घटस्फोटास कारण की...

घटस्फोटास कारण की...

- सोनम परब

‘‘किरणपासून वेगळे होण्याचा विचारसुद्धा मी मनात आणू शकत नाही. किरणशी लग्न झाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि याबद्दल जीवनाचे आभार मानतो. किरण ही एक अद्भुत व्यक्ती आहे आणि ती माझ्या जीवनात आल्यामुळे मी धन्य झालो आहे,’’ असे उद्गार काढणारा आमीर किरणपासून वेगळा होईल, अशी कल्पना कुणालाच करता येणार नाही. किरण-आमीरच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेकांचे घटस्फोट अशा प्रकारे धक्कादायक ठरले आहेत.

बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आमीर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाची. आमीरचे दुसरे लग्न मोडले असून, तो तिसर्‍या लग्नाच्या तयारीत आहे. तसे पाहायला गेले तर बॉलिवूडमध्ये नाती जोडली जाणे आणि तुटणे यात विशेष असे कुणाला काही वाटत नाही. परंतु काही सेलिब्रिटींची नाती इतकी घट्ट असल्याचे आपण पाहिले आहे, की ती तुटताना पाहणे शक्य होत नाही. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि किरण राव यांची जोडीही ‘परफेक्ट कपल’ म्हणून ओळखली गेली. अशी ही जोडी ३ जुलैला फुटली. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून टाकले.

२००५ मध्ये त्यांचे लग्न झाले होते आणि तब्बल १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी एकमेकांपासून विलग होण्याचा निर्णय घेतला. आजकाल मैत्री, डेटिंग, रिलेशनशिप झाल्यानंतर लग्नापूर्वीच चर्चेत येणार्‍या आणि नंतर लग्नापूर्वीच तुटणार्‍या जोड्यांची चर्चा असते. परंतु बॉलिवूडमधील काही जोड्या विभक्त झाल्याने अनेकांना धक्का बसला होता. आमीर-किरण यांच्या जोडीप्रमाणेच अशा अनेक जोड्या विभक्त झाल्यानंतर अधिक चर्चा झाली होती.

हृतिक रोशन आणि सुजैन खान यांच्या लग्नामुळेच हजारो चाहत्यांना धक्का बसला होता. परंतु त्याहून अधिक धक्का त्यांचा घटस्ङ्गोट झाल्यावर बसला होता. बॉलिवूडमधील ‘ड्रीम कपल्स’मध्ये हृतिक-सुजैन यांचा सामवेश केला जातो. एखाद्या परिकथेप्रमाणे त्यांचे लग्न झाले होते. एका ट्रॅफीक सिग्नलवर त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती, असे सांगितले जाते. त्यानंतर हृतिकच्या बहिणीच्या साखरपुड्यावेळी दोघे पुन्हा भेटले होते. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी डिसेंबर २००० मध्ये लग्न केले. २००६ मध्ये ते दोघे ऋदानचे आईवडील बनले तर २००९ मध्ये हृदयचा जन्म झाला. अनेक वर्षे आदर्श कुटुंबाप्रमाणे दिसत असलेल्या हृतिक-सुजैन यांनी २०१३ मध्ये अचानक एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. सध्या दोन्ही मुलांवर आईवडिलांचा समान हक्क आहे. या दोघांच्या घटस्फोटानंतर हृतिकचे नाव कंगना राणौतशी जोडले जाऊ लागले होते तर सुजैन खानचे अर्जुन रामपालशी अफेअर असल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.

मलाइका अरोडा आणि अरबाज खान यांची प्रेमकहाणीही अशीच आहे. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान हे दोघे प्रथम एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले. पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर १९९८ मध्ये त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पुरुषाने प्रपोज करण्याचीच आपल्याकडे पद्धत आहे; मात्र ती मोडून मलाइकानेच अरबाजला प्रपोज केले होते, असे सांगितले जाते. लग्नानंतर काही वर्षांनी अरहानचा जन्म झाला. बॉलिवूडमधील सर्वांत हॉट कपल मानल्या गेलेल्या अरबाज-मलाइका यांनी २०१६ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. ही जोडी तब्बल २४ वर्षे एकत्र असल्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. घटस्फोटानंतर मलाइका तिच्यापेक्षा तब्बल ११ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनमध्ये आहे, तर अरबाज त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहतो आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या लग्नामुळेही बॉलिवूडमध्ये अनेकांना धक्का बसला होता. १९९१ मध्ये जेव्हा या दोघांचे लग्न झाले तेव्हा सैङ्ग अली खान हा अमृता सिंहपेक्षा तब्बल १२ वर्षांनी लहान असल्याने सर्वजण आचंबित झाले होते. सारा अली खान आणि इब्राहीम अली खान ही या जोडप्याची दोन मुलं आहेत. सैफ आणि अमृता यांच्यात अनेक वर्षे भांडण सुरू होतेे आणि अखेर २००४ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्या वेळी दोघांमध्ये खूपच कडवटपणा आलेला होता. सारा आणि इब्राहीम यांच्या ताब्यावरून त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता. सारा आणि इब्राहीम यांनीच मोठे झाल्यावर आपल्या मातापित्यांमध्ये संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज दोघांचे संबंध चांगले आहेत. सारा आणि इब्राहीम ही दोन्ही मुले सैङ्गची दुसरी पत्नी करीना कपूर हिच्याशी खूपच चांगले संबंध ठेवून आहेत.

आमीर खानची पहिली पत्नी रीना दत्ता ही त्याच्यापासून २००२ मध्ये अलग झाली होती. १९८६ मध्ये आमीरने कुटुंबीयांच्या मर्जीविरुद्ध रीनाशी लग्न केले होते. परंतु काही वर्षांतच दोघांमधील अंतर वाढू लागले. २००२ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला तेव्हा रीनाला भरपाई म्हणून ५० कोटींची रक्कम देणे आमीर खानला भाग पडले होते. फरहान खान आणि अधुना भनाबी यांच्यातील घटस्फोटाची चर्चाही बरीच रंगली होती. या दोघांनी १६ वर्षे नाते जोपासले आणि नंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

घटस्फोटानंतर अधुनाने मुंबई येथील १००० चौरस ङ्गुटात बांधलेल्या बंगल्याची मागणी केली होती. याखेरीज आपल्या मुलीच्या संगोपनासाठी फरहानला दरमहा मोठी रक्कम अधुनाला द्यावी लागते. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आदित्य चोपडा यांनी राणी मुखर्जीशी लग्न करण्यासाठी त्यांची पहिली पत्नी पायल हिला घटस्फोट दिला. त्यावेळी त्यांना ५० कोटींची रक्कम पायलला द्यावी लागली होती. त्यामुळेच त्यांचा घटस्फोटही देशातील महागडा घटस्फोट मानला गेला. याव्यतिरिक्त रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा, अनुराग कश्यप आणि कल्की कोचलिन यांच्या जोड्या फुटल्या तेव्हा बॉलिवूडमध्ये अनेकांना धक्का बसला होता. कल्कीने त्यावेळी असे सांगितले होते की, कधी-कधी दोन चांगली माणसेसुद्धा खूप प्रयत्न करून एकत्र राहू शकत नाहीत. आमीर आणि किरण यांच्या बाबतीत हीच बाब लागू होते की काय? असा प्रश्‍न पडतो.

एकमेकांवर बेहद्द प्रेम करून विवाहबद्ध झालेले पती-पत्नी जेव्हा घटस्ङ्गोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचतात तेव्हा अनेकांना हा प्रश्‍न पडतो की, अखेर हे कशामुळे घडले? या दोघांमध्ये नेमके काय घडले असावे? लग्नाला बरीच वर्षे झाल्यानंतर जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यास ते आपल्याला अधिक धक्कादायक वाटते. अशा वेळी आपण काहीही म्हटले तरी नाते तुटण्यासाठी एखादे कारण जरूर असते. कोणतेही पती-पत्नी एकमेकांपासून अलग होण्याचा निर्णय सुखासुखी घेत नाहीत. अशी काही कारणे या निर्णयामागे असतात, ज्यापुढे त्यांच्यातील नातेही पराभूत होते. आमीर खानच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे या कारणाचा शोध घेण्याची तीव्र इच्छा त्याच्या चाहत्यांना होत असणे स्वाभाविक आहे. वस्तुतः ङ्गमी किरणपासून वेगळा होऊ शकत नाही,फ असे आमीर खानने एका मुलाखतीत सांगितले होते. पहिली पत्नी रीना दत्तपासून अलग झाल्यामुळे आपण कोलमडून गेलो होतो, असे त्याने सांगितले होते. त्यानंतर त्याची भेट किरण राव हिच्याशी झाली आणि दोघांनी २००५ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

किरणपासून वेगळे होण्याचा विचारसुद्धा मी मनात आणू शकत नाही. किरणशी लग्न झाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि याबद्दल जीवनाचे आभार मानतो. किरण ही एक अद्भुत व्यक्ती आहे आणि ती माझ्या जीवनात आल्यामुळे मी धन्य झालो आहे असे उद्गार काढणारा आमीर किरणपासून वेगळा होईल, अशी कल्पना कुणालाच करता येणार नाही.

आमीरसारखे अनेकजण आहेत. एखादी व्यक्ती आपल्या जीवनात आल्यामुळे ते स्वतःला भाग्यशाली समजतात. प्रेमात पडतात, लग्न करतात, एकमेकांपासून कधीच विलग न होण्याच्या आणाभाका घेतात. पण मग काही काळानंतर अशा जोड्या का फुटतात? दोघेही आपापली वाट वेगळी का करतात? अनेक वर्षांचे नाते टिकू का शकत नाही? याची अनेक कारणे असतात. पतीपत्नीमध्ये जेवढे प्रेम असते तेवढाच विश्‍वासही असावा लागतो. बरीच वर्षे एकमेकांसोबत विश्‍वासाने व्यतीत केल्यानंतर जर तो डळमळीत झाला तर नाती तुटतात. दोघांपैकी कुणी एकाने एखादी गोष्ट खोटी सांगितली आणि नंतर दुसर्‍याला ती समजली, तर संशय बळावतो.

एखादी गोष्ट लपवून ठेवल्यामुळेही संशयाचा फेरा सुरू होतो. दोघांमध्ये होणारी छोटी भांडणे जेव्हा मोठे स्वरूप धारण करतात, तेव्हाही लग्न मोडू शकते. काळ वेगाने बदलत चालला असून, सर्वांच्याच अपेक्षा वाढत चालल्या आहेत. त्या पूर्ण होत नसल्यामुळेही एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच शहाणपण आणि संयम या दोन्ही गोष्टी पती आणि पत्नी दोहोंकडे असायला हव्यात. दोन्ही बाजूंनी ताणले गेल्यास तुटणे स्वाभाविक असते. म्हणूनच तुटेपर्यंत ताणू नये, असे म्हणतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com