Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedपिंपळगावला कमळाचे कोंदण

पिंपळगावला कमळाचे कोंदण

पिंपळगाव दा. । वाल्मिक पगार | Hatgad

मालेगाव तालुक्यातील (malegaon taluka) पिंपळगावच्या (pimpalgaon) भुमीपूत्रांनी विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वाने नावलौकिक संपादन केला आहे. याच गावानजीक मुंढर्‍या डोंगरावर श्रीक्षेत्र गंगासागर महाराजांचे (Shrikshetra Gangasagar Maharaj) भव्य मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात वसले आहे.

- Advertisement -

या डोंगरातूनच उगम पावलेल्या लेंडी नदीच्या पात्रात हजारोच्या संख्येने कमळाची फुले उमललेली असून हे कमळागार सध्या परिसरातील ग्रामस्थांसह निसर्गप्रेमींचे आकर्षण ठरले आहे. निसर्गाचा हा मनमोहक नजारा पिंपळगावचे सौंदर्य खुलवतांनाच पर्यटकांनाही आनंद देणारा ठरत आहे. मालेगाव शहरापासून 25 कि.मी. अंतरावर दाभाडी-रावळगाव रस्त्यावर असलेले पिंपळगाव शेकडो वर्षापुर्वी पिंपळवृक्षांनी बहरलेले होते. त्यावरूनच कदाचित या गावास ‘पिंपळगाव’ असे नामकरण प्राप्त झाले असावे.

कालांतराने पिंपळाची झाडे कमी झाली असली तरी गावातील तरूणांनी एकत्र येत पिंपळवृक्षांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी जुनी पिंपळाची झाडे जोपासली आहे. गावाच्या प्रवेशव्दार परिसरात व मुख्य चौकात पिंपळवृक्ष रोपाची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. व्यक्तीविशेषांच्या कर्तृत्वामुळेही पिंपळगावने जिल्ह्यात आपला ठसा उमटविला आहे.

जिल्ह्याच्या राजकीय (Political), सामाजिक (social), शैक्षणिक (Academic), प्रशासकीय (Administrative), वैद्यकिय (Medical), संरक्षण, धार्मिक अशा विविध क्षेत्रांबरोबरच कृषिक्षेत्रात (agriculture Sector) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करित येथील भुमीपूत्रांनी जिल्ह्यात व राज्यात वेगळा ठसा उमटविलेला आहे.

विविध क्षेत्रातील प्रगतीने समृध्द असलेल्या या गावास लेंडी नदीपात्रातील कमलागारामुळे सौंदर्याची वेगळी किनारही प्राप्त झाली आहे. पाच हजार लोकसंख्येच्या या गावातील वातावरण पिंपळवृक्ष, डोंगरदरी व बागायती क्षेत्रामुळे रमणीय असून त्यात पिंपळफुलांनी गावाच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे.

पिंपळगावजवळील लेंडी नदीपात्रात गावातील तरूण श्रीधर पवार, लोटन पवार यांनी गिसाका येथून कमळ फुलाचे बीज उपलब्ध केले होते. ग्रामपंचायतीचे सेवक भरत पवार, समाधान पवार व इतर तरूणांनी खोल नदीपात्रात उतरून स्वखर्चाने कमळाचे बीजारोपण केल्यानंतर कमळ फुले उमलली लागली.

प्रारंभी अवघे एक फुल नदीपात्रात डोलतांना दिसत होते. त्यात दरवर्षी आठ ते दहा फुलांची वाढ होत गेली आणखी टप्प्याटप्प्याने शेकडो कमळाची फुले उमलली. 2018 मध्ये ग्रामपंचायतीमार्फत नदी स्वच्छता उपक्रमांतर्गत नदीपात्रातील गाळ काढण्यात आला त्यावेळी कमळाची झाडे व फुले नाहिशी झाली होती.

परंतू निसर्गाच्या पुनर्निर्मिती शक्तीच्या बळावर पुन्हा कमळाची झाडे बहरली आणि फुले उगवण्यास सुरवात झाली. 2020 पासून तर नदीपात्रात शेकडो कमळाची फुले बहरायला सुरवात झाली आणि संपुर्ण नदीपात्राने कमळाच्या फुलांचा साज पांघरला. जवळच नदीचे उगमस्थान असलेला मुंढर्‍या डोंगर आहे. पर्जन्यमान चांगले झाल्यास नदी बारमाही वाहते.

नदीपात्रात वर्षभर ओलावा टिकून राहतो त्यामुळे कमळागार समृध्द झाले आहे. कमळाची टवटवीत फुले पाहून ग्रामस्थ आनंदीत होतात. शिवाय गावी येणार्‍या नागरीकांनाही निसर्गाचा हा अविष्कार पाहून आनंद होतो. निसर्गनिर्मित या चमत्काराने निसर्गप्रेमी भारावून जातात. त्यामुळे व्यक्तीविशेषांमुळे समृध्द झालेल्या पिंपळगावच्या सौंदर्यात कमळागाराच्या नैसर्गिक अविष्काराने आणखी भर घातली आहे, हे विशेष.

- Advertisment -

ताज्या बातम्या