फुटबॉलचा थरार आणि भारत

फुटबॉलचा थरार आणि भारत

- नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

युरो चषकाच्या निमित्ताने जागतिक फुटबॉलप्रेमींचा थरार सार्‍यांनी अनुभवला. एकीकडे जगात फुटबॉलने आघाडी घेतलेली असताना आपण मात्र मागे जात आहोत. एकेकाळी आशिया खंडात भारतीय संघाचा दबदबा होता. 1950 मध्ये भारतीय संघाचा जागतिक फुटबॉल स्पर्धेत सहभाग होता होता राहिला. परंतु हा वारसा पुढे नेता आला नाही. जग पुढे गेले. साहजिकच ही कठीण परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे.

तोपर्यंत विश्चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय खेळाडू पाहणे चाहत्यांच्या नशिबात आहे का? आपल्या मातीतून एखादा मेस्सी जन्माला येईल का? एखादा रोनाल्डो, नेमार अशी दिग्गज मंडळी आपल्यातून पुढे येतील का? असे प्रश्न विचारले जात राहतील.

जगभरात फुटबॉलला कशामुळे लोकप्रियता आहे, याची झलक आपल्याला गेल्या रविवारी पाहवयास मिळाली. खेळाडूंची जिद्द, उत्साह, जिंकण्याचे ध्येय, वेगवान हालचाली, विरोधी संघाच्या खेळाडूंवर तुटून पडण्याचे कौशल्य जगाने युरो चषकाच्या निमित्ताने पाहिले. भारतीय चाहत्यांनी देखील रविवारची रात्र जागून काढली आणि युरोचा आनंद लुटला. भारतात फुटबॉलचे लाखो चाहते असताना या क्रीडाप्रकारात मात्र आपला देश चमकदार म्हणून पुढे आलेला दिसत नाही. फुटबॉलसारख्या लोकप्रिय खेळात मागे का आहोत, याचा प्रश्न सर्व भारतीयांना पडल्याशिवाय राहत नाही. जगाच्या नकाशावर भारतीय फुटबॉल नावालाही दिसत नाही. कोरोना काळामुळे

फुटबॉल प्रेमींना आणि खेळाडूंना आपल्या इच्छा, आकांक्षशांना बाजूला ठेवाव्या लागल्या. युरो कपसह फुटबॉलचे मोठे सामने देखील गेल्यावर्षी कोरोनामुळे होवू शकले नाही किंवा अर्धवट स्थितीत थांबवावे लागले.परंतु गेल्यावर्षीची कसर यंदा चाहत्यांनी आणि खेळाडूंनी भरुन काढली. जगभरात फुटबॉलचे कोट्यवधी चाहते असून विविध ठिकाणी झालेली ही शानदार स्पर्धा युरोपातच नाही तर जगभरातील चाहत्यांसाठी दिनचर्येची भाग बनली होती. फुटबॉलसारख्या रोमांचकारी खेळाला आपल्या आयुष्यातून बाजूला ठेवले तर काय होईल, हे कोरोनाच्या काळात दिसले. म्हणूनच यावर्षी हा उत्साह आणखीच द्विगुणित झाला होता.

लंडन हे फुटबॉल सामन्यासाठी कसे तयार होते, याबाबतीत प्रत्यक्षदर्शीच आपल्याला सांगू शकतात. रविवार सकाळपासूनच लंडनमध्ये उत्साहाचे वातावरण होते. वेम्ब्ले पार्क अंडरग्राऊंड स्टेशन हे थ्री लायन्स आणि स्वीट कॅरलाइनच्या धुनमध्ये वावरत होते. ब्रिटन-इटली यांच्यातील अंतिम सामन्यात लुक शॉच्या गोलने स्टेडियमध्ये एखादा स्फोट झाल्यासारखा भास झाला. यापासूनच जो जल्लोषाला सुरवात झाली ती सामना संपेपर्यंत दोन मिनिटे अगोदरपर्यंत कायम होता. पाच दशकांच्या खंडानंतर युरो चषक ब्रिटन जिंकेल असे वाटत होते, परंतु अचानक सामना फिरला. लिओनार्दी बोनिकीच्या गोलने सामना बरोबरीत आणला. त्यानंतर पेनल्टी शूट आऊटची बारी होती. फ्रान्सनंतर ब्रिटनला विजयाचे दावेदार मानले जात होते. परंतु पुन्हा तेच घडले. इटलीने अजिंक्यपद पटकावले. ब्रिटनवर शोककळा पसरली. चाहत्यांच्या पदरी निराशा पडली.

ब्रिटनचा पराभव हा खेळाडूंना आणि चाहत्यांना धक्का देणारा आहे. ब्रिटनच्या पराभवाचा उल्लेख करताना आपल्याला मेस्सीचा संदर्भ घ्यावा लागेल. अर्जेटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीने आपल्या कारर्किदीत अनेक विजय पाहिले आहेत. चारदा चॅम्पियन लीग, दहा वेळेस ला लीग, सात वेळेस कोपा डेल रे. एवढे घवघवीत यश असतानाही मेस्सी आणि चाहते यांच्यात ब्रिटनप्रमाणेच अर्धवट कहानी होती. मेस्सीला अर्जेटिनासाठी मोठी स्पर्धा जिंकून देता आली नाही. मेस्सी हा महान खेळाडू आहे, यात कोणाचेही दुमत नाही. परंतु या देश जिंकण्यात उणिवा राहत असल्याने त्याला महान श्रेणीच्या सर्वोच्च पायरीपासून एक पायरी मागेच थांबावे लागत आहे. परंतु रिओ द जानिरोच्या मरकाना स्टेडियमध्ये ही इच्छा पूर्ण झाली. रविवारी रात्रीपूर्वी ते चारवेळा कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झालेले होते. ब्राझीलविरोधात अंतिम सामन्यातही तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. पण हा सामना जिंकल्यानंतर सहकारी खेळाडूंनी त्याला ज्या रितीने हवेत फेकले, ते पाहता याच क्षणाची ते वाट पाहत होते, असे दिसते. अर्जेटिनाचा गोलरक्षक एमिलिएनो मार्टिनेझ म्हणतो, हे माझे स्वप्न होते. मला आताच्या क्षणाला सवार्धिक याच गोष्टीची गरज होती. आम्ही मेस्सीसाठी केले, त्याला ते दिले. तो याचा सर्वात मोठा दावेदार होता.

भारतातही चाहत्यांनी वेगळ्या पद्धतीने का होईना, याचा अनुभव घेतला आहे. सचिन तेंडुलकर हा नक्कीच लोकप्रिय खेळाडू आहे. परंतु 2011 पूर्वी त्याच्या कारर्किदीत एकदाही विश्वचषक न जिंकणे हे त्याच्यासाठी उणिव होती. 1983 च्या विश्वविजेता बनलेल्या संघापासून प्रेरणा घेत सचिनने बॅट हातात धरली होती. परंतु तो एकदाही वर्ल्ड कप चॅम्पियन टिमचा हिस्सा बनू शकला नाही. हे स्वप्न 2011 मध्ये विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयाने पूर्ण झाले. विराट कोहलीसह सर्व खेळाडूंनी त्याला खांद्यावर उचलले. कोहली म्हणाला, ज्या व्यक्तीने भारतीय क्रिकेटची संपूर्ण जबाबदारी वीस वर्ष समर्थपणे सांभाळली, त्याचे ओझे आम्ही वीस पावले देखील उचलू शकणार नाही का ? मार्टिनेजच्या वक्तव्याने कोहलीच्या वक्तव्याची आठवण झाली. हाच खेळ असतो आणि क्रीडाप्रेमी असेच असतात. परंतु आणखी किती दिवस भारतीय खेळाडू जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळापासून दूर राहतील आणि ही लोकप्रियता क्रिकेटच्या चष्म्यातून किती दिवस पाहणार आहोत, असा प्रश्न आहे.

विश्चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय खेळाडू पाहणे चाहत्यांच्या नशिबात आहे का? आपल्या मातीतून एखादा मेस्सी जन्माला येईल का? एखादा रोनाल्डो, नेमार अशी दिग्गज मंडळी आपल्यातून पुढे येतील का? वास्तविक आपल्यात आणि त्यांच्यात तेवढेच अंतर आहे की जेवढे क्रिकेट आणि फुटबॉलच्या लोकप्रियतेत आहे. क्रिकेट हा जबरदस्त खेळ आहे आणि तो सर्वांना कमी जास्त प्रमाणात आवडतो. परंतु तो बारापेक्षा अधिक देशांत खेळला जात नाही. मजबूत संघाचा विचार केल्यास पाच देशांच्याच संघाचा उल्लेख करावा लागेल.

त्यामुळेच कमी कालावधीत इंडियन प्रीमियर लिगने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. परंतु फुटबॉल एक महासागार आहे. यात वर्ल्ड कपसाठी जागा आहे, युरो कपसाठी जागा आहे, कोपा अमेरिकेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जागा आहे. त्याचबरोबर इंग्लिश प्रीमियर लीगसह अनेक लीग देखील आहेत. सुमारे 200 देशांत फुटबॉल खेळला जातो आणि पहिल्या शंभर देशांच्या संघातील अंतरही खूपच कमी आहे. फुटबॉलमध्ये सर्वच संघ मातब्बर असून त्यांच्यात नेहमीच कांटे की टक्कर होते. अशावेळी भारताला आघाडीच्या संघात स्थान मिळवणे अवघड नाही परंतु कठीण आहे. एकीकडे जगात फुटबॉलने आघाडी घेतलेली असताना आपण मात्र मागे जात आहोत. एकेकाळी आशिया खंडात भारतीय संघाचा दबदबा होता. 1950 मध्ये भारतीय संघाचा जागतिक फुटबॉल स्पर्धेत सहभाग होता होता राहिला. परंतु हा वारसा पुढे नेता आला नाही. जग पुढे गेले. साहजिकच ही कठीण परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. यादृष्टीने आपण इंडियन सॉकर लीगसारखे प्रयत्न सुरू केले आहेत. कॉर्पोरेटमध्ये देखील फटबॉवलवरुन आपण सजग आहोत. परंतु आपले ध्येय हे चोहोबाजूंनी पुढे जाण्याचे असले पाहिजे.

पहिले म्हणजे इंडियन सॉकर लीग आणि दुसरे म्हणजे दमदार खेळाडूंचा समावेश करणे. यात चुरशीची स्पर्धा असेल आणि पैसा, प्रसिद्धीही असेल. दुसरे म्हणजे कॉर्पोरेट जगाला फुटबॉलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी निर्णयप्रक्रियेत सामील करुन घेणे आवश्यक आहे. तिसरे म्हणजे सतत प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरु ठेवणे. चौथे म्हणजे नवीन प्रतिभा ही जगातील नामवंत क्लबमध्ये पाठवण्याची तयारी असणे आणि तसे करार करणे. अशा प्रकारचे प्रयत्न झाल्यास हा रोमांचकारी खेळ भारतीय चाहत्यांना वेगळी अनुभूती दिल्याशिवाय राहणार नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com