Monday, April 29, 2024
HomeUncategorizedअनपेक्षित

अनपेक्षित

– सत्यजित दुर्वेकर

‘मी शपथपूर्वक सांगतो की, हा माझा मुलगा नाही…’ असं जाहीररीत्या सांगणं ज्याच्या नशिबी आलं, त्यालाच त्यामागच्या वेदना ठाऊक! परंतु काही वेळा ‘अति झालं आणि हसू आलं’ असंही होऊ शकतं. अभिनेता इम्रान हाश्मीच्या बाबतीत हेच घडलं.

- Advertisement -

इम्रान मुळातच ‘सिरिअल किसर’ म्हणून नावारूपाला आलेला. त्यामुळं त्याचा एखादा अनौरस मुलगा असल्याची अफवा जरी पसरली, तरी लोक त्याच्याकडे संशयानं पाहतील. त्यातच संबंधित मुलाची आई साक्षात सनी लिओनी असेल, तर ‘शपथपूर्वक स्पष्टीकरण’ देण्यावाचून इम्रानकडे मार्ग तरी कोणता उरतो? बिहारमध्ये मुळातच सनी लिओनीची क्रेझ जरा जास्तच! मागे बिहारमधील एकदा स्पर्धा परीक्षेत ती ‘टॉपर’ ठरली होती. परंतु बहुधा आपल्याला नोकरीची गरज नाही, असं तिने कळवलं असावं. अन्यथा लाखो दिलांची धडकन असणारी सनी आज कुठल्यातरी सरकारी कार्यालयात, अंधार्‍या कोपर्‍यात टायपिस्ट म्हणून काम करताना दिसली असती. अशा गमतीजमती बिहारमध्ये होतच असतात. परंतु सनीला नोकरी ऑफर करणं वेगळं! सनीला चक्क मातृत्व देणं म्हणजे टू मच! तिथल्या एका विद्यापीठात शिकणार्‍या मुलाच्या अ‍ॅडमिट कार्डवर बाप म्हणून इम्रान हाश्मीचं तर आई म्हणून सनी लिओनीचं नाव छापल्याचं आढळलं. या अ‍ॅडमिट कार्डचा फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा काय गहजब उडाला असेल, याचा अंदाजच केलेला बरा!

इम्रान हाश्मीला ‘ओळखणारे’ अर्थात् त्याचे चाहते या कार्डवरून त्याची टिंगल करू लागले. इम्रान आणि सनी यांचं पूर्वीचं काही ‘चक्कर’ असावं, इथंपर्यंत लोकांची मजल गेली. अर्थात हे सगळंच खेळीमेळीत आणि गमतीजमतीत चाललं होतं. त्याचं कारणही तसंच आहे. कोणतीही गोष्ट गांभीर्यानं घ्यायचीच नाही, असं ठरवून टाकलेले काही लोक बिहारमध्ये आहेत. सोशल मीडियावर जेव्हा सनी लिओनी आणि इम्रान हाश्मी यांच्या ‘मुला’चं अ‍ॅडमिट कार्ड फिरू लागलं, तेव्हा बिहारमधल्या संबंधित विद्यापीठाची यंत्रणाही कामाला लागली.

तपासकाम सुरू झाल्यावर गुंता आणखी वाढला. कारण या विद्यार्थ्याच्या अ‍ॅडमिट कार्डवर ‘चतुरबाज स्थान’ असा पत्ता लिहिलेला होता. हा परिसर ‘रेड लाइट एरिया’ म्हणून ओळखला जातो. मग तर ही गोष्ट मुद्दाम करण्यात आली, हे स्पष्टच झालं. विद्यापीठाच्या कुलसचिवांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून, विद्यार्थ्याने स्वतःच ही ‘गंमत’ केली असावी, अशीच शंका बहुतेकांना आहे. मुद्दा असा, की पोरं असं का करतात? आपल्याला महाराष्ट्रात राहून अशा घटना विनोदी वाटतात आणि दुसरीकडे आश्चर्यही वाटतं. परंतु खरं तर आपल्याला समाधान वाटायला हवं. शिक्षणाचं महत्त्व जाणणार्‍यांच्या, त्याबद्दल गंभीर असलेल्यांच्या प्रांतात आपण राहतो.

या सगळ्या प्रकरणात इम्रान हाश्मीला नाहक त्रासही झाला आणि प्रसिद्धीही मिळाली. बॉलिवूडकरांची ही एक गंमतच असते. बदनाम झाले तरी नाव होतं. एखादा चित्रपट वादग्रस्त ठरला की जास्त चालतो, तशीच ही मंडळी मुद्दाम बदनाम होण्यासाठी स्वतःबद्दल वावड्याही उठवतात म्हणे! गॉसिपसाठी फिल्मी नियतकालिकांची पानं तयारच असतात. पण उद्या काय छापून येणार हे या मंडळींना आज माहीत असतं. या पार्श्वभूमीवर, बिहारच्या ‘त्या’ विद्यार्थ्यानं इम्रानला दिलेला धक्का अनपेक्षितच म्हणावा लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या