Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedदीप उजळती आशांचे

दीप उजळती आशांचे

– आश्लेषा महाजन

यंदाची दिवाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी होत आहे. वैश्विक महामारीच्या आघातातून सावरत आपण प्रकाशाचा हा उत्सव साजरा करत आहोत. या साजरीकरणातून आपल्याला प्रसन्नता आणि जगण्याची नवी उमेद मिळवायची आहे.

- Advertisement -

जगण्याची असोशी जपायची आहे. आत्मबळाचं इंधन घालून आशेची ज्योत पेटवायची आहे. त्याच वेळी संशोधक, डॉक्टर, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या ऋणाचं भानही ठेवायचं आहे.

आपल्या संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासूनच दीप उजळवण्याची परंपरा आहे. दीपावली ही त्यातलीच एक महत्त्वपूर्ण कडी म्हणावी लागेल. हा दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा उत्सव आहे, ती दिव्यांची आवली म्हणजे दिव्यांची रांग आहे. म्हणून ती दीपावली आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अशी प्रार्थना करत अंधार संपून आमचं जीवन ज्योतिर्मय होवो, ही प्रार्थना करत वेदकाळापासूनच आपण तेजाची उपासना करत आलो आहोत. तेजोनिधी असणार्या सूर्याची नावं पाहिली तरी आदित्य म्हणजे प्रकाशमान करणारा, हिरण्यगर्भ म्हणजे ज्याच्या पोटात हिरण्य म्हणजेच लखलखणारं सोनं आहे असा, भास्कर म्हणजे चमकणारा असे अर्थ समोर येतात. म्हणजेच या नावांमधूनदेखील माणसाचं तेजाप्रतीचं आकर्षण दिसून येतं.

या आकर्षणामागचं कारण शोधायचं तर अवकाश ही काळोखाची पोकळी आहे. त्या पोकळीत ग्रह, नक्षत्र, तारे आहेत. अशा या काळोख्या पोकळीत प्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व असणं स्वाभाविक म्हणायला हवं. आदिम अवस्थेतल्या मानवाला अमावस्येची पूर्ण काळोखी रात्र अनुभवल्यानंतर उगवतीचं कमालीचं आकर्षण वाटलं असणार. त्याच आकर्षणापोटी पहाटेचं वर्णन करणारी उषासूक्त रचली गेली. हे आकर्षण आपल्याच नव्हे तर देश-विदेशांमधल्या अनेक संस्कृतींमध्ये दिसून येतं. अग्नीचा शोध लागला आणि माणसाने अंधारावर विजय मिळवला. त्यानंतर त्याची प्रगती झाली आणि आजवरचा प्रवास पूर्ण झाला. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे साजर्‍या होणार्‍या सण-उत्सवांकडे पाहिलं तर सण-उत्सव म्हणजे जीवनातल्या आनंदाची प्रतीकं आहेत असं म्हणावं लागेल. ती परंपरेतून निर्माण झाली आहेत. आपण ही प्रतीकं युगानुयुगं सांभाळत आहोत.

सण-उत्सव, परंपरा ही सामाजिक घटितं असतात. अनेक वर्षांच्या सामाजिक घुसळणीतून निर्माण होत ती हळूहळू रुढ होतात आणि एका समाजाकडून दुसर्या समाजापर्यंत पोहोचतात. त्यातूनच अशी प्रतीकं तयार होतात. परंपरांना काही गोष्टी चिकटतात. अमूक दिवशी अमूक करायचं, ठराविक पेहराव-ठराविक नैवेद्य करायचा हे अंगवळणी पडत जातं आणि पुढे प्रांताप्रांतातून विभागत गेल्यामुळे त्यातही वैविध्य दिसून येतं. सण-उत्सवांमध्ये असं वैविध्य पहायला मिळत असलं तरी या सगळ्याचं मूळ आपल्या कृषिसंस्कृतीतच आहे. दिवाळी हादेखील याच संस्कृतीशी निगडित असणारा सण आहे.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस. या दिवशी सवत्स धेनूपूजन केलं जातं. ही प्रथादेखील कृषिसंस्कृतीतून आली आहे. आपल्याकडे पशूंना धन समजलं जातं. बळिराजासाठी ते पशूधनच असतं. आर्यसंस्कृतीमध्ये गायी, म्हशी, अश्व आणि श्वान यांचं पालन करुन त्यांना धन मानलं जात असे. तीच परंपरा आजही बघायला मिळते. वसू म्हणजे पृथ्वी, संपत्ती. त्या अर्थानेही या संपत्तीचं पूजन करणारा हा दिवस महत्त्वपूर्ण आणि दीपावलीच्या मंगलपर्वाच्या प्रारंभाचा ठरतो.

त्यानंतर येते ती धनत्रयोदशी. या दिवशी धनाची पूजा होते. धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. आनंदोत्सवाचा दुसरा दिवस दिमाखात साजरा होतो. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगाचं मोठं महत्त्व आहे. त्यानंतर देवदर्शन करुन तिखट-गोड पदार्थांचा फराळ करायचा, सगळ्यांनी एकत्र येत आनंद साजरा करायचा हे या दिवसाचं साजरीकरण. या दिवसाला एक पौराणिक कथा जोडलेली आहे. ती आहे नरकासुराच्या वधाची. नरकासुराने सोळा हजार स्त्रियांना बळजोरीने बंदिवासात ठेवलं होतं. त्यांना सोडवण्यासाठी श्रीकृष्णाने नरकासुराशी घनघोर युद्ध केलं आणि अखेर त्या सोळा सहस्त्र नारींची सुटका केली. नरक चतुर्दशीच्या दिवशी या आनंददायी घटनेचं स्मरण केलं जातं. सर्वत्र दिवे लावून नरकासुराच्या वधाचा आनंद साजरा केला जातो. या साजरीकरणातून आजही आपण हे मिथक जिवंत ठेवतो.

लक्ष्मीपूजन हा दिवाळीतला एक महत्त्वाचा दिवस. प्रकाशाच्या या सणावेळी दिव्यांच्या लखलखाटात अमावस्या उजळून निघते. या तेजाळलेल्या रात्री व्यापारीवर्गच नव्हे तर घराघरात लक्ष्मीची पूजा केली जाते. साळीच्या लाह्या-बत्तासे यांचा प्रसाद वाटला जातो. या प्रसादातूनही साधेपणा प्रतीत होतो आणि पुन्हा एकदा याचा संदर्भ कृषिसंस्कृतीपर्यंत पोहोचतो. या दिवसात तांदूळ पिकलेला असतो. सुगीचे दिवस असतात. त्याच तांदळापासून बनलेल्या लाह्या आणि गोड पदार्थ म्हणून बत्तासे लक्ष्मीला अर्पण करायचे आणि तिचे आशीर्वाद घ्यायचे इतका हा साधा रिवाज. पण यातूनही साधेपणातलं सौंदर्य, साधेपणातली अभिरुची दिसून येते. हेदेखील संस्कृतीचं संचित आणि घटित आहे. म्हणजेच हे हळूहळू घडत जाऊन रुढ होत गेलं.

बलिप्रतिपदा अर्थात पाडव्यालाही पौराणिक संदर्भ आहेत. बळीराजा हा प्रजाप्रिय राजा होता. पण त्याच्या लोकप्रियतेची देवांना असुया वाटू लागली. हे असंच सुरू राहिलं तर हा राजाच इंद्रपदी पोहोचेल, या आशंकेने देवांनी कारस्थान रचलं आणि विष्णूने बटूरुपात येऊन बळीचा अंत घडवून आणला, ही कथा सर्वश्रुत आहे. पण या कथेतूनही आपल्याला एक सामाजिक संदेश मिळतो. इथेही एक सत्तासंघर्ष दिसतो. आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा देवादानवांचा स्थायी भाव यातूनही प्रतित होतो.

सत्तेची लालसा प्रत्येकालाच असते, हे विखारी सत्य यातून समोर येतं. याच संदर्भाने आजच्या स्थितीबाबत बोलायचं तर पुढे जाणार्याचे पाय खेचण्याची प्रवृत्ती आजही ठायी ठायी दिसून येते. त्यामुळेच आजही आपण ‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ अशी प्रार्थना करतो. आज या निमित्ताने आपण शेतकरी राजाची स्थिती सुधारण्याची प्रार्थना करायला हवी. कारण निसर्ग चक्रीवादळ, कोरोना, अतिवृष्टी या सगळ्या संकटांमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळेच अवघ्या ब्रह्मांडाला तेज देणार्या सूर्याला आपण त्याच्या संकटमुक्तीसाठी प्रार्थना करायला हवी. देशातल्या बळीराजाला वैभव प्राप्त व्हावं, यासाठी प्रार्थना करायला हवी.

भाऊबीज हा दिवाळीतला शेवटचा दिवस. यमद्वितीया म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. खरं म्हणजे यम ही मृत्यूची देवता. पण तो ही या दिवशी आपल्या बहिणीला भेटायला जातो आणि तिच्याकडून औक्षण करुन घेतो. म्हणजेच दिवाळीच्या निमित्ताने माणसाने अमावस्येला प्रकाशमान करुन टाकलं तसंच मृत्यूच्या देवतेलाही उत्सवात सहभागी करुन घेतलं आहे. उत्पत्ती, स्थिती आणि विलय हे चक्र अविरत सुरू असताना यमाचा म्हणजेच मृत्यूच्या देवतेचा होणारा हा सन्मान आहे. या दिवशी बहिणीने भावाला ओवाळणं आणि त्याने ओवाळणी घालणं या बाबी त्या मानाने अलिकडच्या आहेत. पण त्यालाही भावा-बहिणीतल्या प्रेमाचा दरवळ आहे.

अशा प्रकारे दिवाळीत साजरा होणारा प्रत्येक दिवस आनंदनिधान ठरतो. दिवाळीतल्या दिव्यांचं प्रतिबिंब समाजाच्या प्रत्येक अंगावर पडतं. दिव्याने दिवा प्रज्वलित होत राहतो. ही प्रतिबिंबं कला, कहाण्या, चित्र, शिल्प, नाटक, चित्रपट या सगळ्यांमध्ये दिसतात. सगळ्या ललित कलांमध्ये दिवाळी प्रतिबिंबित होते. या निमित्ताने घरातही कुळाचार, व्रतवैकल्य, कर्मकांडं, प्रांतानुसार विशिष्ट पदार्थ पहायला मिळतात. या दिवसांमध्ये निसर्गातही बदल होत असतो. हा सुगीचा काळ सुख आणि समृद्धीचा असल्यामुळे त्या त्या गोष्टींची देवघेव होत असते. आर्थिक बळ असल्याने उत्सवाचं जोरकस साजरीकरण असतं. दिवाळीचं नातेसंबंधांवरील प्रतिबिंबही परिणामकारक ठरतं. पती-पत्नी, बहिण-भाऊ, जवळचे नातलग, मित्रपरिवार हे सगळेच या सणाच्या निमित्ताने परस्परांमधल्या नात्यावर स्नेहाचा नवा वर्ख चढवतात. फराळाच्या पदार्थांची, भेटवस्तूंची देवघेव होते.

दिवाळीची ही प्रतिबिंबंही खूप लोभस होऊन जातात. याचा प्रभाव व्यवहारावरही दिसतो. धर्म-पंथाचं बंधन न राहता, सामाजिक एकोपा दाखवत काही परधर्मिय व्यापारीदेखील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वहीपूजन करताना दिसतात. सणानिमित्ताने होणारं हे सामाजिक अभिसरणही खूप महत्त्वपूर्ण ठरतं.

यंदाची ही दिवाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरी होत आहे. वैश्विक महामारीच्या आघातातून सावरत आपण प्रकाशाचा हा उत्सव साजरा करत आहोत. या साजरीकरणातून आपल्याला प्रसन्नता आणि जगण्याची नवी उमेद मिळवायची आहे, नवी भरारी घ्यायची आहे.

जगण्याची असोशी जपायची आहे. आत्मबळ वाढवायचं आहे, किंबहुना आत्मबळाचं इंधन घालून आशेची ज्योत पेटवायची आहे. पण त्याच वेळी संशोधक, डॉक्टर, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या ऋणाचं भान ठेवायचं आहे. कारण त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कोरोनाच्या भयावह संकटातून आपण सावरलो आहोत. त्यामुळे आपल्या घराबरोबरच त्यांच्याही घरातले दिवे उजळो आणि सर्व काही शुभ घडो ही कामना करु या आणि दिवाळी आनंदाने साजरी करु या.

(शब्दांकन : स्वाती पेशवे)

- Advertisment -

ताज्या बातम्या