Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedलस आली पण कोरोना विषाणू लगेच जाणार नाही

लस आली पण कोरोना विषाणू लगेच जाणार नाही

प्रा.डॉ.पी.एस.लोहार

भारतात अखेर दोन टप्प्यात कोरोना लसीचे ड्राय रन घेऊन प्रत्यक्षात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात झाली. देशात सध्या भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ आणि ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची ‘कोविशिल्ड’ या तिसर्‍या टप्प्यावर असलेल्या दोन लशीना केंद्राने आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

- Advertisement -

आरोग्य कर्मचार्‍यांना आणि प्रत्यक्ष आघाडीवर कार्यरत असणार्‍या कोविड योध्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे, साधारणपणे 3 कोटी इतकी ही संख्या असलेल्या 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षाखालील काही इतर आजार असलेल्या व्यक्तींना लसीकरण केले जात आहे, ही संख्या अंदाजे 27 कोटी आहे, अशांना लसीकरण दिले जात आहे. लसीकरण अधिक प्रभावी ठरण्यासाठी, विषाणूचा खात्मा करण्यासाठी, त्यात होणार्‍या म्यूटेशन (उत्परीवर्तन)द्वारे नवीन स्ट्रेनची निर्मितीस प्रतिबंध घालणे खूप महत्वाचे आहे.

लसीकरणाचा साठा, त्यांच्या साठवणुकीचे तापमान आणि कोविड -19 ची लस घेणार्‍या लाभार्थ्यांचा वैयक्तिक पाठपुरावा अशी सर्व माहिती युनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पुरविली जात आहे. हा प्लॅटफॉर्म पूर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांचे स्वयंचलित सत्र वाटप, त्यांची पडताळणी आणि लसीचे वेळापत्रक यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र तयार करण्यासाठी सर्व स्तरातील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत करीत आहे.

लस ही शरीरात विषाणूच्या विरोधात अँटीबॉडी तयार करून विषाणूचा नायनाट करण्याचे काम करते. असे घडण्यासाठी बराच काळ व लसीच्या दोन डोसेसची आवश्यकता असते. लस घेतल्यानंतर त्याचे होणारे परिणाम यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यात आली आहे. सहा महिने ते वर्षभराचा कालावधीत सर्व सामान्य लोकांना टप्याटप्याने लस मिळू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 80% ते 90% लोकांना लस दिली तरच कोरोनाची साथ आटोक्यात येऊ शकेल

लस आली म्हणजे कोरोना विषाणू कायमस्वरूपी गेला किंवा कोव्हिडं-19 चा प्रकोप संपला हे लोकांचे अज्ञान खरे तर शासन आणि विविध सामाजिक संस्था, वैद्यक तज्ज्ञांनी प्राधान्याने दूर करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोव्हिड-19 मूळे अनेकांचे प्राण गेले, अनेक कुटुंबे उध्वस्त झाली. आता मास्क सुद्धा लावायची गरज नाही, बिनधास्त कुठेही फिरू शकतो ही लोकांची बेपर्वाई खरे तर भविष्यात धोकादायक ठरू शकते.विषाणू जितका लोकांमध्ये पसरेल तितकेच त्याच्या संरचनेत बदल होऊन नवीन स्ट्रेनची निर्मिती होईल.

म्युटेशनमुळे विषाणू अधिक स्मार्ट होऊन अधिक संसर्गजन्य होत आहेत, याची प्रचिती प्रगत देशात कोव्हिड-19चे वाढलेले प्रमाण व नव्याने सुरू झालेला लॉकडाऊन यावरून येते.सुदैवाने भारतात अजूनही दुसरी लाट सुरू झाली असली तरी ती तीव्र झाली नाही. पण लोकांची संपूर्ण बेफिकिरी आणि बेपर्वाई ही स्थिती आणू शकते असे अनेक वैद्यक तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

गेल्या डिसेंबर 2019 पासून चीन व प्रगत देशांसह आतापर्यंत एकूण 221 देशातील मानवजातीला कोरोना विषाणूने हैराण करून सोडले.

जानेवारी 2021 च्या तिसर्‍या आठवड्यात भारतात एका दिवसाला नव्याने 14,545 कोव्हिडं-19ने बाधितांची संख्येची भर पडून रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 6 लाखाच्या वर गेली तर मृतांचा आकडा 1लाख 53 हजारांच्या पार गेला. अजूनही देशात सार्स कोव्ही-2ने संक्रमीत 1,89,510 लोकांवर उपचार सुरू आहेत व जमेची बाजू म्हणजे 1कोटी 2 लाख 84 हजार रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोव्हिडं-19मूळे बरे होण्याचा दर 96.78% तर मृत्युदर फक्त 1.44% इतका असला तरी काळजी घेणे गरजेचे आहे.

1918मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्ल्यू या महामारीने तब्बल तीन वर्षे मुक्काम केला होता. मलेरिया, एड्स यासारख्या रोगांवर अजूनही प्रभावी लस नाही. पोलिओसाठी आजही लस घ्यावी लागते. कोणतीही महामारी ही दीर्घकाळ चालते.त्यामुळे कोरोनावर सुरू होत असलेल्या लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे, सिनिटायझरचा वापर करणे, साबणाने वारंवार हात धुणे यासारख्या नियमांचे प्रकर्षाने पालन केले तरच आपण कोरोना विषाणूंचा प्रकोप रोखू शकतो.

(लेखक चोपडा महाविद्यालयातील विज्ञानाचे वरीष्ठ प्राध्यापक असून विद्यापीठात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या