Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedजगाला चार दशकांपासून एड्सचा विळखा

जगाला चार दशकांपासून एड्सचा विळखा

प्रा.डॉ.पी.एस.लोहार

ऑगस्ट 1987 मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात जागतिक एड्स दिनचा संकल्पना मांडला. डॉ. मन् यांचा सहमती नंतर 1 डिसेंबर 1988 पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला.

- Advertisement -

सायन्स जनरल’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखानुसार अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम (एड्स)ची उत्पत्ती आफ्रिकेतील किन्शासा शहरात (आताच्या कॉन्गो गणराज्यात) झाली. येथे बुशमीट (जंगली प्राण्यांचे मांस विक्री) ची मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे संक्रमित झालेल्या रक्तामुळे हा वायरस मनुष्याच़्या शरीरात आला असण्याची शक्यता आहे. या वायरसने चिंपांजी, गोरिल्ला आणि शेवटी माणासाच्या शरिरात प्रवेश केला व हा वायरस जगभरात पसरला.1981 पासून समलिंगींचा आजार अशी ओळख बनलेल्या या व्हायरसने कुणाला कळायच्या आतच अमेरिका आणि आफ्रिका खंडात थैमान घालायला सुरुवात केली. अमेरिकेत त्याचे ‘गे प्लेग’ असे वर्णन केले गेले. 1986 पासून भारतात शरीरविक्रय करणारया महिलांचा रोग म्हणून एड्सची लोकांना ओळख झाली. 1987 उजाडेपर्यंत तब्बल 40 हजार अमेरिकन नागरिक एचआयव्ही- एड्सला बळी पडले होते. दक्षीण आफ्रिकेच्या त्या वेळच्या परराष्ट्रमंत्र्याने ‘द टेररिस्ट्स आर नाउ कमिंग टू अस वुइथ अ व्हेपन मोअर टेरिबल दॅन मार्क्सिझम : एड्स’ असा इशारा दिला. 2015 पर्यंत एड्समुळे सुमारे 6 कोटी लोकांचा बळी गेला. एकट़या भारतात 2019 मध्ये एड्स रुग्णांची संख्या 6,85 ,000 पर्यंत येऊन पोहोचली.

ऑक्सफर्ड आणि बेल्जियम विद्यापीठाच्या संशोधन चमूने एड्सच्या फॅमिली ट्रीची पुनर्रसंरचना करण्याचा प्रयत्न केला.अमेरिकेतील बोस्टन महाविद्यालयाचे वेलकिन जॉन्सन व त्यांच्या सहकार्‍यांनी अंतर्गत रचना सतत बदलणार्‍या लेंटिव्हायरसेस (रेट्रोव्हायरसेसचा एक प्रकार) या विषाणूंचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.आफ्रिकेतील नर वानरांमध्ये हे विषाणू 1.60 कोटी वर्षांपासून अस्तित्वात होते असेही नवीन अभ्यासात निष्पन्न झाले आहे.

एड्समुळे समाजात भीतीचे, दहशतीचे वातावरण पसरले. नातेवाइक सोडाच; पण डॉक्टरही पॉझिटिव्ह व्यक्तींना झिडकारू लागले. मृतदेहांची विटंबना होऊ लागली. त्याच सुमारास अमेरिकेत हॉलिवूड अभिनेता रॉक हडसन (1985), बास्केटबॉलपटू मायकल ‘मॅजिक’ जॉन्सन (1991)आदींनी निर्धाराने आपले एड्स स्टेटस जाहीर केले.

संयुक्त राष्ट्रसंघाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून यूएनएड्सची स्थापना (1996) केली. बिल आणि मेलिंदा या गेट्स दाम्पत्याने रोगाची व्याप्ती ओळखून पुनर्वसन आणि संशोधनासाठी आपल्या कमाईतला मोठा हिस्सा जाहीर केला. त्यापाठोपाठ बिल क्लिटंन, रिचर्ड गेर, नेल्सन मंडेला आदींनी एड्सविरोधी मोहिमेत आपला सहभाग नोंदवल्याने विचार आणि कृतीची दिशा बदलून टाकणा-या वैश्विक बांधिलकीच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. महाभयंकर रोग असलेल्या एड्स आणि एचआयव्ही संसर्गाबाबत मोठ़या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. यासाठीच 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स निर्मूलन दिन म्हणून पाळला जातो. गेल्या काही वर्षांपासून मोठ़या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले आहे. तरीदेखील अद्याप धोका कायम आहे. एचआयव्हीच्या संसर्गामुळे रक्तातील रोगप्रतिकारक पेशीं लिम्फोसाईट्स (सीडी 4)चे प्रमाण घटल्याने पीडितांची रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी, खोकल्यासारखा साधा तसेच क्षयासारखा भयंकर रोग होतो. एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत 8 ते 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एच.आय.व्ही. ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते. एड्स हा आजार प्रामुख्याने लैंगिक मार्गातून पसरतो. यामुळे आपला आजार सर्वांपुढे येऊ नये असे रूग्णाला वाटत असते.

समाजाचा दृष्टीकोन आणि रुग्णांची भीती यामुळे एड्स झाल्याचे निदान झाल्यावर सर्वात पहिली प्रतिक्रिया निराशेची, भीतीची आणि रोग लपवण्याची होते. एड्सचा संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधातून, बाधित रक्तातून, बाधित आईकडून अर्भकाला व संक्रमित इंजेक्शनच्या सुई द्वारे होतो. एचआयव्हीची लागण झालेली व्यक्ती बाह्यांगावरुन ओळखू येत नाही म्हणून प्रयोगशाळेत रक्तचाचणी करूनच याचे निदान करता येते. सर्वसाधारणपणे एलिसा टेस्ट व रॅपिड टेस्ट या दोन चाचण्यांनी निदान केले जाते. एड्सच्या रुग्णांवर सरकारी रुग्णालयात एआरटी म्हणजे अँटिरिट्रोव्हारल थेरपी द्वारे उपचार केले जातात. तसेच विषाणुविरोधक औषधींचा वापर केला जातो. सिपला ची ट्रायोम्यून व इतर अँटीव्हायरल औषध महाग आहेत आणि हे प्रत्येक जागी सहज मिळत नाही. याच्या सेवनाने आजार नियंत्रणात येतो पण संपत नाही.जर या औषधांना घेणे थांबवले तर आजार परत वाढतो म्हणून एकदा आजार झाल्यावर हे आयुष्य भर घ्यायला लागतात.जर औषध बंद केले तर आजाराचे लक्षण वाढते व एड्स ने ग्रस्त व्यक्ति चा मृत्यू होतो.एड्सच्या रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा क्रमांक संपूर्ण जगात तिसरा आणि आशिया-पॅसिफिकमध्ये दुसरा आहे, असं दिसून आलं.

सद्य परिस्थितीत एड्स असो वा कोव्हीड-19 या व्याधींवर 100 टक्के सुरक्षित,परिणामकारक व प्रमाणित लस नाही. एचआयव्ही सारखाच कोरोना व्हायरस देखील अनेक वर्षे टिकून राहील असे तज्ञांचे मत आहे.

गेल्या चार दशकांपासून जगाला सतावणारा एड्स व कोरोनाग्रस्तांच्या संख्येचा आणि त्यामुळे मृत्यू पावलेल्या आकडेवारीच्या जास्त विचार न करता हताशपणे मानवाने या आजारांचे ’आजारपण’ वाढु न देता रोगांबद्दलची आपली जागरुकता व माहिती वाढवली पाहिजे.योग्य त्या नियमांचे पालन करून सर्कतेने जीवनाचा आनंद घ्यावा.

(लेखक चोपडा महाविद्यालयातील विज्ञानाचे वरीष्ठ प्राध्यापक असून विद्यापीठात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या