अमेरिकेची भारताला साथ

अमेरिकेची भारताला साथ

- सत्यजित दुर्वेकर

भारत आणि चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सार्वभौमत्त्वाचे संरक्षण व्हावे यासाठी भारतीय लष्कराची जादा कुमक तैनात करण्यात आली आहे. अशा स्थितीत अमेरिकेच्या नवीन प्रशासनाचा भारताला मिळणारा पाठिंबा मोलाचा ठरतो.

भारत आणि चीन सीमेवर गेल्या वर्षभरापासून तणाव आहे. गलवान संघर्षानंतर संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशात चर्चेच्या बर्‍याच फेर्‍या झाल्या, परंतु त्यापासून तोडगा निघालेला नाही. अर्थात सीमावाद दोन्ही देश अंतर्गत बाब आहे, मात्र शक्तीशाली देशांचे समर्थन मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अशावेळी अमेरिकेत संत्तातर झाल्यानंतर भारताप्रती मिळणारे संकेत सकारात्मक दिसून येत आहेत.

बायडेन प्रशासनाने शेजारी देशांवर दडपण आणण्याची चीनची रणनिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. तसेच सीमेवरच्या स्थितीवर अमेरिका लक्ष ठेवून असल्याचेही नमूद केले आहे. गलवानच्या धुमश्चक्रीनंतर अमेरिकेच्या नव्या प्रशासनाने नुकतीच पहिली प्रतिक्रिया दिली आहे. व्हाईट हाउसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्या एमिली जे हॉर्न यांनी म्हटले की, भारत आणि चीन सीमेवरच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारत आणि चीन यांच्यातील चर्चेवरही लक्ष आहे. सीमावादावर शांततेने तोडगा निघावा यासाठी थेट चर्चेला आमचा पाठिंबा असेल. चीनकडून शेजारी देशांना धमकावले जात असून दडपणही आणले जात आहे. यावरुन अमेरिका चिंतेत आहे.

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात गेल्या पाच मे रोजी संघर्ष झाला. सीमेवरचा ताणतणाव कमी करर्‍यासाठी दोन्ही देशांत लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेर्‍या झाल्या. परंतु अद्याप त्यावर ठोस समाधान मिळाले नाही. चीनने सैनिकांचे वाढवलेले बळ लक्षात घेता हिंद प्रशांत क्षेत्रात निर्माण झालेली तणावाची स्थिती जगातील प्रमुख देशांसाठी चर्चेचा मोठा विषय ठरत आहे.

चीनचा विस्तारवाद रोखण्यासाठी अमेरिका क्वाड (चार देशांचा समूह) ला पाठिंबा देत आहे. यात भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचा समावेश आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता राखणे हा या संघटनेचा हेतू आहे. प्रत्यक्षात या भागात चिनी सैनिक अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याचे आढळून आले आहे.

चीनचा सध्या दक्षिण आणि पूर्व चिनी समुद्रात अनेक देशांशी पाणी हद्दीवरुन वाद सुरू आहेत. चीनने काही वर्षात आपल्या कृत्रिम बेटावर सैनिकांची संख्या वाढवली आहे. चीन हे संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगत आहे. मात्र व्हियतनाम, मलेशिया, फिलिपिन्स,ब्रुनेई, तैवानने देखील आपला अधिकार सांगितला आहे. त्याचवेळी पूर्व चिनी समुद्रात चीनचा जपानशी वाद सुरू आहे. विशेष म्हणजे दक्षिण चीन समुद्र आणि चिनी समुद्रातील खनिज, तेल आणि नैसर्गिक संपदा विपूल आहे. त्यामुळे ही जागा जागतिक बाजारासाठी देखील महत्त्वाची आहे. अर्थात अमेरिकेने या वादग्र्रस्त ठिकाणी कोणताही दावा केलेला नाही. मात्र दक्षिण चिनी समुद्रात जहाजांच्या मुक्त विहारासाठी आणि गस्तीपासून सुटका मिळावी यासाठी लढाऊ जहाज आणि विमानांची नियुक्त करुन चीनच्या दाव्यांना आव्हान दिले आहे.

भारत सरकारने देखील देशाच्या हितासाठी संपूर्णपणे कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. वास्तविक प्रत्यक्ष ताबा रेषेवर सार्वभौमत्व राखण्यासाठी भारताने अतिरिक्त जवानाही तैनात केले आहेत. अशावेळी अमेरिकी प्रशासनाकडून मिळणारा पाठिंबा मोलाचा ठरत आहे.चीनच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी भारताला अमेरिकेचा पाठिंबा असणे आवश्यक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com