Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedसामरिक वर्चस्वाचा ‘मार्ग’

सामरिक वर्चस्वाचा ‘मार्ग’

– श्रीकांत देवळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान शेख हसिना यांनी भारत आणि बांगलादेश यांच्यातील 55 वर्षांपासून बंद असलेली चिल्हाटी-हल्दीबाडी रेल्वे मार्गाचे उदघाटन केले.

- Advertisement -

हा रेल्वे मार्ग 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात बंद केला होता. याशिवाय उभय देशात अनेक महत्त्वाचे करार झाले. चिल्हाटी-हल्दीबाडी रेल्वे मार्ग हा भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा मार्ग आणखी एका गोष्टीसाठी उपयुक्त आहे. हा मार्ग सिलीगुडीचा एक भाग असून त्या भागाला चिकननेक असे म्हटले जाते. याच भागातून चीनच्या कारवायांवर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकते.

गेल्या पाच दशकांपासून बंद असलेला चल्हाटी-हल्दीबाडी रेल्वे मार्गाचे ऑनलाइन उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या उपस्थितीत झाले. या मार्गामुळे व्यापारवाढीबरोबरच चीनच्या सीमेलगत कुरापतीकडे लक्ष ठेवणे सोयीचे जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्या द्विपक्षीय संबंधाला 1971 पासून सुरवात झाली. भारताने बांगलादेशला स्वंतत्र देश म्हणून पाठिंबा दिला आणि तेथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शांतीसेना पाठवली. एवढेच नाही तर भारताचे बांगलादेशबरोबर भावनात्मक संबंध देखील राहिले. कारण बांगलादेश हा बंगालचा एक भाग होता.

1947 रोजी देशाची फाळणी झाली आणि बंगालचा मुस्लिमबहुल भाग हा पाकिस्तानचा भाग झाला. त्याला पूर्व पाकिस्तान असे म्हटले जावू लागले. परंतु भौगालिकदृष्ट्या पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान (आताचे पाकिस्तान) यांच्यात संबंध राहणे खूपच कठिण होते. हा भाग केवळ भौगोलिक दृष्ट्या पश्चिम पाकिस्तानपासून वेगळा नव्हता तर जात आणि भाषाच्या आधारावर त्याचे वेगळेपण दिसून येत होते. कालांतराने बांगलादेश मुक्तीची मागणी स्थानिक नागरिकांकडून होऊ लागली. शेवटी 27 मार्च 1971 रोजी शेख मुजीबर रेहमान यांनी पाकिस्तानपासून बांगलादेशला स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. त्यामुळे पश्चिम पाकिस्तानने ही फूट रोखण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले आणि युद्ध पुकारले. पूर्व पाकिस्तानातील अराजकतेमुळे हजारो शरणार्थी भारतात आले. परिणामी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या चिंतेत वाढ झाली.

शेवटी भारताने हस्तक्षेप केला आणि बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून ओळख प्रस्थापित करण्यासाठी मदत केली. 16 डिसेंबर 1971 रोजी पूर्व पाकिस्तानचे कमांडर ए.के. नियाजी यांनी 93 हजाराहून अधिक सैनिकासमवेत भारतापुढे शरणागती पत्करली. पाकिस्तानला 1971 मध्ये पराभूत व्हावे लागले आणि जगाच्या नकाशात बांगलादेश नावाच देश उदयास आला. या संग्रामात भारताचे 3900 जवान हुतात्मा झाले तर 9851 जण जखमी झाले. भारतात दरवर्षी 16 डिसेंबरला विजय दिवस साजरा करण्यात येतो.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना या बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे वंगबंधू मुजीबुर रेहमान यांची कन्या होत. भारत आणि बांगलादेश यांच्यात सर्वच क्षेत्रात देवाणघेवाण राहिली आहे. मग दळणवळण असो किंवा व्यापार असो. आता त्यापुढचे पाऊल टाकण्यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात मध्य डिजिटल शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान शेख हसिना यांनी भारत आणि बांगलादेश यांच्यातील 55 वर्षांपासून बंद असलेली चिल्हाटी-हल्दीबाडी रेल्वे मार्गाचे उदघाटन केले. हा रेल्वे मार्ग 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या काळात बंद केला होता. याशिवाय उभय देशात अनेक महत्त्वाचे करार झाले.

चिल्हाटी-हल्दीबाडी रेल्वे मार्ग हा भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. हा मार्ग आणखी एका गोष्टीसाठी उपयुक्त आहे. हा मार्ग सिलीगुडीचा एक भाग असून त्या भागाला चिकननेक असे म्हटले जाते. याच भागातून चीनच्या कारवायांवर नियंत्रण ठेवणे शक्य होऊ शकते. भूतानच्या सीमेलगत चीनच्या वाढलेल्या कुरापती पाहता भारत अगोदरच सजग झालेला आहे. त्यामुळे भारताकडून पर्यायी जमीनी रस्त्याचा विचार केला जात असताना या कामी केवळ बांगलादेशच मदत करु शकतो. बांगलादेशच्या सीमा तीन पूर्वोत्तर राज्यांना मिळतात. या क्रमवारीत भारताने बांगलादेशला आवाहन केले असून त्यानुसार बंगाल (हिली)ला मेघालय (महेंद्रगंज)शी जोडण्यासाठी रस्ते मार्ग उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. या बदल्यात बांगलादेशने देखील भारतासमोर काही मागण्या मांडल्या आहेत. भारत-म्यानमार-थायलंड महामार्ग योजनेत सामील होणे, बांगलादेशच्या उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली करणे, बांगलादेशच्या ट्रकना चट्टोग्राम पोर्टहून पूर्वोत्तर राज्यांना जाण्यासाठी मूभा देणे याचा समावेश आहे.

बांगलादेशने पद्मा नदीत 1.3 किलोमीटर लांबीच्या मार्गाची मागणी केली आहे. अर्थात हे सर्व मुद्दे किचकट आहेत, मात्र त्यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा करायला हवी. भारत आणि बांगलादेश यांच्यात सहमती झाल्यास भारतासाठी चिकननेकबाबतची चिंता कमी होईल. चिकननेक हा भाग भारत आणि पूर्वोत्तर राज्यादरम्यानचा निमुळता मार्ग आहे आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. चीनसारखा देश या भागावर सतत लक्ष ठेवून असून तो यावर आक्रमण करुन या भागाला भारतापासून वेगळे पाडू शकतो, अशी भीती आहे. सिक्कीम जेव्हा भारताचे राज्य झाले तेव्हा भारताला उत्तर पूर्व येथील चुंबी खोर्‍यातून चीनच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सोयीचे झाले. आता चीनचे लक्ष चिकननेकवर आहे. 2017 मध्ये डोकलामचा वाद हा चिकननेकवरील ताब्यावरून झाला होता. सध्याच्या नव्या रेल्वे मार्गाने भारताला सीमाभागात सामानाची आणि जवानांची ने आण करणे सोयीचे जाणार आहे. चीनची आक्रमकता कमी करण्यासाठी नवा रेल्वे मार्ग उपयुक्त आहेच, त्याचबरोबर उभय देशातील संबंध अधिक मजबुत होणे आवश्यक आहे.

बांगलादेच्या शेख हसिना सरकारने पूर्वोत्तर राज्यात दहशतवाद कमी करण्यासाठी भारताची बरीच मदत केली आहे. बांगलादेशमध्ये बस्तान मांडून बसलेल्या उल्फा दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करण्यात बांगलादेशने सहकार्य केले. त्यामुळे उल्फा दहशतवाद्यांची कंबर मोडली गेली. अर्थात बांगलादेशमधील कट्टरपंथीय अजूनही भारताविरोधात आहेत. आजही पाकिस्तान बांगलादेशातील कट्टरपंथीय संघटनाच्या मदतीने भारतात हिंसाचार घडवून आणण्याच्या कुरापती करत आहे. खालिदा झिया सरकारच्या काळात भारत आणि बांगलादेशचे संबंध बिघडले होते. पण शेख हसिना सरकारने बर्‍याच प्रमाणात कट्टरपंथीय शक्तींना लगाम घालण्यास यश मिळवले आहे. कोरोनाच्या काळातही दोन्ही देश एकत्र आले. दोन्ही देशांनी यावर्षी दळणवळण विकसित होण्याबाबत अनेक योजना सुरू केल्या. पुढील वर्षी भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधाला 50 वर्ष पूर्ण होतील. यानिमित्ताने दोन्ही देशाचे संबंध नवीन पायंडा पाडतील, अशी आशा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या