प्रा.डॉ.पी.एस.लोहार

गेल्या डिसेंबर 2019 पासून जगभरात कोरोना विषाणूने 54 दशलक्ष लोकांना संक्रमित केले आहे. तर सुमारे 1.3 दशलक्ष लोकांचा यामुळे मृत्यू झाला. कोरोना विषाणू (सार्स कोव्ही-2) संपला या भ्रमात कोणीही राहू नये, कोरोणाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे.

करोना व्हायरसवर संशोधन सुरू असून दिवसेंदिवस वेगवेगळी माहिती समोर येत आहे. एका नव्या संशोधनानुसार, करोनाची दुसरी लाट अतिशय भयावह असणार असून जगातील सुमारे 70 टक्के लोकसंख्या करोनाबाधित होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जगात गेल्या शनिवारी कोरोना विषाणूने 6,60,905 व्यक्ती बाधित झाल्यात व भारतात ही नव्याने त्याच दिवशी 76,000 रुग्ण आढळून आलेत. एकाच दिवशी कोव्हीड-19 च्या रुग्ण संख्येचा उच्चांक धडकी भरणारा आहे.

अमेरिकेतील मिन्नेसोटा विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंफेकेशियस डिजीस रिसर्च एण्ड पॉलिसी’चे संचालक डॉ. मायकल ऑस्टरहोम यांनी याबाबत इशारा दिला आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, एका मुलाखतीत त्यांनी जगातील दोन तृतीयांश लोकांना करोनाची बाधा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांमध्ये करोनाच्या संसर्गाविरोधात लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होणार नाही तोपर्यंत करोनाचा संसर्ग फैलावणार असल्याचे त्यांनी म्हटले

अमेरिका, युरोप व रशियात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने विषाणू फोफावत आहे.त्यामुळे या देशांत संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा क्लब, मॉल्स, अमुझमेंट पार्कस अशा गर्दीच्या ठिकाणांवर बंदी लादण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टनसिंग चे पालन करणे कायद्याने बंधनकारक केले आहे. वातावरणातील बदलांमुळे कोरोनाची दुसरी लाट जी सध्या दिल्ली व उत्तर भारतात दिसून येत आहे, ती जर आपल्याकडे आली तर परिस्थिती सांभाळणे कठीण होणार आहे.

अनलॉक 5 च्या माध्यमातून न्यू नॉर्मल जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतानाच काही जाती धर्माच्या लोकांना कोरोना विषाणूची अजिबात भीती नाही, ते म्हणतात की हे सगळे थोतांड आहे.

अशातच आपल्याकडे देशांतर्गत व परदेशातील विमानांच्या फेर्या वाढल्यात, हॉटेल्स, सिनेमा हॉल्स, मल्टिप्लेक्स सुरू झालीत व 16 नोव्हेंबर पासून मंदिरे,गुरुद्वारा, मस्जिद,चर्च व इतर प्रार्थनास्थळें उघळण्यात आली त्यामुळे येथे येणार्यांनी व यापूर्वी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपायांचा पार फज्जा उडवला. अशाप्रकारे निष्काळजीपणा करणार्या अफाट लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात युरोप सारखी कोरोनाची दुसरी लाट आली तर त्याचा आरोग्य व अर्थ व्यवस्थेवर अत्यन्त गंभीर व दूरगामी परिणाम आपल्याला भोगावे लागतील.

सर्व सकारत्मक बाबी जुडून आल्यास डिसेंबर 2020 अखेर अथवा मार्च 2021 पर्यंत करोनाला प्रतिबंध करणारी अशी लस विकसित होईल असे वाटते. लस स्वतः करोना विषाणूचा संसर्ग रोखू शकत नाही, असं खळबळजनक विधान जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी केलं आहे.

अशा परिस्थितीत कोरोना विषाणूमूळे खूप मोठे संकट उभे राहणार नाही यासाठी सजग राहून सार्वजनिक ठिकाणी, शाळा व महाविद्यालयात थर्मल स्कॅनिंग करणे, मास्क वापरणे, फिजिकल डिस्टनसिंगचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे व वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुऊन आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. तरुणांनी फार निष्काळजीपणा दाखवू नये, कारण त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असली तरी आई वडिलाच्या, आजी आजोबांच्या आरोग्याची काळजी घेणे ही त्यांचीच जबाबदारी आहे याचे भान ठेवावे.

(लेखक चोपडा महाविद्यालयातील विज्ञानाचे वरीष्ठ प्राध्यापक असून विद्यापीठात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत)