संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची मुहूर्तमेढ

संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची मुहूर्तमेढ

संविधान दिन विशेष

रणवीर राजपूत

मित्रहो, देशाच्या राज्यकारभाराला दिशा दाखविणारा सर्वोच्च कायदा (बेसिक लॉ)म्हणजे राज्यघटना होय. देशाचा राज्यकारभार सनदशीर मार्गाने चालवा, यासाठी घटना तयार करणे क्रमप्राप्तच ठरते. राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील स्वातंत्र्य सेनानी हे अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्य लढा तनमनधनाने लढलेत. त्यासाठी शेकडो देशभक्तांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. अनेकांना वर्षानुवर्ष कारावास भोगुन नरक यातना सहन कराव्या लागल्या. अंतत: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं अन् ब्रिटिश राजवट संपुष्टात आली.त्यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरूसारखे क्रांतिकारक हसत- हसत फासावर चढले. इतकेच नव्हे तर लोकमान्य टिळक,नेताजी सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर आदी क्रांतीवीरांचे योगदान मोलाचं ठरून हिंदुस्थानाचा तिरंगा मोठ्या डौलानं आकाशात उंच उंच फडकला.

अखेर क्रांतिकारकांचे बलिदान तर,स्वातंत्र्यसेनानीं चे योगदान फलद्रूप ठरले.देश आजाद होऊन स्वतंत्र देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी राज्यघटनेची मुहूर्तमेढ करण्यात आली अन् तिचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ठरले.चला तर, आपण सर्व भारतीय संविधान दिनानिमित्त घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया!

नवनिर्मित राष्ट्राची वाटचाल कशी हवी;कायदे मंडळ, न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ यांचे अधिकार, कार्यक्षेत्र काय; राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांचे अधिकार कोणते ;राज्यपाल,मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ व त्यांचे अधिकार कोणते ; मंडळे, महामंडळे, भारतीय निवडणूक आयोग, निती आयोग आदी विषयांबद्दल मार्गदर्शन करणार्‍या मूलभूत कायद्याला राज्यघटना असे संबोधिले जाते.

मित्रहो, 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान सन्मान दिन म्हणून देशात साजरा केला जातो.घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य सदस्यांनी जगभर भ्रमण करून विविध देशांतील घटनांचा सखोल अभ्यास केला. या मसुदा समितीमध्ये कन्हैयालाल मुंशी, सय्यद सादुल्ला, कृष्ण स्वामी अय्यर, गोपाळस्वामी अय्यंगार, बी. ए. मित्तल, डी. पी. खेतान, एन. माधवराव, सर बेनेगल नरसिंहराव या सदस्यांचा समावेश होता.

हा अभ्यासदौरा करत असताना आपल्या देशासाठी उपयुक्त असलेल्या तरतुदींचे संकलन करण्यात आलं. सुमारे 2 वर्षे 11 महिने 18 दिवस अभ्यास दौरा केल्यानंतर अखेर भारतीय राज्यघटनेला मूर्त स्वरूप देण्यात आलं.तदनंतर संविधानाला घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी मान्यता दिली.26 नोव्हेंबर 1950 पासून भारतीय राज्यघटना सार्‍या देशात अमलात येऊन त्याअनुष़ंगाने स्वतंत्र देशाचा राज्यकारभार सुरू झाला.त्यातून भारत देश हा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून नावरूपाला आला.

घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सर्वप्रथम मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन केलं. याप्रसंगी महासभेला संबोधित करताना घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करतेवेळी केवळ घटनात्मक मार्गांचाच वापर करावा.घटनेशी राज्यकर्त्यांनी प्रामाणिक राहून स्वहितापेक्षा देशहिताला सदैव प्राधान्य द्यावे. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी व्यक्तीपूजेला थारा न देता,राष्ट्रनिष्ठा ठेऊन त्याच्या सर्वंकष उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत.प्रजासत्ताक राज्याच्या निर्मितीसाठी राजकीय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीची जोड द्यावी.

भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी सर्वव्यापी प्रयत्न व्हावेत.भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने प्रत्येक जाती-धर्माविषयी समान आदर भावना असावी. राज्यघटना,राष्ट्रगीत,राष्ट्रध्वज यांचा राज्यकर्ते अन् नागरिकांनी आदर- सन्मान करावा. स्री-पुरुष, गरीब-श्रीमंत असा भेदाभेद न करता, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार व अन्य मूलभूत अधिकार बहाल केले आहेत. कोणा नागरिकावर अन्याय झाला,तर त्या व्यक्तीला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार दिला आहे, असे बाबासाहेबांनी यावेळी सांगितले.प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार देवांची पूजाअर्चा करण्याचे धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले आहे.आपला उदरनिर्वाह करण्यासाठी नागरिकांना नोकरी-व्यवसाय, उद्योग करण्याचा अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील प्रत्येक स्री-पुरुषाला आपले मत व्यक्त करण्याचे विचार स्वातंत्र्य/ व्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले आहे.तथापि आपल्या विचार स्वातंत्र्यमुळे कोणाचा अवमान होणार नाही,कोणाचे चारित्र्यहनन होणार नाही,याची खबरदारी घ्यावी. मागासवर्गीय प्रवर्गातील विविध जाती-जमातींना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण ठेवण्यात आले आहे,याचा निर्वाळाही आंबेडकरांनी याप्रसंगी बोलताना दिला.प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांचा उपभोग घेताना इतरांच्या हक्कांची पायमल्ली होणार नाही, याबाबत प्रत्येकाने दक्षता घ्यावी,असे प्रकर्षाने घटनेत नमूद केलं आहे.

घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी स्वातंत्र्य,समता व बंधुता या त्रिसूत्रांचा अंगीकार केला.घटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध भाषा,धर्म, पंथ, संस्कृती, परंपरा असलेल्या देशात विविधतेतून एकता प्रस्थापित करण्यावर भर दिला. शिकाल तर टिकाल हा मंत्र देऊन त्यांनी मागासवर्गीयांना शिक्षण घेण्यासाठी आग्रह धरला.महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षणाची कास धरावी, असा मोलाचा सल्ला दिला.खरं तर,बाबासाहेब हे स्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.

स्वतंत्र देशाचा राज्यकारभार सनदशीर मार्गाने हाकण्यासाठी आवश्यक असलेल्या राज्यघटनेची निर्मिती करण्यात बाबासाहेबांनी जे मोलाचं योगदान दिलं, याबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून केंद्र सरकारने त्यांना मरणोत्तर भारत रत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जगातील विविध क्षेत्रामधील 100 तज्ज्ञांची यादी 20 व्या शतकाच्या मध्याला जाहीर केली होती.त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अग्रक्रमावर होते.

यावरून बाबासाहेबांसारख्या महाज्ञानी अशा बुद्धिमान- चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची व्यापकता व महती समस्त जनमानसाला कळून आली असेल.अशा युगपुरुषाच्या स्मरणार्थ केंद्र व राज्य सरकारच्यावतीने मुंबई येथील इंदू मिलच्या प्रांगणात भव्यदिव्य असं जागतिक दर्जाचे स्मारक उभारले जात आहे,याचा मनस्वी आनंद होताहे.

त्याप्रमाणेच राज्य सरकारने लंडनमधील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले घर विकत घेऊन त्यांच्या स्मृतींना खर्‍या अर्थानं आदरांजली वाहिली आहे. याशिवाय दिल्लीतील अलीपूर येथील निवासस्थान; महू येथील जन्म स्थळी असलेले त्यांचं स्मारक; बाबासाहेबांचं मुळगाव आंबडवे यांना पंच तीर्थ घोषित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे हीच खरी घटनाकारांना मानवंदना ठरेल.तमाम भारतीयांना संविधान सन्मान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! संविधान चिरायू होवो! जय ्हिंद!

मो.न.9920674219

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com