Taxi Stand) परिसरात आता मनपाच्या (NMC) माध्यमातून भव्य नाशिक सेंट्रल मार्केट (Nashik Central Market) उभे राहणार आहे. यासाठी परिसरातील नागरीक, व्यापार्‍यांनी एकत्रित येऊन पाठपुरावा केल्याने यश मिळत आहे. छत्रपती सेनेने (Chatrapati Sena) या ठिकाणी भव्य मार्केट व्हावे, यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. मनपाकडून हॉकर्स झोन (Hawkers Zone) जाहीर झाले असून सुमारे शंभर हातगाड्यात या संपुर्ण परिसरात लागण्याचा अंदाज आहे.

पुण्यातील (Pune) ‘तुळशीबाग बाजारपेठ’च्या धरतीवर नाशिक (Nashik) मधील ऐतिहासिक भद्रकाली परिसरात नाशिक सेंट्रल मार्केट तयार व्हावे, अशी संकल्पना छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, अध्यक्ष निलेश शेलार यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यापार्‍यांनी एकत्रित येऊन मांडली होती. यासाठी छत्रपती सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांपासून महापालिकेपर्यंत सतत पाठपुरावा सुरू केला आहे.

स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच परिसरासह शहराचा विकास व्हावा, या दृष्टीने नाशिक सेंट्रल मार्केट लवकरच लवकर तयार व्हावे, अशी मागणी नागरिक व व्यापार्‍यांनी केली आहे. हॉकर्स झोन मंजुर होऊन 2020 मध्ये याठिकाणी नाशिक सेंट्रल मार्केटला मंजुरी मिळाली आहे. हा संपूर्ण परिसर मागील अनेक वर्षापासून व्हिडिओ गल्ली (Video Galli) व अनेक प्रकारच्या गैरप्रकारांमुळे प्रसिद्ध होता. त्याची जुनी ओळख पुसून नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न परिसरातील नागरिक व व्यापार्‍यांनी एकत्र येऊन केला आहे.

यासाठी छत्रपती सेनेकडून सर्व प्रकारची कागदोपत्री कारवाई करून पाठपुरावा सुरू आहे. नाशिक सेंट्रल मार्केट नोंदणीकृत करण्यात आले असून सध्या परिसरातील जवळपास सर्वप्रकारचे गैर कृत्य बंद झाले आहे. त्याच प्रमाणे सुमारे 18 लहान मोठे व्हिडियो हॉल (Video Hall) या परिसरात होते, ते देखील सध्या बंद करण्यात आले आहे. यामुळे या भागात जमा होणारी टवाळखोरांची गर्दी देखील नाहीशी झाली आहे. नाशिकमधील व्यापारी प्रतिष्ठाण असलेल्या भद्रकाली परिसरातील याच भागात असे कृत्य सुरू होते. मात्र तरुणांनी पुढाकार घेत आता येथील चित्र बदलायचा चंग बांधला आहे.

भद्रकाली मार्केट पुन्हा गजबजणार

जुन्या काळात येथे टांगा स्टँड होता. भद्रकाली टॅक्सी स्टँण्ड हा नाशिकचा मुख्य केंद्र मानला जायचा. नंतरच्या काळात येथूनच शहर बस सेवा सुरू होती. या ठिकाणी भगुर दरवाजा असून तेथून भगुरपर्यंत बस जायची. नंतर अनेक दुकाने तयार झाल्याने मार्ग कमी पडू लागले व बस थांबा हलविण्यात आले. तरी टॅक्सी व रिक्षा थांबा अद्यापही सुरू आहे. शहराचा मुख्य बाजार भद्रकालीच आहे. मात्र मध्यंतरी काही काळात या ठिकाणी गैर कृत्य सुरू झाल्याने सामान्य लोकांनी या भागात पाठ फिरवली होती, मात्र आता पुन्हा मार्केट होणार असल्याने तो गजबजणार आहे.

असे राहणार मार्केट

  • भद्रकाली परिसरातील विद्युत कार्यालय समोर (सध्याचे टॅक्सी स्टँड) पासून मागे ठाकरे रोड पर्यंत तर मेनरोडच्या बाजुने जुन्या लॉज समोरुन थेट भाजी मंडईच्या मागच्या बाजुपर्यंत नाशिक सेंट्रल मार्केट राहणार आहे.

  • मनपाचे हॉकर्स झोन जाहीर केले असून सुमारे शंभर हातगाड्या लागणार आहे.

  • जुने वाडे, घरे व हॉलचे रुपांतर मोठ्या होलसेलच्या दुकानांमध्ये होणार.

  • दुध बाजार शहीद अब्दुल हमीद चौक ते मेनरोडच्या मार्गावर मार्केटमध्ये जायला भव्य कमान तयार होणार आहे, त्याच प्रमाणे ठाकरे रोडच्या कोपर्‍यावर देखील कमान राहणार आहे. या कामाची निविदा देखील निघाली असून कामाला प्रारंभ होणार आहे. सध्या फलक लावण्यात आले आहे.

सेंट्रल मार्केट झाले तर त्याचा मोठा फायदा येथील व्यापार्‍यांना नक्की होणार, गैरकृत्य यामुळे कायमचे बंद होणार. रोजगार निर्मिर्ती होणार. स्थानिक बेरोजगारांना संधी मिळणार.

- शब्बीर चोपडावाला (व्यापारी)

कुप्रसिध्द म्हणून या भागाची ओळख होती, आम्ही सर्वांनी एकत्रीत येऊन पुण्याच्या तुळशी बाग प्रमाणे या ठिकाणी नाशिक सेंट्रल मार्केट करण्याचा निर्णय घेतला. यामुळे व्यापारी व स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. आमच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. प्रभाग 13 चे नगरसेवक, मनपा प्रशासनासह गरसेविका वत्सला खैरे यांची मोलाची साथ मिळत आहे. आमची एकजुटता व व्यापार्‍यांची साथ यामुळे आम्ही पुढे जात आहे. आगामी आचारसंहिता लागण्यापुर्वी काम सुरू व्हावे, अशी मागणी.

- चेतन शेलार (संस्थापक अध्यक्ष, छत्रपती सेना)

Related Stories

No stories found.