Friday, April 26, 2024
HomeUncategorizedलसी येताहेत ; परिणामकारकतेचे काय?

लसी येताहेत ; परिणामकारकतेचे काय?

– प्रा. विजया पंडित

कोणत्याही आजारावरील लस तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. कोरोनावरील लस मात्र दहा महिन्यांत तयार करण्यात अनेक देशांनी यश मिळविले असून, लस तयार करणार्‍या कंपन्यांनी त्यांच्या परिणामकारकतेविषयी अनेक दावे केले आहेत. परंतु चाचणीदरम्यान लस प्रभावी ठरणे आणि समाजाला दिल्यानंतर तिच्या परिणामकारकतेचा दर टिकून राहणे, या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे.

- Advertisement -

कोणत्याही गंभीर आजारावरील लस तयार करण्यासाठी संशोधन, चाचण्या अशा पायर्‍या होऊन ती लस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी 10 वर्षांपर्यंतचा वेळ लागू शकतो. पोलिओची लस तयार करण्यासाठी 47 वर्षे, चिकन पॉक्सची लस तयार करण्यासाठी 42 वर्षे, इबोलावरील लस तयार करण्यासाठी 43 वर्षे तर हिपेटायटिस बी या आजाराची लस शोधून काढण्यासाठी 13 वर्षे लागली होती. एचआयव्ही एड्सवरील उपचार शोधण्यात अनेक वर्षे गेली, तरी तो अद्याप सापडलेला नाही.

गेल्या 200 वर्षांत केवळ स्मॉलपॉक्स या आजाराचेच मुळासकट उच्चाटन करणे शक्य झाले आहे. याखेरीज मानवजातीला होणार्‍या कोणत्याही संसर्गजन्य आजाराला मुळापासून खतम करण्यात अद्याप यश आलेले नाही. परंतु आता मात्र संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाला मुळासकट नष्ट करण्यासाठीच्या प्रयत्नांत गुंतले आहेत. कोरोना विषाणूवरील लस केवळ 10 महिन्यांतच तयार करण्यात आली आहे. जगभरात कोरोना विषाणूवरील अनेक लशी आता तयार झाल्या आहेत. या लशी तयार करणार्‍या कंपन्या आपापल्या लशीच्या यशस्वितेबद्दल वेगवेगळे दावे करीत आहेत.

फाइजर कंपनीने आपली लस 95 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे मॉडर्नाने आपली लस 94.5 टक्के, रशियाने आपली स्पुटनिक ही लस 95 टक्के, ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेका यांनी आपली लस 90 टक्के तर भारतात तयार होत असलेली कोवॅक्सिन ही लस 60 टक्के यशस्वी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे सर्व निष्कर्ष एका नियंत्रित वातावरणात करण्यात आलेल्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्यांमधून प्राप्त झालेले आहेत. परंतु जेव्हा या लशी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतील, तोपर्यंत त्यांच्या परिणामकारकतेचा दर खूपच खाली आलेला असू शकतो. कारण चाचणीच्या वेळी लोकांचे दोन गट करण्यात येतात. यातील निम्म्या लोकांना लस दिली जाते तर निम्म्या लोकांना ती दिली जात नाही. फाइजरच्या चाचणीत 43 हजार लोक सहभागी झाले होते. त्यातील 170 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. परंतु त्यातील 162 लोकांना लस दिली गेली नाही. केवळ आठ व्यक्तींनाच ती दिली गेली. याच आधारावर ही लस 95 टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु ही त्या लशीची ‘एफिकसी’ किंवा ‘इफेक्टिव्हनेस’ आहे असे म्हणता येणार नाही.

‘एफिकसी’ शब्दाचा अर्थ असा आहे की चाचणीदरम्यान या लशीच्या साह्याने रुग्णांना 95 टक्क्यांपर्यंत बरे करण्याची क्षमता आढळून आली. सामान्यतः चाचणीत सहभागी झालेले लोक निरोगी असतात आणि त्यांना पूर्वीचा कोणताही गंभीर आजार नसतो. जेव्हा हीच लस जगातील कोट्यवधी लोकांना दिली जाईल, तेव्हाच तिचा नेमका परिणाम लक्षात येऊ शकेल. कारण ‘द लॅसेन्ट’ या वैद्यकीय नियतकालिकाच्या मते, जगातील 95 टक्के लोकांना आधीपासून एखादा आजार असतोच. त्यामुळेच जेव्हा ही लस लोकांना दिली जाईल, तेव्हा नेमकेपणाने वेगवेगळ्या लोकांवर आणि वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये लशीच्या यशस्वितेचा अंदाज घेता येईल.

जगभरातील विविध देशांनी या वेगवेगळ्या लशी खरेदी करण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु सर्व देश पुढील एक वर्षाच्या कालावधीत केवळ 20 ते 25 टक्के लोकांनाच लस उपलब्ध करून देऊ शकतील. पहिल्या टप्प्यात ही लस आरोग्य कर्मचार्‍यांना मिळेल. दुसर्‍या टप्प्यात सामाजिक काम करणार्‍या कर्मचार्‍यांना ती दिली जाईल. तिसर्‍या टप्प्यात 65 वर्षांवरील वयाच्या लोकांना ती मिळेल तर चौथ्या टप्प्यात सर्वसामान्य जनतेला ही लस दिली जाईल.

सामान्यतः लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात साठवून ठेवावी लागते. श्रीमंत देशांना या देखभालीत कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. परंतु गरीब आणि विकसनशील देशांमध्ये निधीची कमतरता असते आणि विजेची समस्याही असल्यामुळे लस साठवून ठेवण्याचे काम जटिल होणार आहे.

लस ही संसर्ग झाल्यानंतर नव्हे तर संसर्ग होऊ नये म्हणून दिली जाते. सामान्यतः लशींमध्ये संबंधित आजारांच्याच कमकुवत झालेल्या विषाणूंचा वापर केला जातो किंवा मग मृत झालेल्या विषाणूंचा वापर करून लस तयार केली जाते. त्यामुळे ही लस घेतल्यानंतर व्यक्तीमध्ये कोविड-19 ची लक्षणे आढळून येऊ शकतात. उदाहरणार्थ, तीव्र ताप येणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, एकाग्रता करण्यात अडथळे येणे किंवा डोकेदुखीची तक्रार असणे इ. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती या विषाणूंची ओळख पटवून त्यांच्याशी लढाई सुरू करते आणि त्यातूनच विषाणूच्या विरोधात प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) तयार होते. म्हणूनच या प्रक्रियेत संबंधितामध्ये ही लक्षणे दिसतात. त्यानंतर विषाणूचा दुसरा डोस दिला जातो. त्याचे दुष्परिणाम पहिल्यापेक्षा कमी असतात.

संसर्गाच्या विरोधात सामान्यतः चार प्रकारच्या लशी काम करतात. पहिली म्हणजे जेनेटिक व्हॅक्सिन. यात विषाणूची जनुके शरीराच्या प्रतिरोधक शक्तीला सक्रिय करतात. दुसरा प्रकार म्हणजे वॅक्टर व्हॅक्सिन. ही लस शरीरातील पेशींमध्ये (सेल्स) प्रवेश करते आणि पेशी विषाणूशी लढण्यासाठीची प्रथिने तयार करू लागतात. तिसरी लस म्हणजे प्रथिनावर आधारित लस. यात कोरोना विषाणूची प्रथिने असतात. चौथी लस म्हणजे निष्क्रिय लस. ही लस कमकुवत किंवा निष्क्रिय झालेल्या विषाणूंपासून तयार केली जाते. एकंदरीत कोणतीही लस असली तरी चाचणीदरम्यान केले जाणारे दावे समाजाला लस दिल्यानंतर तंतोतंत खरे ठरतीलच असे सांगता येत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या