‘आयएनएस करंज’चे वेगळेपण

‘आयएनएस करंज’चे वेगळेपण

- श्रीकांत देवळे

लक्ष्यावर अचूक निशाणा साधून शत्रूला बरबाद करण्यात आयएनएस करंज ही पाणबुडी सक्षम आहे. त्याचबरोबर अँटी सर्फेस वॉरफेअर, गोपनीय माहिती मिळविणे, सुरुंग पेरणे आणि एरिया सर्विलान्स यांसारख्या लष्करी मोहिमा फत्ते करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुडी मानल्या जाणार्‍या आयएनएस करंजमध्ये असे एक खास तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात आले आहे, ज्याद्वारे शत्रुराष्ट्राच्या नौदलाला या पाणबुडीचा शोध घेणे शक्य होत नाही.

देशाचे संरक्षणकवच मजबूत करताना स्कॉप्रिन श्रेणीतील आयएनएस करंज ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात नुकतीच सामील करण्यात आली. युद्धसज्ज नौकांच्या ताफ्यात आयएनएस करंजचा समावेश झाल्याने नौदलाची ताकद आणि प्रहार क्षमता वाढली आहे. शत्रूसाठी आयएनएस करंज हे एक अत्यंत घातक असे अदृश्य आयुध ठरणार आहे. शत्रूसाठी ही पाणबुडी शोधून काढणे अवघडच नव्हे तर अशक्य आहे आणि ही पाणबुडी डोळ्याची पापणी लवण्याच्या आत दिलेल्या लक्ष्याच्या ठिकर्‍या उडवू शकते. आयएनएस करंज ही पाणबुडी 2018 मध्ये चाचणीसाठी पाण्यात उतरविण्यात आली होती. प्रत्येक चाचणीत ती अव्वल ठरली. कलवरी वर्गातील या तिसर्‍या पाणबुडीचे वैशिष्ट्य असे की, मोहिमेदरम्यान शत्रूच्या इलाख्यात असली, तरी शत्रूला तिची चाहूल लागू शकणार नाही.

कलवरी वर्गातील कलवरी आणि खंडेरी या पहिल्या दोन पाणबुड्या नौदलात आधीच सामील झाल्या आहेत. तिसरी पाणबुडी म्हणजेच आयएनएस करंज ही स्टेल्थ अँड एअर इंडिपेन्डंट प्रॉपल्शनसह अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी समृद्ध आहे आणि समुद्रात सलग 50 दिवस राहू शकते. एकाच वेळी ही पाणबुडी 12000 किलोमीटरचा प्रवास करू शकते. करंजची लांबी 70 मीटर, उंची 12 मीटर तर वजन सुमारे 1600 टन इतके आहे. दक्षिण चीन समुद्रात ज्या प्रकारे चीनच्या हालचाली वाढत आहेत, त्या पाहता भारतीय नौदलाला सागरी सुरक्षिततेची जबरदस्त तयारी करावी लागत आहे. कारण चीनकडून आखाती देशांकडे जाणारा सागरी मार्ग मलक्का स्ट्रेटमधून जातो. अशा स्थितीत दक्षिण चीन समुद्रात चीनने तोरा दाखविलाच तर भारताला मलाक्का स्ट्रेटमध्ये त्याचा रस्ता रोखावा लागेल आणि त्यावेळी शत्रूवर नजर ठेवण्यासाठी तसेच शत्रूवर हल्ला चढविण्यासाठी आयएनएस करंजची क्षमताच उपयोगी पडणार, हे निर्विवाद आहे.

कलवरी वर्गातील पाणबुड्यांव्यतिरिक्त भारतीय नौदलाकडे असलेल्या अन्य पाणबुडी डिझेल-इलेक्ट्रिक आणि एअर इंडिपेन्डंट प्रोपल्शन नसल्यामुळे त्या पाणबुड्यांना एक-दोन दिवसांनी समुद्राच्या पृष्ठभागावर यावे लागते. ही कमतरता आयएनएस करंज बनविताना भरून काढण्यात आली आहे. समुद्राच्या आत 350 मीटरपर्यंत ती डुबकी मारू शकते. कलवरी वर्गातील पाणबुडी समुद्राच्या आत 37 किलोमीटर प्रतितास वेगाने प्रवास करू शकते. खास वैशिष्ट्य असे की, आयएनएस करंजमध्ये शत्रूचे जहाज नेस्तनाबूत करण्यासाठी टॉरपीडो लावण्यात आले आहेत. याखेरीज ही पाणबुडी समुद्रात सुरुंग पेरून ठेवू शकते. त्यामुळेच आयएनएस करंज ही देशाची शान ठरली आहे. आयएनएस करंजमध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरून किंवा समुद्रतळातून टॉरपीडो आणि ट्यूब लाँच्ड अँटी-शिप मिसाइल (जहाजरोधी क्षेपणास्त्र) डागण्याची क्षमता आहे. आयएनएस करंज शत्रूच्या ठिकाणावर अचूक प्रहार करून शत्रूला नेस्तनाबूत करण्यास सक्षम आहे, असा दावा करण्यात आला आहे.

त्याचबरोबर अँटी सर्फेस वॉरफेअर, गोपनीय माहिती मिळविणे, सुरुंग पेरणे आणि एरिया सर्विलान्स यांसारख्या लष्करी मोहिमा फत्ते करण्याची क्षमता या पाणबुडीत आहे. स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुडी मानल्या जाणार्‍या आयएनएस करंजमध्ये असे एक खास तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात आले आहे, ज्याद्वारे शत्रुराष्ट्राच्या नौदलाला या पाणबुडीचा शोध घेणे शक्य होत नाही. ही एक अशी पाणबुडी आहे, जी दीर्घपल्ल्याच्या प्रवासासाठी ऑक्सिजन सोबत घेऊन जाऊ शकत असल्यामुळे त्यासाठी वारंवार समुद्राच्या पृष्ठभागावर येण्याची गरज नाही. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. भारतीय नौदलाकडे सध्या सिंधू प्रवर्गातील 9, शिशुमार प्रवर्गातील 3, कलवरी प्रवर्गातील 2 आणि आयएनएस चक्र ही एक आण्विक पाणबुडी अशा एकूण 15 पाणबुड्या आहेत. अरिहंत प्रवर्गातील दोन म्हणजे आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात या उपरोक्त 15 पाणबुड्यांपेक्षा वेगळ्या आहेत.

या दोन आण्विक बॅलेस्टिक पाणबुड्या आहेत. सध्या नौदल आपली क्षमता वाढविण्यासाठी स्कॉर्पिन प्रवर्गातील पाणबुड्यांवर ‘एअर इंडिपेन्डन्ट प्रोपल्शन’ प्रणाली प्रस्थापित करू इच्छिते. यामुळे दीर्घपल्ल्याच्या मोहिमेवेळी ऑक्सिजन घेण्यासाठी या पाणबुडीला समुद्राच्या पृष्ठभागावर वारंवार यावे लागणार नाही. आयएनएस करंज कार्यान्वित झाल्याबरोबरच भारताने ‘पाणबुडी तयार करणारा देश’ म्हणून आपल्या नावाची नोंद केली आहे. माझगाव डॉकयार्ड युद्धनौका आणि पाणबुडी बांधणी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या सरकारच्या उपक्रमांशी सुसंगत अशीच सध्याची या क्षेत्रातील वाटचाल आहे. आयएनएस करंज नौदलात सामील झाल्यानंतर देशाची सागरी ताकद अनेक पटींनी वाढणार आहे. आयएनएस करंज ही पाणबुडी ‘सायलेन्ट किलर’ म्हणून ओळखली जाते. कारण ही अजिबात आवाज न करता शत्रूच्या हद्दीत पोहोचते आणि शत्रूच्या नौका उद्ध्वस्त करू शकते.

आयएनएस करंज या नावामागील कहाणीही रंजक आहे. आयएनएस करंज या शब्दातील प्रत्येक अक्षराला एक अर्थ आहे. उदाहरणार्थ ‘के’ म्हणजे ‘किलर इन्स्टिंक्ट’, ‘ए’ म्हणजे आत्मनिर्भर भारत, ‘आर’ म्हणजे ‘रेडी’, ‘ए’ म्हणजे ‘अ‍ॅग्रेसिव्ह’, ‘एन’ म्हणजे ‘निंबल’ आणि ‘जे’ म्हणजे ‘जोश’. हे नाव करंजा बेटांवरून (जी उरण बेटे म्हणूनही प्रसिद्ध आहेत) घेतले आहे, असेही म्हटले जाते. हे रायगड जिल्ह्यातील एक शहर असून, मुंबई बंदराच्या आग्नेयेला आहे. यापूर्वी या श्रेणीच्या दोन पाणबुड्या म्हणजेच आयएनएस कलवरी आणि आयएनएस खंडेरी नौदलात सामील करण्यात आल्या आहेत. आयएनएस वेला या चौथ्या पाणबुडीच्या सागरी चाचण्या सध्या सुरू आहेत.

आयएनएस करंज पाणबुडीतून समुद्राच्या तळाशी आणि पृष्ठभागावर असताना टॉरपीडो आणि ट्यूब लाँच्ड अँटी शिप मिसाइल डागता येते. आयएनएस करंज अचूक नेम धरून शत्रूची ठिकाणे उद्ध्वस्त करू शकते, असा दावा करण्यात आला आहे.

ही पाणबुडी मिसाइल आणि टॉरपीडोने युक्त आहे. याखेरीज समुद्रात सुरुंग पेरून शत्रूला नामोहरम करण्याची क्षमताही या पाणबुडीत आहे. स्कॉर्पीन श्रेणीतील आयएनएस करंज ही पाणबुडी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे शत्रूला तिचा माग काढणे अशक्य आहे. या तंत्रज्ञानात अत्याधुनिक अ‍ॅकॉस्टिक सायलेन्सिंग तंत्रज्ञान, लो रेडिएटेड नॉइज लेव्हल, हायड्रो डायनॅमिकली ऑप्टिमाइज्ड आकार आदी बाबींचा समावेश आहे. पाणबुडी तयार करताना पाणबुडीचा शोध घेणार्‍या युद्धनौकांवरील तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे ही पाणबुडी अन्य पाणबुड्यांच्या तुलनेत खूपच सुरक्षित बनली आहे.

ही एक अशी पाणबुडी आहे, जिला दूरच्या मिशनवर जाताना ऑक्सिजन घेण्यासाठी वारंवार समुद्राच्या पृष्ठभागावर येण्याची गरज नाही. हे तंत्रज्ञान डीआरडीओच्या नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबने विकसित केले आहे. जुन्या पाणबुडीच्या तुलनेत आयएनएस करंजमध्ये एआयपी समाविष्ट करण्यात आले आहे. वास्तविक ज्यावेळी कोणतीही पाणबुडी बॅटरीवर चालवावी लागते, तेव्हा बॅटरी चार्ज करण्यासाठी तिला समुद्राच्या पृष्ठभागावर आणावे लागते. कारण डिझेल इंजिनच्या सहाय्याने बॅटरी चार्ज करण्यात येते आणि डिझेल इंजिन चालविण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. परंतु एअर इंडिपेन्डंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञानामुळे पाणबुडीची बॅटरी चार्ज करण्यासाठीही पृष्ठभागावर येण्याची गरज भासत नाही.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com