Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedमैत्रीचा शब्दोपचार

मैत्रीचा शब्दोपचार

मोठ्या ऊमेदीने दिलाशाचे दोन शब्द द्यायला निघालेला तो मित्र, त्या तरुणाचं म्हणणं ऐकुन सुन्नच झाला. कुणाच्या तरी दूःखावर फुंकर मारण्यासाठी सेवाभाव म्हणुन विनामुल्य सुरु असलेल्या या यज्ञावर पाणी फिरते की काय असे वाटुन, त्याला घेरीच आली, कारण तो तरुण म्हणतो तेच बरोबर आहे असे त्याला पटायला लागले.

सांगणं…बोलणं…ऊपदेश करणं हे खुप सोप्पं असतं यार…

- Advertisement -

पण संकटाच्या काळ्याशार अंधारातुन ऊजेडाची तिरीप शोधुन काढतांना काय वेदना होतात हे जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे. अशा पोक्कळ शब्दांना कोण ओळखतो? दुसर्‍या गृहस्थाने त्या तरुणाचीच बाजु ओढली. तसा हा मित्र अधिकच खचला.

सांगत होतो तुला…बस्स कर या लष्कराच्या भाकऱ्या भाजणं..रिकामचोट सारखं एकाद्या प्रश्नावर विचार मंथन करायचे आणि घसा खरडुन जीवाच्या आकांताने वेगवेगळी उदाहरणे देत पटवायचे.काय गरज पडली रे तुला?

कोण ऐकतं हे? कोण आचरणात आणतं? संकटावर मात करण्याची ऊपजत शक्तीही दिलेली असते निसर्गाने माणसाला? सोबत आलेल्या दोस्तारनेही त्या दोघांची री ओढली. आधीच त्या तरुणाचा असहकार आणि आता ज्याला ढाल म्हणुन सोबत नेले होते त्यानेच केलेला असा वार,यात तो मित्र पुरता घायाळ झाला,

थोडावेळ शांत राहिला.

दुसर्‍यांच्या दुःखाच्या वेळी सोबत राहुन त्यांना दिलासा देण्याचे सेवाव्रत जपुन निःस्वार्थपणे सुरु केलेल्या या यज्ञावर पाणी फेरले जाईल की काय? या विचाराने तो ओशाळला. निरपेक्ष पणे अंगीकारलेल्या या सेवाव्रताला मान, भाव व मोल नसतेच याची प्रचिती कोळुन प्यालेल्या तो त्या तरुणाला एवढच म्हणाला, अरे वेड्या.. खरं आहे हे सर्व..

पण दोस्त बिरादरांचे हे शब्द पोकळ नसतात रे. ते नुसतेच शब्द नसतात. ते मोठमोठ्या भेगांना भरणारे सिमेंट असतात. मोठमोठ्या ढासळणार्‍या बुरुजांचे टेकु असतात. मोठमोठ्या भगदाडांना बुजणारे भराव असतात. हेच शब्द फाटलेल्या अंतःकरणाला टाके टाकणारे असतात. दवाखान्याच्या पायरीवर हताश झालेल्या रुग्णांना आणि नातेवाईकांना नवसंजीवनी असतात.

मित्राच्या दोन शब्दांच्या फुंकरीने मोठमोठे घाव भरुन जातात. दाहक दाहही शमतो. दिलासाचे, मार्ग दाखवणारे, ऊभारी देणारे हे शब्द म्हणजे औषधासारखेच असतात. औषधोपचाराने बर्‍या होणार्‍या रुग्णाला या शब्दोपचारांचीही जोड मिळते.

तुला काहीच होणार नाहीया मित्रांच्या शब्दानेही रुग्णाला बरे वाटते, मग असे शब्द आपण का देऊ नये. त्याला पैसे पडत नाही, कुणीतरी आपल्या सोबत आहे. या भावनेनेही माणसं सुखावतात. दवाखान्याच्या गंभीर वातावरणात बुडत्याला काडीचाही आधार होतो. म्हणून हे शब्द खर्चले पाहिजेत.. मैत्रीची गरज व मैत्रीची पारख अशाच वेळी भासते.

फक्त ही मैत्री मनापासुनची असावी, निखळ निर्मळ असावी एवढच.. आणि हो …हे करतांना हे शब्द आपण समोरच्यालाच सांगत नाही..ते आपणच आपल्याही सांगत असतो. आपणच आपल्याला ऐकवत असतो.आपणच आपले समुपदेशन करत असतो.कारण आपणही कधीकाळी खुप खचलेले असतो.

या खचलेल्या बुरुजाला कोण लिपणार? आपणही कधी काळी पिडीत असतो, म्हणून माणसाने स्वतःच स्वतःचा मित्र बनावं. समुपदेशक बनावं. स्वतः सारखा गुरु, स्वतः सारखा सखा, स्वतः सारखा समिक्षक व स्वतःसारखा मित्र कुणीच नसतो.

स्वतःची दुःखे स्वतःलाच जास्त कळतात म्हणून स्वतःचा डॉक्टर स्वतःच बनण्यासाठी व स्वतःच्या वेदनांवर स्वतःच फुंकर मारणेसाठी हा शब्द जंजाळ! म्हणून हे करायचं रे राज्या., मित्राचेही काम व आपलेही काम होते. आमके आम व गुटली के भी दाम, औषध उपचारांईतकेच हे श ब्दोपचार फायद्याचे ठरतात. दुसर्‍यांना दिलेल्या शब्दांनी आपल्यालाही बळ मिळते.

दुसर्‍याला अत्तर लावतांना आपलाही हात सुगंधीत होतो, हाच आपला नफा समजायचा वेड्या!

या नफ्याला व्यवहारी जगात मोल नसेलही, पण आपल्यासाठी अनमोल असतो.अशा शब्दांच्याच गुच्छाने मैत्री फुलते, या शब्दांनीच मैत्री रंगते. फक्त एक, ही मैत्री निःस्वार्थ असावी.नितळ असावी,निर्मळ, निर्भिड, निर्भेळ असावी.चल आज मैत्र दिनानिमित्त आता आपणच मित्र बनु या, मित्र दिनाच्या शुभेच्छा देऊ या.

हे बोलणं ऐकुन तो मघाचा संतापलेला तरुण चुपच बसला,आणि खुद् कन हसला, स्वतःच स्वतःचा मित्र बनतांना एक मित्र मला मिळाला. वयाचे अंतर असले तरी. मैत्रीत कसलं आलं वय? कुण्या शायराने म्हटलं आहे. ये कंबख्त दोस्त उम्रकी चादर खीच लेते है.. बुढाही होने नही देते. बडे जालीम होते है ये दोस्त…. अल्फाजसे ईलाज करते है!

- Advertisment -

ताज्या बातम्या