Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedवर्ष संपले; तेजी कायमच!

वर्ष संपले; तेजी कायमच!

– संदीप पाटील, शेअर बाजार अभ्यासक

कोरोना महामारीमुळे ऐतिहासिक ठरलेल्या 2020 या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातील शेअर बाजारातील तेजी मात्र गेल्या 7-8 आठवड्यांप्रमाणेच पुढेही कायम राहील. उलट नवीन वर्ष हे नव्या आकांक्षांबरोबरच नवी उड्डाणे, नवे विक्रम प्रस्थापित करणारे ठरेल.

- Advertisement -

कारण भारतीय अर्थव्यवस्थेची वेगवान घोडदौड आणि भारतासह एकंदरीतच पूर्वेकडील देशांत कोरोनाचा कमी होत चाललेला विळखा. तथापि, मागील आठवड्याप्रमाणे एखादी नकारात्मक बातमी बाजार हलवून सोडू शकते. त्यामुळे सावध राहा, पुढे चला हे सूत्र अवलंबणे गरजेचे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍या सर्वच गुंतवणूकदारांसाठी 2020 हे वर्ष अविस्मरणीय ठरले. या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात बाजाराची वेगाने घोडदौड सुरु असताना अचानकपणाने कोरोनाचे महासंकट आले आणि लॉकडाऊनमुळे बाजारातील चमक गायब होऊन अंधार पसरला. या काळोखातून बाजार कसा सावरणार, तेजीची पहाट कधी होणार असा प्रश्न बरेच सप्ताह कायम राहिला; पण गेल्या दोन अडीच महिन्यांत कोरोनाच्या काळरात्रीतून शेअर बाजार आणि गुंतवणूकदार पूर्णपणाने बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

पण तरीही कोरोनाचे संकट टळलेले नाही. याची झलक गेल्या आठवड्यात पहायला मिळाली. ब्रिटेनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे पसरलेल्या घबराटीचा मोठा फटका गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच बसला. पण सात लाख कोटींहून अधिक नुकसान करणारा हा फटका बसूनही पुढील तीन दिवसांतच बाजार पूर्वपदावर आला. यातून कोरोनाच्या संकटाचा फारसा परिणाम आता बाजारावर होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. गुरुवारी सप्ताहाअखेरीस बाजार बंद होताना सेन्सेक्स 529 अंकांनी वाढून 46,973 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 148 अंकांनी वाढून 13,749 अंकांवर बंद झाला.

या दिवशी एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या समभागात वाढ झाल्याने निर्देशांकाला आधार मिळाला. याखेरीज अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, कोटक बँक, एअरटेल आदी कंपन्यांचे समभागही वधारले. एकीकडे भारतीय अर्थव्यवस्थेबाबतच्या सुवार्ता आणि

अमेरिकन संसदेने जाहीर केलेले 900 अब्ज डॉलर्सचे पॅकेज यामुळे तीन दिवसांतच निर्देशांकाचा घसारा भरून निघाला.

शेअर बाजाराने कोरोनाकाळावर मात करत घेतलेल्या भरारीमध्ये एफआयआयचा वाटा मोठा आहे. नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदाच एका महिन्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 50 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर चालू आठवड्याचा विचार करता तो दोन अंगांनी करायला हवा. एक म्हणजे या आठवड्यात कोणत्या समभागात तेजी दिसून येऊ शकते त्यावर लक्ष ठेवणे आणि दुसरे म्हणजे 2021 या येणार्‍या नववर्षात कोणकोणते समभाग तेजीत राहतील याचा विचार करुन त्यानुसार त्यांची आताच खरेदी करुन ठेवणे. यादृष्टीने पाहता फार्मा आणि आयटी या क्षेत्रातील चढती भाजणी कायम राहणार असल्याने इन्फोसिस, विप्रो, अ‍ॅलेम्बिक, डॉ. रेड्डी, सिप्ला, विप्रो यांसारख्या कंपन्यांचे समभाग खरेदी करणे निश्चितच फायद्याचे ठरेल.

याखेरीज केंद्र सरकारने डीटूएच परवान्याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे आणि या क्षेत्रातील कंपन्यांना 100 टक्के एफडीआय आणण्यास मंजुरी दिल्याने हॅथवे, हॅथवे केबल, जीटीपीएल यांसारख्या कंपन्यांचे समभाग तेजीत राहतील. यामध्ये डिश टीव्हीचाही समावेश आहे. मात्र या कंपनीच्या समभागांचा ट्रेंड लक्षात घेऊनच गुंतवणूक करावी. वेदांता कंपनीमध्ये प्रमोटर्सनी 4.98 टक्के स्टेक खरेदी केल्याने या कंपनीचे समभाग चांगलेच वधारले आहेत. या समभागांची खरेदीही फायदेशीर ठरेल.

दीर्घकालीन विचार करता म्हणजेच 2021 या वर्षभराचा विचार करता बर्गर किंग, झी एंटरटेन्मेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, रेमंड इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, एक्साईड इंडस्ट्रीज, गोदरेज प्रॉपर्टीज आणि ल्युपिन या कंपन्यांचे समभाग हमखास चांगला परतावा देणारे आहेत. काही विश्लेषकांच्या मते, 2021 मध्ये इन्फोसिसचा समभाग 2000 रुपयांची पातळी गाठेल; तर रिलायन्स इंडस्ट्रीज 2800 रुपये, आयटीसी 325, रेमंड 550, टेक महिंद्रा 1500, एक्साईड इंडस्ट्रीज 280, गोदरेज प्रॉपर्टीज 2000 आणि ल्युपिन 1400 च्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो. याखेरीज कल्याणी स्टीलचा समभाग 268 रुपयांवर असून तो वर्षभरात 325 रुपयांपर्यंत पोहोचेल. युनायटेड फॉस्फरस (युपीएल) या कंपनीचा समभाग 449 रुपयांना आहे. मात्र हा समभाग 42 टक्क्यांनी वधारुन 632 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

स्ट्राईडस फार्मा सायन्स हा समभाग सध्या 860 रुपयांनजीक आहे. तो 26 टक्क्यांनी वधारुन 980 पर्यंत झेप घेऊ शकतो. भारती एअरटेलचा समभागही येत्या तीन महिन्यांत 516 वरुन 600 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज आहे.

नव्या वर्षांंत मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या समभागांचे स्टार चमकतील असा अंदाज सर्वच जण व्यक्त करत आहेत. त्यानुसार मिडकॅपमधील बालकृष्णा इंडस्ट्रीज, एल्केम, एक्जो नोबल, तर स्मॉल कॅपमधील हेरिजेट फूडस, ग्रीन पॅनेल, बजाज कंझ्युमर्स यांसारख्या समभागांची खरेदी फायद्याची ठरेल. बजाज फायनान्स हा 4790 रुपयांचा समभाग 2021 मध्ये 5900 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आयसीआयसीआय बँकेचा समभागही 600 रुपये टार्गेट ठेवून खरेदी करणे फायद्याचे ठरेल.

एकंदरीतच शेअर बाजाराची यापुढील वाटचाल आणखी काही आठवडे चढतीच राहील. तथापि, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे जर संक्रमण वेगाने झाले तर कदाचित बाजारात एखादे मोठे करेक्शन येऊ शकते. त्यामुळे जोखीम पत्करण्याची आपली क्षमता तपासून गुंतवणूक करा आणि निश्चित फायदा मिळवा.

- Advertisment -

ताज्या बातम्या