Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedजलवाहिनी लालफितीत

जलवाहिनी लालफितीत

मनमाड । बब्बू शेख | Manmad

एक म्हण आहे कि सरकारी काम आणि सहा महिने थांब याचा प्रत्यय आता नागरिकांसोबत मनमाड (manmad) नगरपरिषद प्रशासनाला (Municipal administration) देखील येत असून शहराला पाणी पुरवठा (Water supply) करणारी मुख्य जलवाहिनीची (Main aqueduct) तांत्रिक मंजुरी गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (Maharashtra Jeevan Pradhikarana) लालफितीत अडकली आहे त्यामुळे धरणात पाण्याचा मुबलक पाणीसाठा असून देखील केवळ जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदारपणामुळे कृत्रिम पाणी टंचाईला (Artificial water scarcity) तोंड देण्याची वेळ शहरातील सव्वालाख नागरिकांवर आली आहे.

- Advertisement -

शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या वागदर्डी धरणातून (Vagdardi dam) पाणी पुरवठा केला जातो, धरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून (Water Treatment Plant) पाईप लाईनच्या माध्यमातून शहरातील विविध भागात असलेल्या टाक्यांमध्ये पाणी आणल्यानंतर त्या-त्या भागात पाणी पुरवठा केला जातो मात्र गेल्या काही वर्षात शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून नवीन वसाहती देखील निर्माण झाल्या आहेत त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी धरणातून येणारी मुख्य पाईप लाईन अपुरी पडत असल्याचे पाहून पालिका प्रशासनाने वागदर्डी धरण ते घोडेपीर बाबाच्या दरगाहपर्यंत आणखी एक नवीन पाईप लाईन टाकण्याचा निर्णय घेतला.

सुमारे 2 कोटी 75 लाख रुपयाचे अंदाज पत्रक असलेली ही पाईप लाईन 800 एमएमची असून 14 व्या वित्तीय आयोगाच्या निधीतून (fund) ही पाईप लाईन टाकली जाणार आहे. अंदाज पत्रक तयार केल्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे त्याला मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे मात्र सहा महिन्याचा कालावधी उलटून देखील जीवन प्राधिकरणाने अद्यापही तांत्रिक मंजुरी दिली नाही त्यामुळे शहरासाठी महत्वाची असलेली पाण्याची पाईप लाईन जीवन प्राधिकरणाच्या लालफितीत अडकून पडली आहे.

गेल्या तीन वर्षापासून सलग जोरदार पाऊस होत असल्यामुळे वागदर्डी धरण यावर्षी देखील तुडुंब भरून ओव्हर फ्लो झाले आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे पाणी टंचाईतून आपली सुटका होईल असे नागरिकांना वाटत होते मात्र धरणात पाण्याचा मुबलक साठा असताना देखील पालिका प्रशासनातर्फे 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.

मध्यंतरी शहरात 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही जर नवीन पाईप लाईन टाकली गेली तर शहरात 15 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा हा 8 दिवसा आड नक्कीच होईल असे मत पाणी पुरवठा विभागातील तज्ञानी व्यक्त केले. त्यामुळे आता जीवन प्राधिकरण पाईप लाईनला तांत्रिक मंजुरी कधी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या