Friday, April 26, 2024
HomeUncategorizedइ- वाहनांचे युग जीवनमान उंचावणार

इ- वाहनांचे युग जीवनमान उंचावणार

संदिप अयाचित

इ-वाहनांचे युग 25 वर्षांत अवतरणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या पैशांची बचत होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. रस्त्यावरीलअपघातांचे प्रमाण कमी होईल.

- Advertisement -

हवा आणि ध्वनिप्रदूषण कमी होईल. सार्वजनिक वाहतुकीतही इलेक्ट्रिक वाहने असतील. बॅटरी चार्ज करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा विलक्षण वापर केला जाईल.

नैर्सगिक इंधनाचे मर्यादित साठे, त्यामुळे इंधनाच्या वाढत्या किमती आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाचा र्‍हास वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची मागणी येत्या दोन दशकांत अधिक वाढणार आहे. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत बॅटरीवर चार्ज करता येणार्‍या वाहनांची संख्या भविष्यात 95 टक्क्यांहून अधिक असेल, नव्हे ती काळाची गरज होणार आहे.

झपाटयाने बदलत जाणार्‍या जगात नावीन्याचा वेग अधिक आहे. तंत्रज्ञान आणि अभिनवता यांचा सुरेख संगम ऑटोमोबाईल क्षेत्रात होत आहे. इंधनाचे घटते साठे आणि वाढते दर रोखणे आता शक्य होणार नाही. त्यासाठी त्याला पर्याय ठरणार्‍या अपारंपरिक ऊर्जेतून वाहनांचा वापर ही काळाची गरज ठरत आहे. येत्या दोन-अडीच दशकांत ग्राहकांच्या खिशाला परवडणार्‍या इलेक्ट्रिक गाड्यांचे प्रमाण 95 टक्क्यांहून अधिक असेल.

बॅटरीवर चालणार्‍या इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती आणि मागणी येत्या दोन दशकांत विलक्षण वाढलेली असेल. नाशिक शहराबद्दल बोलायचे तर येथील हवेचे प्रदूषण विलक्षण कमी झालेले असेल. पेट्रोल-डिझेल गाड्या 25 वर्षांनंतर ‘विंटेज’ वाहनांसारखे अ‍ॅण्टिक मॉडल म्हणून वापरणारे 5 ते 7 टक्के लोक असतील. नाशिक तेव्हा इ- गाड्यांसाठी ऑटोमोबाईल हब झालेले असेल.

बॅटरीसाठी चीन, तैवानवरील अवलंबत्व पूर्णपणे संपुष्टात येईल. मेड इन नाशिक बॅटरी आणि इ-गाड्यांचे कारखाने प्रचंड भरभराटीला असतील. मुंबई, पुणे, बंगळुरू या आणि अशा मेट्रो शहरांपेक्षा जागेची उपलब्धता अधिक असल्याने त्यावेळी द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये इ-गाड्यांचे कारखाने अधिक असतील.

किफायतशीरतेमुळे क्रयशक्ती वाढेल पेट्रोल गाडीसाठी आज एखाद्या व्यक्तीस दर दिवशी 50 रुपयांचे इंधन भरल्यास महिन्याला 1500 रुपये तर वर्षाला 18 हजारांचे पेट्रोल लागते.

तीन वर्षांत 54 हजारांचे इंधन अधिक मोटारसायकलची किंमत सुमारे 80 हजार रुपये असा एकूण खर्च 1 लाख 47 हजार रुपये इतका येतो. या तुलनेत इ-बाईकमध्ये एका युनिटमध्ये 60 कि.मी. इतका अत्यल्प खर्च येतो. म्हणजे वीजदर अधिक झाले तरी अशा गाड्या कमी खर्चात वापरता येतात. 25 वर्षांनंतर नाशिकमधील नागरिकांचा ‘ट्रान्सपोर्टेशन’चा खर्च त्यावेळी 90 टक्के वाचल्याने लोकांची क्रयशक्ती 5 ते 10 पटीने अधिक वाढलेली असेल आणि पर्यायाने लोकांचे जीवनमान उंचावेल.

चार्जिंग स्टेशन : इ-गाड्यांची वाढलेली संख्या पाहता महत्त्वाच्या चौकात चार्जिंग स्टेशनचे पर्याय उपलब्ध असतील. ग्राहकांजवळ कुठल्याही ब्रॅण्डची इ-गाडी असली तरी प्रत्येक चार्जिंग स्टेशनवर विविध ब्रॅण्डच्या बॅटरी उपलब्ध असतील. डिस्चार्ज झालेली बॅटरी अशा स्टेशनमध्ये त्या-त्या कप्प्यात ठेऊन ग्राहक चार्जेबल बॅटरी केवळ 10 ते 20 सेकंदांमध्ये ठारविक जागेतील कप्प्यातून घेऊन जातील.

सौरऊर्जेचा कमाल वापर वाढेल : खासगी वाहने, दुचाकी, कारसह सार्वजनिक वाहतुकीच्या बसेस, तीनचाकी इ-गाड्या, पॅसेंजर रिक्षा, शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठीच्या स्कूल रिक्षा, लोडिंग रिक्षा, टेम्पो, कार आणि पॉवर बाईक्सदेखील बॅटरीवर चालणार्‍या असतील. त्यामुळे खासगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इलेक्ट्रिक वाहनांद्वारे होणार. यामुळे औष्णिक, जलविद्युत यांसारख्या वीजनिर्मिती केंद्रातील वीज पुरेशी ठरणार नाही. मग पुन्हा सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जास्त्रोताचा वापर प्रचंड पटीने वाढलेला असेल.

किमती कमी : भविष्यात सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांचे पर्व सुरू झालेले असल्याने अनेक कंपन्या अशी वाहने निर्मिती करण्यासाठी उतरतील पर्यायाने स्पर्धा वाढल्याने इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या किमती कमीत कमी राहतील. 25 वर्षांनंतर अंदाजे 30 हजारांपासून अशा गाड्या मिळतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या