- सुधीर मोकाशे

बहुतांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या सोशल नेटवर्किंगविषयी अलीकडील काळात बर्याबरोबरच वाईटही बोललं जाऊ लागलं आहे. या नवसमाजमाध्यमाच्या गैरवापराची चर्चा अधिक होऊ लागली आहे.

पण त्याच वेळी या माध्यमाची ताकद, क्षमता आणि आवाका ओळखून त्याआधारे समाजोपयोगी उपक्रम राबवून परिवर्तनही घडवून आणलं जात आहे. महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार मिळालेल्या प्रमोद गायकवाड यांच्या सोशल नेटवर्किंग फोरमतर्फे गेली दहा वर्षे अविरतपणानं हे काम सुरु आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अनोखी सामाजिक क्रांती घडवणार्या या आधुनिक चळवळीविषयी...

‘सोशल नेटवर्किंग’ हा प्रकार आपल्याकडे काही वर्षांपूर्वी आला तेव्हा बर्याच जणांना त्याविषयी फारशी कल्पना नव्हती. हळूहळू तरुणमंडळी या ‘सोशल नेटवर्किंग’चा वापर मोठ्या प्रमाणावर करायला लागल्यावर त्याविषयीचं सर्वसामान्यांचही कुतूहल वाढलं. माध्यमांमधूनही त्याविषयी लिहिलं जाऊ लागलं. सुरुवातीला ‘इंटरनेटवरचा टाईमपास’ अशा नजरेनंच या सगळ्याकडे बघितलं जायचंं. कॉलेजात मुलंमुली कट्ट्यांवर बसून गप्पा मारतात तशा आता इंटरनेटवर आपापल्या ठिकाणी बसूनच गप्पा मारतात, असं त्याचं स्वरूप होत. जसजसं ‘सोशल नेटवर्किंग’ विषयी जास्त बोललं आणि लिहिलं जाऊ लागलं तसतसा त्याच्या वापराविषयीही वेगळ्या दृष्टिकोनातून विचार सुरू झाला. काही सेलिब्रेटींनी, प्रसिद्ध व्यक्तींनी या माध्यमाचा वापर करून सर्वसामान्यांचे लक्ष याकडे मोठ्या प्रमाणात वळवले. स्मार्टफोनचा वापर वाढत गेल्यानंतर म्हणजे गेल्या चार-पाच वर्षांमध्ये पाहता पाहता सोशल मीडियाचा वापर अति पातळीपर्यंत पोहोचला आणि तो जगण्याचा अविभाज्य भाग कसा बनून गेला हे कळलेही नाही !

अठराव्या शतकात जे वर्तमानपत्रांचं स्थान होतं ते आज एकविसाव्या शतकात सोशल मीडियाचं आहे. त्या माध्यमातून प्रत्येकजण स्वतःचे अनुभव, मतं एकमेकांना सांगत असतात. या अनुभवांच्या आणि सुख-दुःखांच्या प्रक्रियेतून गोष्टी एकत्रपणे करणं, काही न भावलेल्या गोष्टींविषयी बोलणं, त्यांचा निषेध करणं असे अनेक प्रकार सुरु असतात. त्यातूनच अलीकडील काळात सोशल मीडियाच्या अनसोशल बाजूही समोर आल्याने तो टीकेचा धनी बनला. परिणामी त्यावर निर्बंध आणण्याची गरज बोलून दाखवली जाऊ लागली. वास्तविक, कोणतंही माध्यम चांगलं किंवा वाईट नसतं; तर वापरकर्त्याकडून त्याचा वापर कसा केला जातो यावर त्याची परिणामकारकता ठरते. आज जेव्हा सोशल मीडियाच्या वाईट बाजूंची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्याच वेळी या माध्यमाचा वापर करुन अनेक चळवळीही उभ्या राहिल्या आहेत. या चळवळी केवळ निषेधाच्या, विरोधाच्या नसून क्रांतिकारी परिवर्तनाच्या, ग्रामविकासाच्या आहेत. समाजकार्याची ऊर्मी असणार्या अनेकांनी या माध्यमाची ताकद, क्षमता ओळखून त्याच्या आधारे विकासात्मक बदल घडवून आणले आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणून नाशिकमधील प्रमोद गायकवाड यांच्या सोशल नेटवर्किंग फोरमकडे पाहता येईल. नुकतीच या फोरमची दशकपूर्ती झाली.

2010 मध्ये जेव्हा फेसबुक, ट्विटर यांसारख्या समाजमाध्यमांचा वापर सामाजिक कार्यासाठी करता येईल का याची चाचपणी सुुरु होती, त्या काळात प्रमोद यांनी या दिशेने प्रयत्नही सुरु केले. नुसता विचार करून काहीही होत नाही, काही भरीव साध्य करायचे असेल तर विचारला कृतीची जोड असायला पाहिजे या जाणिवेतून त्यांनी त्वरित फेसबुकवर सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज हे अभियान सुरु केलं. त्याअंतर्गत सोशल नेटवर्किंग फोरम ही संस्था स्थापन केली आणि सोशल मीडियावरील तरुणांना सामाजिक कार्यात सहभागी होण्यास प्रेरित करायला सुरुवात केली. त्यांनी या कार्याचा आरंभ करताना पहिली संकल्पना राबवली ती ‘दिवाळीची पहिली पणती आदिवासी बांधवांच्या दारात’ ही. फेसबुकवर त्यांनी समाजातील वंचित बांधवांना कपडे आणि शैक्षणिक साहित्य देऊन दिवाळी साजरी करू या, असे आवाहन केले आणि बघता बघता राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. ती दिवाळी तीन पाड्यांवर जाऊन साजरी केली गेली. यात सहभाग नोंदवलेल्या प्रत्येकाला मोठे समाधान लाभले आणि हे लोक कायमस्वरूपी जोडले गेले.

तसे पाहता आपल्याकडे सामाजिक जबाबदारीची जाणीव असणार्यांची संख्या मोठी आहे. आज अनेकांकडे पैसा असतो, मदतीची भावना असते, प्रत्यक्षात काम करण्याची इच्छा असते; पण नेमकं काय करायचं याचा शोध अनेक जण घेत असतात. प्रमोद गायकवाड यांना अशा हजारो इच्छुकांची साथ लाभली. महाविद्यालयीन सोशल नेटवर्कर्स हळूहळू त्यांच्या आवाहनांना प्रतिदास देऊ लागले. आश्चर्याची बाब म्हणजे स्थळ, काळ, प्रांत आणि देशाच्याही सीमा ओलांडून ही चळवळ अनिवासी भारतीयांपर्यंत पोहोचली. काही परदेशस्थ भारतीय त्यांच्या या सामाजिक उपक्रमासोबत जोडले गेले. त्यातूनच गेल्या दहा वर्षांमध्ये समाजकार्याचा वटवृक्ष उभा राहिला.

या अभियानाच्या स्थापनेपासून आजवर शहिद भारतीय जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, अनाथालये-वृद्धाश्रमांना मदत, वृक्षलागवड आणि संगोपन, आदिवासी शाळांचे डिजिटल स्कूल्समध्ये रूपांतर, शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत संगणक कक्ष उभारून संगणक साक्षरतेचे धडे देणे, मुलांना क्रीडासाहित्याची मदत करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, अभ्यासिका उभारणे, आदिवासी महिलांना गृहोद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण देणे, सेंद्रीय शेतीउत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रानभाज्या महोत्सव आयोजित करणे असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले. आहार, निदान आणि उपचार या त्रिसूत्रीवर आधारित त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 283 बालकांना कुपोषित बालकांना कुपोषण अवस्थेतून बाहेर काढण्यात आले.

या संस्थेचे सर्वांत मोठे काम म्हणजे खेड्यांना पाण्यासाठी समृद्ध करणे. 2015 च्या दुष्काळात राज्याच्या अनेक भागातील नागरिकांना सप्टेंबर-ऑक्टोबर मध्येच विहिरींवरील पाण्यासाठीची जीवघेणी कसरत करावी लागत होती. टँकरच्या पाण्यासाठी प्रचंड गर्दी होत होेती. मराठवाड्यात या दुष्काळाचा मोठा प्रादुर्भाव होता. त्यावेळी अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या. त्यामध्ये प्रमोद यांच्या फोरमने बीड जिल्ह्यातील राज पिंपरी हे गाव आणि एरंडवन येथील हरीण अभयारण्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत केली. 2016च्या दुष्काळात आदिवासी आणि डोंगराळ प्रदेशातील गावांना मोठा फटका बसला. गावोगाव डोक्यावर हांडे घेऊन महिलांचे जत्थे रानोमाळ फिरताना दिसू लागले. कळशीभर पाण्यासाठी या महिला मैलोनमैन पायपीट करायच्या. या परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले.

दुसरीकडे तज्ज्ञांची एक टीम तयार केली. या टीमने काही गावांची पहाणी केली. या गावांना नक्की काय समस्या आहेत, उपलब्ध साधन सामग्री काय आहे आणि गावकर्यांच्या सहकार्याने त्या सोडवायच्या कशा यावर एक आराखडा तयार केला. समस्या सोडवण्यासाठी काय करावे लागेल याची नेटिझन्सना माहिती दिली. शहरातील अनेक सुखवस्तू सहृदय लोक ही माहिती वाचून या उपक्रमात सहभागी व्हायची तयारी दर्शवू लागले आणि बघता बघता लोकसहभाग वाढू लागला. परिणामी, केवळ तीन वर्षात 15 गावांना टँकरमुक्त करून या आदिवासी बांधवांच्या दारात पाणी पोहोचवण्यात सोशल नेटवर्किंग फोरमची टीम यशस्वी ठरली.

या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक शासकीय आणि सामाजिक संस्थांनी पुरस्कार दिले. प्रमोद गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार देण्यात आला. आता येणार्या काळात त्यांनी शैक्षणिक कार्य करण्याचे ठरवले आहे. आज ग्रामीण भागातील हजारो शाळकरी मुलांना गरजेचे शैक्षणिक साहित्य मिळत नाही. बारावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना उपजीविकेच्या संधी मिळत नाहीत. या मुलांना शैक्षणीक संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. आज समाजमाध्यमांचा वापर धार्मिक, जातीय आणि राजकीय विद्वेष पसरविण्यासाठी उपयोग होत असताना दुसर्या बाजूला याच समाज माध्यमांचा वापर करून एक अनोखी सामाजिक क्रांती घडवण्यात आली आहे. इच्छा असली की मार्ग निघतो असं म्हणतात. आजच्या काळात इच्छा असूनही मार्गाच्या शोधात असणार्यांची संख्या मोठी आहे. अशा व्यक्तींसाठी सोशल नेटवर्किंग फोरमसारखे पर्याय उपलब्ध आहेत.

समाजातील आहे रे आणि नाही रे वर्गातील अंतर वाढत असताना, विषमता वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष करणे, केवळ पहात राहणे किंवा निषेधाचे सूर उमटवण्यात धन्यता मानणे हे प्रकार आता मागे पडायला हवेत. आपण समाजाचं देणं लागतो ही भावना वाढीस लागायला हवी. आत्मकेंद्रीपणाने कोणत्याही समाजाचा विकास होत नाही, हे वैश्विक सत्य आहे. आज कोरोनोच्या संकटामुळे, वारंवार येणार्या नैसर्गिक संकटांमुळे ग्रामीण भागातील समस्यांची तीव्रता वाढत आहे. आदिवासींसाठी तर संघर्ष, कष्ट, हालअपेष्टा पाचवीला पूजलेल्या आहेत. त्यांच्या जगण्याच्या लढाईत आपली छोटीशी मदत मोलाची ठरु शकते, असं प्रमोद सांगतात.