मान्सून झाला लहरी

jalgaon-digital
7 Min Read

– प्रा. रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक

हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे वाढत असलेल्या प्रदूषणाचा परिणाम म्हणून अन्य अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. अमेरिकेत गेल्या वर्षी आलेल्या हिमवादळाने आणि भारतात काही वर्षांपूर्वी उत्तराखंड, बिहार आणि तमिळनाडूमध्ये आलेला महापूर, अवकाळी पाऊस आदी समस्यांनी लोकांना जेरीस आणले. जागतिक तापमानवाढीच्या परिणामांपासून जीवन, पृथ्वी आणि नैसर्गिक साधनसंपत्ती कशी वाचवायची, हे एक मोठे आव्हान बनले आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, जागतिक तापमानवाढीमुळे मॉन्सून तयार होण्यासाठीच्या परिस्थितींवर परिणाम झाला आहे. पाऊस सातत्याने कमी होत आहे आणि अशाच प्रकारे पाऊस कमी होत राहिला तर आगामी काही दशकांत पावसाळ्याची जागा दुष्काळ घेईल, असे संकेत या परिस्थितीतून मिळत आहेत. यामुळे जागतिक स्तरावर उपासमार, वेगवेगळे आजार, जंगले आणि हिरवळीचा विनाश, भूगर्भातील पाणीसाठा कमी होणे, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशा अगणित संकटांशी आणि समस्यांशी जगाला मुकाबला करावा लागेल.

हवामानाचे स्वरूप बदलल्यामुळे अगणित समस्या मानवजातीें समोर आव्हान बनून उभ्या ठाकल्या आहेत. परंतु ज्या कारणांमुळे समस्या निर्माण होत आहेत, त्यांची माहिती असूनसुद्धा ती नष्ट करण्याच्या मार्गात अडथळे येत आहेत. या कारणांमध्ये जागतिक तापमानवाढ, हरितगृह वायूंचे उत्सर्जन सातत्याने वाढणे आणि नैसर्गिक संसाधनांचे मनमानी दोहन ही प्रमुख कारणे आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, 1901 ते 2020 या कालावधीत भारताच्या सरासरी तापमानात 0.71 अंशांची वाढ झाली आहे. 2016 हे भारतातील आतापर्यंतचे सर्वांत गरम वर्ष ठरले आहे. हवामानातील बदलांनी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच शास्त्रज्ञांनाही चिंतेत टाकले आहे. शेती, बागायती आणि औषधनिर्माणाशी संबंधित सर्व क्षेत्रांवर जागतिक तापमानवाढीचे धोकादायक परिणाम गेल्या वीस वर्षांपासून पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे तर्‍हेतर्‍हेचे आजार आणि समस्यांचा धोका सातत्याने वाढत आहे. गेल्या वीस वर्षांत शेती उत्पादनात 15 टक्के घट झाली आहे.

जागतिक उत्पादनातही चार टक्क्यांची घट झाली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतात भातपिकाच्या लागवडीखाली असलेले 40 टक्के क्षेत्र शेतीयोग्य राहणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भात, गहू, जवस आणि बटाटा यांसारख्या पिकांमधील पौष्टिक गुणधर्मांमध्ये सहा टक्क्यांची घट झाली आहे. पौष्टिक गुण अशा प्रकारे कमी होत राहिले तर अन्नधान्ये ही मानवजातीची रक्षक राहणार नाहीत, तर ती एक समस्या बनेल.

शास्त्रज्ञांच्या मते, जागतिक तापमानवाढीच्या परिणामांमुळे पावसाळ्याचे स्वरूप असंतुलित झाले आहे. कधी वेळेपूर्वी तर कधी वेळ उलटून गेल्यानंतर अत्यधिक पाऊस झाल्यामुळे पीकचक्रावर प्रचंड मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे. आजपासून 40 ते 50 वर्षांपूर्वीच्या हवामानात आणि आजच्या हवामानात झालेले बदल ज्यांना ठाऊक आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार पर्यावरणाच्या प्रदूषणाचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर झाला आहे. याचा प्रचंड दुष्परिणाम ऋतुचक्रावर आणि अन्य घटकांवर झाला आहे. कोरोनाच्या एक वर्षाच्या कालावधीत जलवायू परिवर्तनाशी संबंधित अनेक आश्चर्यजनक घटना ऐकायला-पाहायला मिळाल्या.

यावर्षी मे आणि जून महिन्यांत गेल्या 112 वर्षांमधील सर्वांत सौम्य उन्हाळा जाणवला. त्याचप्रमाणे अलीकडील दशकांमध्ये केवळ मॉन्सूनचा पाऊसच कमी झाला असे नाही तर पावसाचे वितरणही असंतुलित झाले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जागतिक तापमानवाढीच्या वाढत्या परिणामांमुळे मान्सून तयार होण्याच्या परिस्थितीवर परिणाम होत आहे. दिल्ली हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 1981-90 या दशकात मौसमी पाऊस 881 मिलीमीटर पडत असे. 2002-2010 या दशकात तो 841 मिलीमीटर एवढा पडला तर 2011-20 या दशकात मोसमी पाऊस 860 मिलीमीटर नोंदविला गेला.

पाऊस अशा प्रकारे सातत्याने कमी होण्याचा अर्थ असा की, पाऊस असाच कमी होत राहिला तर आगामी काही दशकांमध्ये पावसाच्या ऐवजी आपल्याला दुष्काळ पाहावा लागेल. त्यामुळे जागतिक स्तरावर उपासमार, वेगवेगळे आजार, जंगले आणि हिरवळींचा नाश, भूगर्भातील पाणीसाठा कमी होणे, पिण्याच्या पाण्याची टंचाई यासह अगणित समस्या आणि संकटांशी आपल्याला झुंजावे लागेल. जागतिक तापमानवाढीच्या परिणामांमुळे मध्य भारतात गेल्या 65 वर्षांत पावसात घट होत गेली आहे.

ऋतुचक्र बदलल्यामुळे अवकाळी पाऊस, दुष्काळ, पूर आणि अवर्षणासारखी परिस्थिती सातत्याने निर्माण होत आहे. यामुळे विस्थापन ही कायमस्वरूपी समस्या होऊन बसेल. एका अंदाजानुसार, जलसंकट, अवर्षण, कृषी संकट आणि समुद्राच्या जलस्तरात वाढ या कारणांमुळे 2050 पर्यंत आग्नेय आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील 3 ते 14 कोटी एवढी लोकसंख्या प्रभावित होऊन या लोकसंख्येवर अतंर्गत विस्थापनाचे संकट कोसळू शकते. पुढील युद्धे पाण्यासाठी होतील, ही शक्यता वास्तवात रूपांतरित होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

पुढील काही वर्षांत जलवायू परिवर्तनामुळे भूगर्भातील पाणीसाठ्यात तीन चतुर्थांशने घट होऊन अडीच अब्ज लोकसंख्येला जलसंकटाचा मुकाबला करावा लागेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत जागतिक स्तरावर पाण्यासाठी ‘जलयुद्ध’ छेडले जाऊ शकते. जगातील 50 टक्के लोकसंख्या आजच पाणीसंकटाशी झुंज देत आहे, हे गंभीरपणे विचारात घेण्याजोगे आहे. महागाई सातत्याने वाढत आहे, त्यालाही जागतिक तापमानवाढ हेच कारण आहे, हे खूप कमी लोक जाणतात. महागाई वाढल्यामुळे गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गातील लोकांना दोनवेळचे अन्न मिळविणे अवघड झाले आहे. आगामी काळात अन्न, पाणी आणि औषधांच्या कमतरतेची समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. येणार्‍या काळात एक कोटीपेक्षा अधिक मुलांना कुपोषण आणि खुजेपणाच्या समस्येला सामोरे जावे लागेल. त्यामुळे गरीब कुटुंबात वेगवेगळ्या स्वरूपाच्या समस्या निर्माण होतील.

पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे आता हिवाळा आणि उन्हाळ्यातील वातावरणात बदल आणि अवकाळी पाऊस यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे जगाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या डेंग्यू, चिकूनगुणिया, जिका आणि पिवळा ताप अशा आजारांनी ग्रस्त होऊ शकते. या लोकसंख्येला आजारांमधून बाहेर काढण्यासाठी सरकारांना अतिरिक्त पैसा आणि संसाधने खर्ची घालावी लागतील. जागतिक तापमानवाढीचा परिणाम गरीब कुटुंबांमधील मुलांसाठी अधिक धोकादायक असू शकतो. डायरियामुळे होणार्‍या

बालमृत्यूंची व्याप्ती आणि आकडेवारी प्रचंड प्रमाणात वाढू शकते.

हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे वाढत असलेल्या प्रदूषणाचा परिणाम म्हणून अन्य अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. अमेरिकेसारख्या देशात हिमवादळाचा गेल्या वर्षी जो प्रकोप दिसून आला, त्यामुळे झालेली हानी तेथील लोक क्वचितच विसरू शकतील. त्याचप्रमाणे भारतात काही वर्षांपूर्वी उत्तराखंड, बिहार आणि तमिळनाडूमध्ये आलेला महापूर, अवकाळी पाऊस आदी समस्यांनी लोकांना जेरीस आणले. जागतिक तापमानवाढीचा परिणाम महानगरे आणि शहरांमध्ये राहणार्‍या लोकांच्या दैनंदिन जीवनावर पडू लागला आहे. सुखसुविधा वाढल्यामुळे लोकांमधील सहनशीलता खूपच कमी होत चालली आहे. समृद्ध कुटुंबांमधील मुले, वयोवृद्ध लोक आणि तरुणसुद्धा सुखसुविधांसह जगण्यास सरावले आहेत. दुसरीकडे मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्नगटातील कुटुंबांना वर्षभर सुखसुविधा उपलब्ध करण्यासाठीच झगडताना दिसतात. ज्यांच्याजवळ सुखसुविधा आहेत, ते लोक नैसर्गिक संकटांचा सामना करू शकतात. परंतु ज्यांच्याकडे सुविधा नाहीत त्यांना उन्हाचा आधार घेऊन थंडीचा सामना करावा लागतो.

केवळ थंडीच्या दिवसांतच नव्हे तर उन्हाळा आणि पावसाळ्यातसुद्धा हे लोक स्वतःचा कसाबसा बचाव करताना दिसतात. जागतिक तापमानवाढीचा परिणाम शहरी गरीब आणि ग्रामीण क्षेत्रात राहणार्‍या लोकांवर सर्वाधिक पडू लागला आहे. त्याच वेळी शेती आणि बागायतीवर परिणाम झाल्यामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती सातत्याने शोचनीय बनत चालली आहे. त्यामुळे गावांकडून शहरांकडे होणार्‍या स्थलांतरांमध्ये वाढ झाली असून, शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. जागतिक तापमानवाढीच्या परिणामांपासून जीवन, पृथ्वी आणि नैसर्गिक साधनसंपत्ती कशी वाचवायची, हे एक मोठे आव्हान बनले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *