गूढ जगाला घाबरवणार्‍या जंगलाचे !
फिचर्स

गूढ जगाला घाबरवणार्‍या जंगलाचे !

रोमानियातील होया बारस्यू नावाचं जंगल हे रोमानियातला बर्म्युडा ट्रँगल म्हणून ओळखलं जातं. बर्म्युडा ट्रँगलप्रमाणंच या जंगलाविषयी असंख्य अद्भुत कहाण्या सांगितल्या जातात. इथं गेलेला माणूस कधीच परत येत नाही आणि आलाच तरी त्याला जंगलात काय पाहिलं, हे आठवत नाही असं बोललं जातं. भुताटकीपासून परग्रहावरील माणसांच्या वास्तव्यापर्यंत अनेक शक्यता व्यक्त केल्या जातात. उडत्या तबकड्याही इथं दिसल्यात म्हणे. हे गूढ कधीतरी उलगडेल. मात्र, तूर्तास सगळे या जंगलाला घाबरून आहेत, हे नक्की...

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

होया बारस्यू हे नाव आपल्याकडे फारसं चर्चेत नसलं, तरी या नावाची चर्चा सुरू झाली की, चेहरे भयग्रस्तच होतात. अगदी बर्म्युडा ट्रँगलविषयीच्या चर्चेत होतात, तसेच. हे एका जंगलाचं नाव असून, जगात एक गूढ म्हणूनच ते ओळखलं जातं. या जंगलात भरदिवसा गेलेला माणूससुद्धा गायब होतो, असं सांगितलं जातं. बर्म्युडा ट्रँगलप्रमाणंच होया बारस्यूच्या कहाण्या अंगावर शहारे आणणार्‍या आहेत. दोन्ही स्थळांमध्ये फरक एवढाच की, बर्म्युडा ट्रँगल पाण्यात आहे आणि होया बारस्यू हे जमिनीवरचं ठिकाण आहे. अत्यंत घनदाट, हिरवंगार असं हे जंगल. रोमानियामध्ये असलेल्या या जंगलाला आजकाल रोमानियातला बर्म्युडा ट्रँगल असं नावच पडलंय. या जंगलात यूएफओ म्हणजे उडत्या तबकड्या पाहिल्या गेल्याच्या आणि इथं गेलेली माणसं गायब होण्याच्या असंख्य कहाण्या सांगितल्या जातात. या जंगलाचं गूढ वाढण्याची अनेक कारणं आहेत. त्यातल्या काही कारणांचा आपण विचार करूया.

क्लूज-नॅपोकापासून जवळच असलेल्या एन्थोग्राफिक म्युझियम ऑफ ट्रान्सिल्वानियानजीक 250 हेक्टर क्षेत्रावर हे जंगल पसरलेलं आहे. लोकांना या जंगलात चित्रविचित्र अनुभव आलेत. काहींना भूतं दिसली आहेत, कुणाला अचानक समोर येणार्‍या आणि अचानक नाहीशा होणार्‍या गोष्टी दिसल्या आहेत, तर काही जणांनी इथं काढलेल्या छायाचित्रांमध्ये अनोळखी व्यक्तींचे चेहरे उमटले आहेत. छायाचित्रकाराला फोटो काढताना मात्र हे चेहरे दिसत नाहीत. 1960 च्या दशकात या अरण्यात अन्आयडेन्टिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स म्हणजेच यूएफओ (फिरत्या तबकड्या) दिसू लागल्यामुळं हे जंगल अचानक चर्चेत आलं होतं. क्लूज येथील एका रहिवाशाने तर यूएफओचा फोटोही काढला होता. या फोटोच्या अनेक तपासण्या, परीक्षणं झाली आणि हा मूळ फोटो असून, त्यात नंतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, हे स्पष्ट झालं. या जंगलात नेहमी जाणार्‍या माणसांनी प्रत्येक वेळी तिथं आलेले चित्रविचित्र अनुभव सांगितले आहेत. या जंगलात गेल्यावर मानसिक अवस्था विचित्र होते आणि आपल्यावर सतत कुणीतरी पाळत ठेवतंय, अशी जाणीव होते असं लोक सांगतात.

या जंगलातल्या झाडांचे आकारही विचित्र आहेत आणि ते तसे असण्याची कारणं सापडत नाहीत, असं काहींचं म्हणणं आहे. या जंगलातली आणखी एक विचित्र गोष्ट अशी की, तिथं गेल्यावर इलेक्ट्रॉनिक उपकरणं हमखास बंद पडतात. या विभागातील काही नैसर्गिक चुंबकीय आणि विद्युतलहरी असण्याची शक्यता असल्यामुळं असं घडत असेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी काढला. मात्र काही संशोधकांनी ही बाब अज्ञात शक्तींमुळं घडत असल्याची धास्ती व्यक्त केली. जंगलाचं गूढ इथेच संपत नाही. जंगलात प्रवेश करताच काही जणांना अंगावर चट्टे उमटल्याचा अनुभव आला, तर काहीजण जंगलात जाताच आजारी पडले. या जंगलात दिसणारी आणखी एक गूढ गोष्ट म्हणजे अचानक प्रकाशमान होणार्‍या वस्तू. जंगलातल्या नीरव शांततेचा भंग करणारा महिलांच्या गप्पांचा आवाजही काहीजणांनी ऐकलाय म्हणे. आसपास पाहिलं तर कुणीच नव्हतं. हा अनुभवही अनेकजण सांगतात. या अद्भुत घटनांचं तार्किक कारण शोधण्यात अद्याप कुणालाच यश आलेलं नाही. म्हणूनच या गोष्टी म्हणजे भुताटकी आहे, असा लोकांचा पक्का समज बनलाय.

या गूढ घटनांचं भय ज्यांना वाटत नाही, अशा शूर आणि धाडसी लोकांसाठी आणखीही काही गूढ गोष्टी या जंगलात आहेत. तिथं अचानक धुकं पडतं आणि ते पांढर्‍या नव्हे तर काळ्या रंगाचं असतं, ही नेहमी सांगितली जाणारी कहाणी आहे. जीवशास्त्रज्ञ अलेक्झांडर स्विफ्ट हे 1960 च्या दशकात या अरण्यात गेले होते. परिसरातील कथित चुंबकीय आणि विद्युत लहरींचा छडा लावण्याच्या मोहिमेवर ते होते. त्यांनी या जंगलात अनेक दिवस अभ्यास केला आणि असंख्य छायाचित्रं टिपली. परंतु त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही. 1993 मध्ये स्विफ्ट यांचं निधन झालं आणि त्यानंतर थोड्याच दिवसांत त्यांनी काढलेली बहुसंख्य छायाचित्रं नाहिशी झाली. ती पुन्हा कधीच सापडली नाहीत. जी मोजकी छायाचित्रं शिल्लक राहिली, ती होया बास्यूमधील गूढ बाबींविषयी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली. अलेक्झांडर स्विफ्ट यांंचे मित्र आणि रसायनशास्त्राचे प्राध्यापक अ‍ॅड्रियन पॅट्रट यांनी हे पुस्तक लिहिले आहे. जंगलातल्या गूढकथांमुळे लोकांना असे वाटू लागले आहे की, या परिसरात गेल्यानंतर वेगळ्याच विश्वाचे दरवाजे उघडतात. काही संशोधकांना या ठिकाणी त्रिमितीच बदलते, असे वाटते. या अरण्यात माणसं अचानक गायब होतात, ही होया बास्यू अरण्याबाबत सांगितली जाणारी सर्वांत भयानक कहाणी. असं सांगितलं जातं की, या जंगलात गेलेली माणसं अचानक दिसेनाशी होतात. बराच काळ ती गायबच राहतात. काही दिवसांनी ती माणसं परततात, मात्र त्यांच्या स्मृतीवर परिणाम झालेला असतो.

जंगलात आपण किती दिवसांपूर्वी गेलो होतो, तिथे काय-काय केलं, काय-काय पाहिलं, हे जंगलातून बाहेर आल्यावर माणसांना आठवतच नाही. अशा प्रकारची सर्वांत प्रसिद्ध कहाणी एका मुलीसंबंधी सांगितली जाते. ती चुकून जंगलाच्या हद्दीत गेली, तेव्हा पाच वर्षांची होती. हरवल्यानंतर पाच वर्षे ती जंगलाच्या परिसरात होती. नंतर ती जेव्हा जंगलातून बाहेर आली, तेव्हा तिला पाच वर्षांत काय-काय घडलं, याबद्दल काहीही आठवत नव्हतं. सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे, पाच वर्षांपूर्वी ती हरवली, तेव्हा तिच्या अंगावर जे कपडे होते, तेच ती जंगलातून बाहेर येतानाही होते.

आणखी एका भयानक गोष्टीची चर्चा वारंवार होते. रोमानियातील शेकडो शेतकर्‍यांना या जंगलात अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आलं होतं. तेव्हापासूनच शेतकर्‍यांचे अतृप्त आत्मे या जंगलात भटकत आहेत. हिरवे डोळे असलेल्या त्यांच्या आकृत्या जंगलात नेहमी दिसतात. कधी-कधी या आकृत्या काळ्या रंगाच्या धुक्याप्रमाणे दिसतात, असं सांगितलं जातं. जंगलात अचानक दिसणारा उजेड नेमका कशाचा आहे, याची थर्मल डिटेक्टरच्या साह्याने तपासणी करण्यात आली होती. परंतु कोणत्याही प्रकारचे औष्णिक प्रवाह आढळून आले नाहीत.

या जंगलातील सर्वांत अद्भुत गोष्ट म्हणजे, वर्तुळाकृती वनस्पतीहीन क्षेत्र. घनदाट अरण्यात एकही झाड किंवा छोटे रोपटेही नसलेले हे क्षेत्र कसे तयार झाले, हा प्रश्न सर्वांनाच पडतो आणि त्याचे उत्तर मात्र कुणालाच माहीत नाही. या वर्तुळात काहीच उगवत नाही. हे क्षेत्र बरोबर वर्तुळाकृती कसे, या प्रश्नालाही उत्तर मिळालेले नाही. या भागातील मातीचे नमुने तज्ज्ञांनी तपासले असून, त्यात असे कोणतेही वेगळे रसायन आढळून आले नाही, ज्यामुळे वनस्पती त्यात उगवूच शकणार नाहीत. त्याचप्रमाणे मातीचे असे कोणतेही मिश्रण येथे आढळत नाही, ज्यामुळे वनस्पतींसाठी हा डेड झोन ठरावा. होया बास्यू जंगल ज्या ट्रान्सिल्वानियामध्ये आहे, तेच जगप्रसिद्ध ड्रॅक्युला कथेचे उगमस्थान आहे. ही कथा जितकी अद्भुतरम्य आणि भयावह आहे, तितकेच हे जंगल भयावह आहे आणि ड्रॅक्युलाची पार्श्वभूमी लाभलेले सर्व लोक या जंगलाविषयीच्या सर्व कहाण्या खर्‍या आहेत, असेच मानतात.

या जंगलाच्या नावामागची कहाणीसुद्धा रंजक आहे. अनेक वर्षांपूर्वी एक मेंढपाळ आपल्या दोनशे मेंढ्या घेऊन या जंगलात गेला होता. त्याचं नाव होया बस्यू असे होते. जंगलातून तो कधीच परतला नाही. आज हे जंगल त्याच्याच नावाने ओळखलं जातं. अंधार, काळ्या आकृत्या आणि विविध वन्यजीवांचे किंचाळण्याचे आवाज जिथं आपोआपच ऐकू येऊ लागतात, असं हे जंगल. खरं तर असे आवाज अनेक जंगलांमधून ऐकू येतात. होया बास्यू जंगलातील अनेक अद्भुत गोष्टीही इतर जंगलांमध्ये अनुभवायला मिळतात. परंतु होया बास्यूचं वेगळेपण त्याच्याशी जोडलेल्या असंख्य कहाण्यांमुळं टिकून राहिलंय. सायंकाळ होताच जंगलातून रडण्याचेही आवाज येतात, असं जंगलानजीक राहणार्यांचं म्हणणं आहे. हे आवाज ऐकवत नाहीत इतके भयावह असतात.

या जंगलात एलियन्स म्हणजे परग्रहावरून आलेल्या लोकांची वस्ती असल्याचंही अनेकजण छातीठोकपणे सांगतात. म्हणूनच तिथं गेलेला माणूस परत येत नाही, यावर सर्वांचा विश्वास आहे. एकही वनस्पती जिथं उगवू शकत नाही, असं वर्तुळाकार क्षेत्र म्हणजे उडती तबकडी उतरण्याचं ठिकाण असावं, असं सांगणारेही आहेत. भविष्यात कधीतरी होया बास्यू जंगलाचं रहस्य उलगडेलसुद्धा. मात्र तूर्तास हे जंगल आणि त्यासंबंधीच्या चित्रविचित्र कहाण्या हे जगासाठी एक गूढच आहे.

अमोल पवार, कॅलिफोर्निया

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com