Monday, April 29, 2024
HomeUncategorizedमाया संस्कृतीचे गूढ

माया संस्कृतीचे गूढ

विनिता शाह

अनेक प्राचीन संस्कृतींचे अवशेष जगभरात पाहायला मिळतात. त्या विशिष्ट काळाबद्दल ते आपल्याला माहिती देतात. पुरातत्त्व अभ्यासकांनी अनेक संस्कृतींवर सखोल संशोधन केले आहे आणि त्या संस्कृतींची माहिती मिळविली. परंतु मेक्सिकोमधील प्राचीन आणि विकसित माया संस्कृती हे अद्याप रहस्यच राहिले आहे. या प्राचीन संस्कृतीची भव्यता, त्या संस्कृतीचे रहस्यमय अवशेष आणि त्यातून निघणार्‍या काही निष्कर्षांची माहिती घेणे रंजक ठरेल.

- Advertisement -

जगभरातील अद्याप न उलगडलेल्या दहा रहस्यांची यादी ज्या-ज्यावेळी तयार केली जाते, त्या-त्या वेळी माया संस्कृतीचे नाव त्यात असतेच. वस्तुतः त्या संस्कृतीशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरितच राहिले आहेत. उदाहरणार्थ, हजारो वर्षांपूर्वी 20-20, 22-22 मजली महाल आणि मंदिरे तयार करणारी माया संस्कृतीतील माणसे अखेर कोण होती? ही अत्यंत विकसित अशी संस्कृती एकाएकी नष्ट कशामुळे झाली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जग गेल्या दीडशे वर्षांपासून शोधत आहे. परंतु माया संस्कृतीच्या अस्तित्वाचे वास्तव काय होते, हे सांगणारे एकही उत्तर आतापर्यंत मिळालेले नाही.

सर्वसामान्य लोकांच्याच नव्हे तर पुरातत्त्व संशोधकांच्या दृष्टीनेही माया संस्कृती हे एक न सुटलेले कोडे आहे. माया संस्कृतीच्या अवशेषांचा सखोल अभ्यास आणि संशोधन केल्यानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला की, अतिविकसित आणि बुद्धिशाली अशी ही माया संस्कृती तिसर्‍या शतकापासून दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अस्तित्वात होती. त्यानंतर रहस्यमय कारणांमुळे ही संस्कृती अचानक विलुप्त झाली.

मूळ रूपात सध्याच्या मध्य अमेरिकेतील मेक्सिकोमध्ये विकसित झालेली ही संस्कृती होंडूरास, ग्वाटेमाला आणि अलसेल्वाडोर देशांमध्येही सुमारे 1500 वर्षांपूर्वी उदयास आली होती. त्यानंतर इसवी सनाच्या तिसर्‍या शतकापासून नवव्या शतकापर्यंत ही संस्कृती विकासाच्या अत्युच्च शिखरावर होती. परंतु अकराव्या शतकानंतर या संस्कृतीचे पतन होण्यास सुरुवात झाली. या संस्कृतीच्या अवशेषांची भव्यता पाहून पुरातत्त्व संशोधकांना असे समजले आहे की, माया संस्कृतीतील लोकांना नक्षत्र विज्ञानाची संपूर्ण माहिती होती.

गणिताच्या बाबतीत त्यांचे ज्ञान अत्यंत व्यापक आणि आश्चर्यकारक होते. माया संस्कृतीतील लोक मोजदाद करताना शून्याचा वापर करण्याची प्रक्रिया जाणत होते. एवढेच नव्हे, तर माया संस्कृतीतील लोकांना सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणांची माहिती देणारे विकसित स्वरूपाचे विज्ञानसुद्धा ज्ञात होते.

माया सभ्यतेतील रहिवाशांना अवगत असलेली इमारतींच्या बांधकामाची कला पाहून मोठमोठे अभियंते आणि स्थापत्य विशारद हैराण होऊन जातात. विशेषतः माया लोकांची मंदिरे पाहून अधिक आश्चर्य वाटते. त्यांची गगनचुंबी मंदिरे रहस्य आणि आश्चर्याचे असे मिश्रण आपल्यासमोर पेश करतात, की पाहणारा हरखून जातो. आपण माया संस्कृतीत राहणार्‍या लोकांच्या शास्त्रीय ज्ञानाने आचंबित व्हावे की त्यांच्या जीवनशैलीकडे निर्देश करणारी मंदिरे आणि इमारती पाहून धास्तावावे, असा प्रश्न पडतो.

वस्तुतः माया संस्कृतीतील महाल आणि मंदिरे यामुळेच जगभरात या संस्कृतीची प्रतिमा रहस्यमय बनलेली आहे. माचू पिच्चू डोंगरराजीत विखुरलेले शेकडो अवशेष आणि महालांचे सर्व कोपरे माया संस्कृतीचे विराट वैभव दाखवून देतात आणि ते पाहून छातीत धडकीही भरते, आश्चर्यही वाटते आणि जगाच्या इतिहासाबद्दल अभिमानही वाटतो.

माया संस्कृतीच्या अवशेषांमध्ये पिरॅमिडच्या आकृतीतील अनेक मंदिरे आहेत. कोरोनाची साथ सुरू होण्यापूर्वी ही मंदिरे पाहण्यासाठी जगाच्या कानाकोपर्‍यातून लाखो लोक येत होते. 234 फुटांपर्यंत उंचीची ही मंदिरे आहेत. इतक्या उंच इमारती आणि त्यांची इतकी अचूक भूमितीय संरचना निर्माण करण्याची कला इसवी सनाच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या शतकात अस्तित्वात होती? असे प्रश्न पडल्यानंतर काही वेळा वाटते की, माया संस्कृती ही एक जादुई संस्कृतीच होती.

माया संस्कृतीमधील पिरॅमिडच्या आकाराची मंदिरे इतकी भव्य आहेत की त्या भव्यतेविषयी जितके बोलले, लिहिले, ऐकले किंवा वाचले गेले असेल ते ही मंदिरे पाहताच फिके वाटू लागते. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही मंदिरे आणि महाल एका खास कारणामुळे जगात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. माया संस्कृतीमध्ये केल्या गेलेल्या भविष्यवाणीवर विश्वास करणारे असंख्य लोक आहेत. या लोकांनी जगाचा अंत होण्याची वेळ निश्चित केली होती, असे अनेकांकडून सांगितले आणि मानलेही जाते.

या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे, हा ज्याच्या त्याच्या कल्पनेचा विषय आहे. माया संस्कृतीतील लोकांना जगाचा अंत होण्याची वेळ खरोखर समजली होती का, या प्रश्नाचे उत्तर भूतकाळाच्या रहस्यात आणि भविष्याच्या काळोखात दडलेले आहे. परंतु सध्या तरी या अनोख्या संस्कृतीची स्थापत्यकला पर्यटकांना, संशोधकांना आणि कलावंतांना या संस्कृतीच्या अवशेषांकडे आकर्षित करते, एवढे मात्र खरे!

- Advertisment -

ताज्या बातम्या