Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदुसरी लाट थोपवायची तर...

दुसरी लाट थोपवायची तर…

– डॉ. ललित कांत, वैद्यकीय तज्ज्ञ

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत भारतातच नाही तर जगभरात लसीकरण मोहिम सुरू आहे. भारतात काही भागात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे तर काही ठिकाणी थंड.

- Advertisement -

एकंदरीत लसीकरण सुरू असले तरी अपेक्षेप्रमाणे वेग आलेला नाही. अधिकाधिक लोकांनी लस घेण्यासाठी पुढे येणे आणि लसीकरणाचा वेग वाढवणे हेच दुसरी लाट थोपवण्याचा उत्तम मार्ग राहू शकतो.

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने देश अतिशय नाजूक स्थितीतून जात आहे. कोविड-19 ला जागतिक महासाथ असल्याचे जाहीर करुन एक वर्ष झाले आहे. यादरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी बर्‍यापैकी यश मिळवले. काही ठराविक भागातच कोरोना वाढत होता. एवढेच नाही तर गेल्यावर्षाच्या अखेरपर्यंत रुग्णांची संख्या घसरली होती. परंतु

फेब्रुवारीपासून कोरोनाचा ग्राफ पुन्हा वाढू लागला. यादरम्यान जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरू झाली आणि आतापर्यंत 3 कोटी नागरिकांना लस दिली गेली आहे. मात्र लसीकरणाची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा खूपच कमी संथ गतीने होत आहे. जर आपल्याला कोरोनावर अंकुश ठेवायचा असेल तर लसीकरण मोहिमेला आणखी बुस्ट द्यावे लागणार आहे. कोरोनाच्या काळात आपण अनेक अनुभवातून आणि संकटातून गेलो आहोत. मागच्या वर्षी लागू केलेेले निर्बंध आता शिथिल झाले आहेत.

बाजार, प्रवास, व्यवहार यासारख्या गोष्टी पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन देखील नियमितपणे होत आहे. या कारणांमुळे काही भागात संसर्ग पसरण्यास हातभार लागला आहे. आता सध्याची स्थिती पाहता 70 जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत 150 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 55 जिल्ह्यात 100 ते 150 टक्के रुग्णवाढीचे प्रमाण राहिले आहे. ही बाब चिंतेत भर घालणारी आहे.

कोरोनाचा वाढता ग्राफ पाहता दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्ग अधिक असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यात लसीकरणाचा वेग वाढवणे हा मोलाचा मुद्दा होता. यापूर्वीही संसर्ग बळावला होता, परंतु सर्व राज्यांनी सामूहिक प्रयत्नातून त्याला वेसन घालण्यास यश मिळवले होते. आता कोरोनाचे आव्हान पुन्हा चिंताजनक पातळीवर पोचलेले असताना आपल्याला धिरोधत्तपणे सामना करावा लागणार आहे.

निर्बंध कमी झाल्याने बहुतांश मंडळी मास्क घालण्यास कंटाळा करत आहेत. ही सवय सुधारण्याची गरज आहे. तपासणी करणे, बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्य मंडळींची ओळख पटवणे आणि त्याची तपासणी करणे, उपचाराची सोय करणे यासारख्या गोष्टी वेगाने करणे गरजेचे आहे. या माध्यमातून यापूर्वीही कोरोना नियंत्रित केला होता. रॅपिड टेस्टिंगवर फार विश्वास ठेऊ नये, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. काही राज्यांत याच प्रकारची तपासणी अधिक प्रमाणात केली जात आहे. त्याऐवजी आरटी पीसीआर तपासणीत भर देणे आवश्यक आहे. या तपासणीचे प्रमाण 60 ते 70 टक्के असणे गरजेचे आहे.

यासंदर्भात एक बाब लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे पहिल्या टप्प्यांत बाधित लोकांची संख्या महानगरात अधिक होती, परंतु आता मध्यम आकाराचे आणि लहान शहरात तसेच परिसरातील ग्रामीण भागात रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी तपासणी आणि उपचाराच्या सुविधा अपेक्षेपेक्षा कमीच आहेत. जर अशा ठिकाणी बाधितांची संख्या वेगाने वाढत असेल तर अडचणीत वाढ होऊ शकते. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना याबाबतीत सजग केले आहे. तरीही याकडे लक्ष दिले नाही आणि महासाथ ग्रामीण भागात पसरली तर त्यावर नियंत्रण मिळवणे कठिण जावू शकते. म्हणूनच या भागात तपासणी केंद्राची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागात उपचाराची सोय पुरेशी होत नसेल तर रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे अपेक्षित आहे. संसर्गाचा नवा स्ट्रेन हा कितपत पातळीपर्यंत धोकादायक आहे आणि त्याला कसे रोखता येईल यावर सध्या देशभरात चर्चा होत आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी नमुने गोळा करण्याची आणि मोठ्या प्रयोगशाळेत पाठवण्याची व्यवस्था अधिक सक्षम आणि वेगवान करायला हवी. देशातील सुमारे डझनभर प्रयोगशाळेत संसर्गाच्या नमुन्याची चाचणी आणि विश्लेषण करता येऊ शकते. चाचण्या आणि विश्लेषण लवकर केले तर संसर्गाबाबतची अधिकाधिक माहिती आपल्याजवळ गोळा होऊ शकते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण अभियानावरुन ज्या गोष्टी मांडल्या आहेत, त्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. निश्चित ध्येयानुसार आगामी काही काळात कोट्यवधी नागरिकांना लस द्यायची असेल तर आताच त्याचा वेग दुपटीने वाढवणे आवश्यक आहे. गेल्या आठवड्यात सरासरी दररोज 12.6 लाख डोस देण्यात आले. हा आकडा समाधानकारक नाही. तो वाढवण्यासाठी सरकारी रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालय आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन काम करायला हवे. यासंबंधात आणखी एक गोष्ट सांगणे महत्त्वाचे आहे, ते म्हणजे डोसच्या बाटलीचा योग्य वापर.

एकदा ही शीशी वापरात आणली की त्याचा त्याच दिवशी उपयोग करावा लागतो. पुढच्या दिवशी त्या औषधाचा परिणाम होत नाही. शीशीतील संपूर्ण औषधाचा वापर लगेचच केला गेला तर लशीच्या उत्पादन प्रक्रियेवर वाढता दबाव कमी होऊ शकेल आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ती लस पोचू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लशीचा अपव्यय रोखण्याचे आवाहन केले आहे. यासाठी लोकांनी लस घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला कौशल्यतेने हाताळण्यासाठी प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम करणे गरजेचे आहे, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

ज्या ठिकाणी चाचण्या कमी आहेत, तेथे संसर्गवाढीचा वेग अधिक असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी लसीकरणाची मोहीम संथ आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर हालचाली करुन ही समस्या निकाली काढणे गरजेचे आहे. महासाथ रोखण्यासाठी कोरोना वॉरियर्स वर्षभरापासून प्रयत्न करत असून त्यांनाही आराम देणे गरजेचे आहे. आरोग्य कर्मचार्‍यांसह अन्य कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणखी काही प्रयत्न करावे लागतील. त्यांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया देखील सुरू ठेवणे आवश्यक आहे.

आपण महासाथीच्या दुसर्‍या टप्प्यात लवकर नियंत्रण मिळवले तर ही बाब चांगली राहू शकते. ज्या भागात कोरोना पसरण्याची भीती आहे तेथे साधनसामग्रीचा अभाव आहे. परिणामी कोरोना अनियंत्रित झाल्यास स्थिती बिघडू शकते. 1918 मध्ये तापेची दुसरी साथ ही भयंकर सिद्ध झाली होती. त्यात मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाले होते. आजारपण त्रासदायक होते आणि मृतांची संख्या देखील अधिक होती. सध्या युरोप याच स्थितीतून जात आहे. त्यामुळे आपण सजग आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

(लेखक आयसीएमआरच्या संक्रमण विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या