Friday, April 26, 2024
HomeUncategorizedआरोग्यदायी आयुर्मानाची गरज

आरोग्यदायी आयुर्मानाची गरज

– विधिषा देशपांडे (Vidhisha Deshpande)

अलीकडेच जागतिक आरोग्य स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट २०२१ नुसार महिला आणि पुरुषांच्या आयुर्मानाबाबत आणि त्यांच्या आरोग्याबाबत नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. रिपोर्टनुसार जगभरात महिलांचे आयुष्य हे पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांना अपेक्षेपेक्षा अधिक आयुष्य लाभले आहे. याचा अर्थ असा नाही की आरोग्याच्या बाबतीत महिला पुरुषापेक्षा अधिक सक्षम आहेत.

- Advertisement -

अहवालानुसार, सरासरी वयाच्या पातळीवर महिला आणि पुरुषातील हे अंतर खूपच कमी दिसते. सरासरी आरोग्यदायी वयाचा विचार केल्यास महिला आणि पुरुष यांची स्थिती जवळपास एकसारखीच आहे. म्हणजेच जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आरोग्य अधिक कमकुवत राहताना दिसते. आपल्या देशात सरासरी आयुष्याचा विचार केल्यास पुरुषापेक्षा महिलांचे आयुष्य तीन वर्ष अधिक दिसते. परंतु आरोग्याचा विचार केल्यास त्यांची प्रकृती ही पुरुषांसारखीच आहे. जेंडरचा प्रश्‍न वगळून या प्रकरणाकडे पाहिले तर चित्र अधिकच स्पष्ट होते.

सर्वसामान्यपणे व्यक्तींचे जागतिक सरासरी आयुर्मान ७३.३ वर्ष आहे तर सरासरी आरोग्यदायी आयुर्मान हे ६३.७ वर्ष आहे. म्हणजे दोघांत सुमारे ९ वर्षाचे अंतर आहे. याचा अर्थ लोकांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे ही विविध आजारपणात जातात. आणखी एक गोष्ट म्हणजे विविध देशातील सरासरी वयोमान वाढत असले तरी तुलनेने आरोग्यादायी आयुष्याचे वय वाढलेले दिसत नाही. म्हणजेच महिला आणि पुरुष यांच्यातील अंतर ही समस्येची एक बाजू आहे.

ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यदायी बाजू देखील कमी महत्त्वाची नाही. विशेष म्हणजे दोन्हीपैकी कोणतीही बाजू ही तज्ञांच्या नजरेतून सुटलेली नाही. कुटुंबात पित्तृसत्ताक विचारसरणीच्या प्रभावामुळे महिलांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही किंवा महत्त्व दिले जात नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीही महिला स्वत:ला मागेच ठेवण्यात धन्यता मानतात.

याशिवाय आर्थिक आत्मनिर्भरतेच्या अभावामुळे आरोग्य सेवा देखील महिलांपर्यंत थेटपणे पोचत नाहीत. जसजसे महिला आत्मनिर्भर होतील, तसतसे या आघाडीवर सुधारणांचा विचार केला जावू शकतो. परंतु जागतिक पातळीवर सरासरी आयुष्य आणि आरोग्याच्या आघाडीवरचे सरासरी आयुष्य यातील अंतराचा प्रश्‍न असेल तर तेथे धोरण आणि योजनांच्या दिशेचाही विचार करावा लागेल.

विविध सरकारच नाही तर जागतिक पातळीवर वैद्यकीय संशोधनासाठी केलेल्या ङ्गंडीगमध्ये वाढणारा सहभाग हा मृत्युचे कारण आणि दूर करण्यावर अवलंबून असतो. त्याचा सकारात्मक परिणाम हा सरासरी आयुष्य वाढण्याच्या रुपातून दिसतो. आता ज्येष्ठ नागरिकांच्या आजारपणाकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज असून या आधारे संभाव्य आजारपण रोखण्यात मदत मिळेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना दीर्घायुष्य लाभण्याबरोबरच ते चांगले आरोग्यादायी जीवन जगू शकतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या