सण साजरे करण्यातील नैमित्तिकता!

jalgaon-digital
3 Min Read

वैद्य अश्विनी चाकुरकर

आयुर्वेदानुसार (Ayurveda) सहा ऋतू सांगितलेले आहेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर. यापैकी शिशिर, वसंत व ग्रीष्म (उन्हाळा) यांना उत्तरायण म्हणतात. वर्षा, शरद व हेमंत यांना दक्षिणायन म्हणतात…

सध्या दक्षिणायन (Dakshinayan) सुरू आहे. वर्षा ऋतू अर्थात पावसाळा नुकताच संपलेला. हिवाळा अजून सुरू व्हायचाय. दुपारी कडक ऊन आणि रात्री थोडीशी थंडी सुरू झालेली आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास दोन ऋतुंना जोडणारे बदलते वातावरण. या ऋतुत पित्त वाढून पित्ताचे व रक्तदृष्टीचे अनेक त्रास जाणवतात.

जसे आम्लपित्त (अ‍ॅसिडीटी) उष्णतेचे फोड (गळू), नाकावाटे अथवा शौचावाटे रक्तस्त्राव, त्वचेवर पुरळ येणे, मूळव्याध असे अनेक विकार उद्भवतात. अशावेळी शीतल व आल्हाददायक असे परिणाम मिळावेत, यासाठी कोजागिरी पौर्णिमा (kojagiri purnima) साजरी केली जाते.

योगशास्त्रानुसारही, चंद्रनाडी म्हणजेच इडा सक्रीय झाल्यास मानसिक शांतता, प्रसन्नता, शीतलता याची प्राप्ती होते. त्यामुळे या दिवशी रात्रीच्या वेळी चंद्राच्या प्रकाशात सिद्ध केलेले दूध घेण्याचा प्रघात आहे. या काळात आंबट, आंबवलेले पदार्थ, वडापाव, समोसे, कचोरी असे पित्त वाढवणारे जंक फूड मात्र टाळलेले बरे.

जसजशी थंडी वाढण्यास सुरुवात होते तसतशी आपली पचनशक्ती मात्र उत्तम होत जाते. शरीराचे बल, शक्ती वाढवण्यासाठी दक्षिणायनातील हेमंत ऋतू हा अतिशय योग्य सांगितलेला आहे. सूर्याचे मकर राशीत संक्रमण होऊन उत्तरायणाची सुरुवात होईपर्यंतचा हा काळ म्हणजे खवय्यांची मजा असते. आपल्या सर्वांचा आवडीचा सणांचा राजा आपला दीपोत्सव (Diwali).

वातावरणातील गारवा जसा वाढतो तशी रुक्षताही वाढते. त्यामुळे आपल्याला त्वचेचा कोरडेपणा जाणवू लागतो. त्यामुळे या काळात अभ्यंग स्नानास महत्त्व दिले आहे.

‘अभ्यंग आचरेनित्यं

स जरा श्रम वातहा।

दृष्टी: प्रसाद पुष्ट्यायु:

स्वप्न सुत्वक् दार्व्यकत्॥

नियमितपणे अभ्यंग केल्याने (कोमट तीळतेलाने त्वचेची मालिश करून सहन होईल इतपत गरम पाण्याने स्नान करणे.) शारीरिक व मानसिक थकवा दूर होतो. त्याचबरोबर त्वचेचा कोरडेपणा नाहीसा होऊन त्वचेचे पोषण होते.

हे झाले बाह्यत: पण शरीरांतर्गतसुद्धा आपला अग्नी म्हणजे पचनशक्ती खूप चांगली झालेली असते. त्यामुळे या काळात तेलातुपात बनवलेले पदार्थ, आटवलेल्या दुधाचे पदार्थ विविध मिष्टान्न जे एरव्ही पचण्यास जड असतात त्यांचेही पचन सहजपणे होते. डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू असे अनेक प्रकारचे पौष्टीक लाडू हे याच काळात बनवून खाल्ले जातात ते याच कारणामुळे.

स यदा नेन्धंन युक्त देहजे तदा।

रस हिनस्त्यतो वायु:

शीत: शीते प्रकुप्यती ॥

याचा शास्त्रीय संदर्भ असा आहे की, अशा वाढलेल्या अग्नीला/ पचनशक्तीला योग्य आहार (स्निग्ध पदार्थ) मिळाले नाहीत तर वात वाढून शरीरात रुक्षता निर्माण होते. आणि ही प्रक्रिया अशी पुढे चालू राहिली तर धातुक्षय होऊन, रुक्षतेमुळे होणारे त्रास वाढू शकतात. त्यामुळे समतोल साधण्यासाठी स्निग्धतेची (स्निग्ध- तेल तूपयुक्त) अशा आहाराची अत्यंत आवश्यकता असते.

अर्थात हे सर्व ज्यांची प्रकृती/ आरोग्य सुस्थितीत आहे त्यांच्यासाठी. ज्यांना काही आजार आहेत, जसे मधुमेह, उच्चरक्तदाब, स्थौल्य असे जीवनशैलीशी संबंधित आजार त्यांच्यासाठी मात्र हे लागू होत नाही. त्यांनी आपली प्रकृती, वय, संबंधित आजार त्यानुसार शरीराची गरज यांचा विचार करतच आपला आहार ठरवला पाहिजे, हे नक्की!

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *