बचाव आपल्या हाती

बचाव आपल्या हाती

- डॉ. ललित कांत, वैद्यकीय तज्ज्ञ

कोणत्याही विषाणूचे म्यूटेशन होणे ही सर्वसाधारण बाब आहे. पण काही व्हेरियंट हे अधिक वेगाने पसरणारे आणि बाधित करणारे असतात. डेल्टा किंवा डेल्टा प्लस हे यापैकीच आहेत. संसर्गाचा म्यूटेंट पसरला तरी तिसरी लाट येऊ न देणे हे आपल्या हातात आहे. या सर्व गोष्टी आपले वर्तन आणि रोगप्रतिकारक शक्ती यावर अवलंबून आहेत.संसर्ग आणि त्याच्या प्रसारावर आपले नियंत्रण नाही. परंतु सजगता आणि योग्य वर्तनाच्या बळावर आपण बचाव करु शकतो.

संपूर्ण जग सध्या अनिश्चिततेच्या वातावरणात वावरत आहे. काही देशांत लसीकरण वेगात होत आहे तर काही ठिकाणी लसीकरण सुरू असताना कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात लसीकरण सुरू असले तरी या आघाडीवर अजूनही खूप काम बाकी आहे. दीड वर्षाच्या काळात जगभरात सुमारे 18 कोटीच्या आसपास नागरिकांना कोरोनाची बाधा झाली तर सुमारे 40 लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. आपल्या देशात पहिली लाट असताना चोवीस तासात सर्वाधिक 1200 मृत्युंची नोंद झाली, तर दुसर्‍या लाटेत हाच आकडा 4500 वर गेला.

दुसरी लाट पसरण्यास अनेक कारणे असू शकतात. यात महत्त्वाचे कारण म्हणजे कोरोना विषाणूने बदलले रुप. चालू वर्षात मे महिन्यात 530 जिल्ह्यांत दररोज बाधित होणार्‍यांची संख्या 100 पेक्षा अधिक होती. याशिवाय पॉझिटिव्हीटीचा रेट हा 21 टक्के होता. काही ठिकाणी हा दर 30 ते 40 टक्के होता. आता दुसरी लाट कमकुवत झाली आहे. दुसरी लाट मंदावण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे लॉकडाउनसारखे निर्बंध. त्याचवेळी नागरिकांनी पाळलेले कोरोना प्रोटोकॉल.

आता आपल्यासमोर करोना विषाणूचे अनेक व्हेरियंट येत आहेत. जसे की डेल्टा, गामा, अल्फा, बीटा आदी. हे मूळच्या संसर्गाचे म्यूटंट आहेत. कोणत्याही संसर्गाचे म्यूटेशन होणे ही सर्वसाधारण बाब आहे. हा बदल संसर्ग वाढण्यास आणि बाधिताला गंभीर आजारी करण्यास कारणीभूत ठरु शकतो. त्यामुळे हा संसर्ग लवकर संपत नाही. डेल्टाशिवाय अगोदर उल्लेख केलेले सर्व व्हेरियंट हे आपल्या देशातही आढळून आले. परंतु सर्वाधिक आक्रमक हा अल्फा असून तो सर्वप्रथम ब्रिटनमध्ये आढळून आला.

महाराष्ट्रात तर त्याचे आणखी म्यूटेशन झाले. त्यास आपण डेल्टा नावाने ओळखतो. भारतात 28 प्रयोगशाळेचा समूह असून त्यात आतापर्यंत 45 हजार संसर्गाच्या विषाणूंचा अभ्यास करण्यात आला. डेल्टा व्हेरियंट भारतातच नाही तर अन्य देशातही दिसून येतो. त्याचे वैशिष्ट म्हणजे तो वेगाने आणि अधिक प्रमाणात पसरतो. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या विषाणूने लसीच्या सामर्थ्यावर परिणाम केला. त्यानंतर बदलेल्या रुपास डेल्टा प्लसचे नाव देण्यात आले. या व्हेरियंटच्या लसविरोधी क्षमतेचा अभ्यास केला जात आहे.

दुसर्‍या लाटेने देशात हाहा:कार माजवला. शास्त्रज्ञांनी या लाटेची भयावहता आणि परिणामकतेची माहिती दिली नाही, असे सांगितले गेले. आता तिसर्‍या लाटेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. यात लहान मुलांवर परिणाम होऊ शकतो. म्हणून ही बाब चिंता वाढवणारी आहे. आपल्याकडे 18 पेक्षा कमी वयोगटातील मुलांची संख्या 40 टक्के आहे. यासाठी देशात अजूनही लस उपलब्ध नाही. तिसरी लाट कधी येणार याबाबत कोणीही भविष्यवाणी करु शकत नाही. कारण यातील आणखी माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. आता केवळ तर्कवितर्क मांडले जात आहे. परंतु लहर येवो किंवा न येवो आपल्याला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या खबरदारीत फार बदल करण्याची गरज नाही. सध्या आपण जे नियम पाळत आहोत, तेच नियम पुढेही कायम ठेवायचे आहेत. जर तिसरी लाट आली तर त्याचा प्रभाव कमी जास्त राहू शकतो.

आपण खबरदारीची चार विभागात विभागणी करु शकतो. एक तर आपले वर्तन कसे आहे, ते पाहणे महत्त्वाचे आहे. आपण कोविडचे गाइडलाइन योग्य रितीने पालन करत आहोत की नाही, याचे आकलन करायला हवे. यानुसार मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे, नियमित रुपाने साबण किंवा सॅनिटायजरने हात स्वच्छ करणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.सर्वात महत्त्वाचे लस घेणे. दुसरे म्हणजे संसर्गाच्या बदलेल्या म्यूटेशनचा लशीवर परिणाम होतोय का? हे पाहणे. तिसरी गोष्ट म्हणजे संसर्गाचे विविध रुप कशा रितीने वाढत आहे किंवा कमी होत, हे पाहणे. त्याचा प्रसार वाढला तर आपण अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

चौथी बाब म्हणजे आपण लसीकरण मोहिमेला आणखी बळ द्यायला हवे. विषाणूला हल्ला करण्यास संधी न देणे हाच मूलमंत्र पाळला पाहिजे. लक्षात ठेवा, संसर्ग हा आपल्या आसपासच आहे. घरात, रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी तो आहे. संसर्ग आपल्याजवळ फिरकणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तोंड, नाक, डोळ्यातून संसर्ग हा शरिरात प्रवेश करतो.

आपण याबाबत विशेष खबरदारी घेतली तर संसर्गाला रोखण्यास बर्‍यापैकी यश मिळेल. यासंबंधी मास्क, सामाजिक अंतर आणि स्वच्छता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचे प्रमाण अधिक असणार आहे. म्हणून हे टाळण्यासाठी आपण बाजारात, यात्रेत, राजनैतिक आणि सामाजिक आयोजनात सहभागी होण्यापासून परावृत्त होऊ शकतो का, असा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. बंदिस्त जागेत जाण्यापासून आपण स्वत:ला रोखले पाहिजे. कारण अशा ठिकाणी संसर्ग अधिक काळ राहतो. त्याचबरोबर बचावासाठी घेतलेल्या खबरदारीत कोणतीही तडजोड करु नये.

आणखी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल, हे पाहणे अत्यावश्यक आहे. इम्युनिटी चांगली असेल तर संसर्गाचा अधिक त्रास होणार नाही. गंंभीर रुपाने आजारी पडलात तरी रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता राहत नाही. अर्थात लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही संसर्ग झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु त्याचा परिणाम हा कमी राहतो. यासंबंधी विविध देशाबरोबर भारतातही अनेक उदाहरणे पाहवयास मिळाले आहेत.

संसर्ग आणि त्याच्या प्रसारावर आपले नियंत्रण नाही. परंतु सजगता आणि योग्य वर्तनाच्या बळावर आपण बचाव करु शकतो. संसर्ग आणि विषाणूंबाबत आपल्याकडे आता बर्‍यापैकी माहिती आहे आणि अनुभव देखील आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ येथे डेल्टा प्लस आढळून आला आहे. पण या संसर्गाबाबत आपल्याला अधिक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे अस्वस्थ होण्याचे कारण नाही. संसर्गाचा म्यूटेंट पसरला तरी तिसरी लाट येऊ न देणे हे आपल्या हातात आहे. या सर्व गोष्टी आपले वर्तन आणि रोगप्रतिकारक शक्ती यावर अवलंबून आहेत.

(लेखक आयसीएमआरच्या संक्रमण विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com