Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedप्रश्न बिबट्यांच्या संरक्षणाचा

प्रश्न बिबट्यांच्या संरक्षणाचा

– प्रा. रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

भारतात बिबट्यांची संख्या मोठ्या वेगाने वाढत आहे. परंतु त्याबरोबरच बिबट्यांचे संरक्षण करण्याची चिंताही वाढत आहे.

- Advertisement -

देशातील अनेक राज्यांत आजही बिबट्यांची शिकार होत आहे. सरकारी अहवालानुसार, ईशान्येकडील राज्यांमधील डोंगराळ भाग आणि ब्रह्मपुत्रेच्या पठारी प्रदेशात अवैध शिकार तसेच मानव-वन्यजीव संघर्ष वाढला आहे. त्याचबरोबर शेती आणि चहाच्या बागांशी संबंधित जमिनीचा व्यावसायिक वापर वाढत असल्याने बिबट्यांसाठी तो एक धोका आहे.

भारतात बिबट्यांची संख्या वाढत आहे, ही खरे तर सुखद गोष्ट आहे. 2014 मध्ये देशात 7,910 बिबटे होते तर 2018 मध्ये बिबट्यांची संख्या 12,852 झाली आहे. केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या 2018 च्या ङ्गभारतातील बिबट्यांची स्थितीफ या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्येही बिबट्यांची संख्या वाढली आहे आणि उत्तर बंगालमधील तीन राष्ट्रीय उद्यानांत 80 पेक्षा अधिक बिबटे नांदत आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अहवाल जारी केल्यानंतर सांगितले की, बिबट्यांच्या संख्येची माहिती त्यांची छायाचित्रे काढण्याच्या प्रक्रियेद्वारे घेण्यात आली. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशात बिबट्यांव्यतिरिक्त वाघ आणि सिंहांची संख्याही वाढली आहे. आपल्याकडील परिस्थितकी आणि जैवविविधतेचे रक्षण योग्य प्रकारे होत असल्याचे हे द्योतक मानावे लागेल.

या अहवालानुसार, 2018 मध्ये भारतातील बिबट्यांची संख्या 12,852 होती. यात सर्वाधिक 3,421 बिबटे मध्य प्रदेशात आढळून आले. कर्नाटकात बिबट्यांची संख्या 1,783 होती तर महाराष्ट्रात ती 1,690 होती. मध्य भारत आणि पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशात बिबट्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 8,071 एवढी असल्याचे आढळून आले. या क्षेत्रात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, तेलंगण आणि आंध्र प्रदेश ही राज्ये येतात. कर्नाटक, तमिळनाडू, गोवा आणि केरळ या राज्यांमध्ये पश्चिम घाटाच्या क्षेत्रात 3,387 बिबटे आहेत तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहारचा समावेश असलेल्या शिवालिक आणि गंगेच्या पठारी प्रदेशात 1,253 बिबटे आढळून आले आहेत. ईशान्येकडील पहाडी क्षेत्रात केवळ 141 बिबटे आहेत. अहवालात असे म्हटले आहे की, ईशान्येकडील डोंगर आणि ब्रह्मपुत्रेच्या पठारी प्रदेशात अवैध शिकार, माणूस आणि वन्य प्राण्यांमधील संघर्ष, तसेच शेती आणि चहाच्या बागांशी संबंधित जमिनीचा व्यावसायिक वापर वाढल्यामुळे बिबट्यांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

प्रकाश जावडेकर यांच्या म्हणण्यानुसार, भारतात वाघांची जपणूक उत्तम प्रकारे केली जात आहे, याचा अर्थ परिस्थितकी तंत्र उत्तम आहे आणि एखाद्या छत्रीप्रमाणे वाघांचे रक्षण करीत आहे. त्यामुळेच बिबट्यांसारख्या वन्यजीवांची सद्यःस्थितीही समोर आली आहे. यापूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) केलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालात असे म्हटले होते की, जंगलांचा नाश वेगाने होत असल्यामुळे बिबट्यांना राहण्यासाठी जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळेच शिवालिक आणि गंगेच्या पठारी प्रदेशात तसेच मध्य भारतातील अनेक भागांत बिबटे मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचले आहेत आणि त्यामुळेच संघर्षाच्या घटना वाढल्या आहेत. वन्यजीव तज्ज्ञ निर्मल घोष यांच्या म्हणणअयानुसार, बिबट्यांच्या वाढत्या संख्येच्या बातमीमुळे खूश होऊन स्वतःची पाठ थोपटून घेण्याऐवजी सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात.

वन्यजीवांच्या हितासाठी काम करणार्‍या एका स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख सोमेन कुमार दत्त यांच्या म्हणण्यानुसार, हत्तींपासून वाघ, गेंडे आणि बिबटेसुद्धा अवैध शिकारींमुळे मोठ्या संख्येने बळी पडत आहेत. या शिकारीला अंकुश लावण्यासाठी केलेले आजवरचे उपाय यशस्वी झालेले नाहीत. विशेषतः संवेदनशील भागांत म्हणजे ज्या भागांमधून शिकारीच्या घटनांच्या बातम्या मोठ्या संख्येने येतात, तिथे ठोस योजना सुरू करणे गरजेचे आहे. वन्यजीवांची केवळ संख्या वाढणे पुरेसे नाही, तर त्यांचे संरक्षण होणेही तेवढेच आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या