संकट टळलेले नाही...

संकट टळलेले नाही...

- डॉ. संजय गायकवाड

कोरोना लसीकरणाचा शंभर कोटींचा टप्पा पार करणे हे भारतासाठी मोठे यश आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करणे ही सोपी गोष्ट नव्हती. डिसेंबर महिन्याच्या आधीच आपण शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा गाठू हे कुणाला खरेही वाटले नव्हते. परंतु झारखंड, उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांत 65 टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्येचेच लसीकरण होऊ शकले आहे, हेही आपण विसरता कामा नये. बिहार आणि झारखंडमध्ये 20 टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्येला लसीच्या दोन मात्रा देणे शक्य झाले आहे. ज्यांनी एकही मात्रा घेतली नाही अशी लोकसंख्या मोठी आहे. संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी अजूनही 90 कोटी मात्रांची गरज भासणार आहे. दोन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांसाठीही 80 कोटी मात्रांची गरज भासेल. म्हणजेच अद्याप 170 कोटी मात्रा देण्याचे काम बाकी आहे, असा त्याचा अर्थ होय.

रशिया आणि चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे ही चिंताजनक बाब आहे. ब्रिटनमध्ये 67 टक्के तर सिंगापूरमध्ये 80 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तरीसुद्धा तेथे रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रशियात अवघ्या 24 तासांत कोरोनामुळे 1964 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञही चक्रावून गेले आहेत.

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी 7 नोव्हेंबरपर्यंत सुटी घोषित केली आहे. निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. चीनमधून वस्तुतः खर्‍या बातम्या बाहेर येतच नाहीत; परंतु तरीही कोरोनाचे उत्परिवर्तन होऊन नवा व्हेरिएन्ट समोर आल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने जगभर पसरल्या आहेत. त्यामुळेच आपण पुन्हा सावध होणे आवश्यक बनले आहे. सणासुदीच्या आधी देशातील बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी पाहून असे वाटते, की कोरोनाची अजिबात भीती कुणाला उरलेली नाही. बहुतांश लोकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. कोरोना नियमावलीची पायमल्ली होत आहे.

दोन वर्षांपासून घरात थांबलेले लोक यंदा दिवाळी सणाच्या निमित्ताने खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पड़ले. लोकांच्या बेफिकिरीमुळे डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी सातत्याने घेतलेल्या मेहनतीवर पाणी पडेल की काय, अशी भीती वाटल्यास ती साधार म्हणावी लागेल.

लसीच्या शंभर कोटी मात्रा दिल्यानंतर अभिमान जरूर वाटायला हवा; परंतु त्याचा अर्थ आपण कोरोनावर विजय संपादन केला असा नव्हे. संकटापासून थोडा दिलासा जरी मिळाला तरी संकटकाळात झालेले मोठे नुकसान माणूस लगेच विसरून जातो, हा मानवी स्वभाव आहे. उत्सवप्रियता हाही मनुष्यस्वभाव आहे. संसर्गाच्या पहिल्या लाटेनंतरही लोक असेच निर्धास्त झाले होते. पुन्हा दुसर्‍यांदा संसर्ग येणार नाही, असे लोकांना वाटत राहिले. परंतु संसर्ग इतक्या मोठ्या प्रमाणावर आला, की दुसर्‍या लाटेवेळी उद्भवलेल्या परिस्थितीचा आपण पूर्वी विचारही करू शकलो नव्हतो. एवढ्या भयावह परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपण तयारसुद्धा नव्हतो.

भारतात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. कोरोना अजूनही आपल्यामध्ये आहे आणि आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण उत्सवाचा आनंद पूर्णपणे उपभोगू शकतो. या उत्सवांच्या दिवसांत दरवर्षी आपल्याला प्रदूषणाचाही मुकाबला करावा लागतो. कोरोना विषाणू आणि प्रदूषण यांचा घनिष्ट संबंध आहे. जर्नल ऑफ एम्पोजर सायन्स अँड एन्व्हायर्नमेन्टल एपिडेमॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात शास्त्रज्ञांनी असा खुलासा केला होता की, कोरोना विषाणूचा प्रसार होण्यास प्रदूषणही कारणीभूत ठरते.

ज्या-ज्यावेळी प्रदूषण वाढते, त्या-त्यावेळी या विषाणूला हातपाय पसरण्यास वाव मिळतो. कॅलिफोर्नियातील जंगलांना जेव्हा आग लागली होती, तेव्हा प्रदूषणाचा मोठा विस्तार झाला होता. ज्यावेळी प्रदूषणाचे प्रमाण उच्च होते तेव्हाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले होते. जास्त तापमान, आर्द्रता, वायू प्रदूषण यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे आजवर विविध ठिकाणी दिसून आले आहे.

राजधानी दिल्लीत सध्या प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढत चालले आहे. असंख्य प्रयत्न करूनसुद्धा पंजाब, हरियाना आणि दिल्लीलगत असलेल्या उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांनी पिकांचे अवशेष (पराली) शेतात जाळणे बंद केलेले नाही. सध्या पावसामुळे प्रदूषणापासून दिलासा मिळाला आहे; परंतु आगामी काळात पुन्हा एकदा दिल्ली ‘गॅस चेम्बर’ बनू शकते, हे सर्वांनीच ध्यानात घेतले पाहिजे. केवळ दिल्लीच नव्हे तर भारतातील अनेक शहरे अशी आहेत, जिथे प्रदूषणाचा स्तर कायम वाढताच राहतो.

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये या शहरांची गणना केली जाते. अशा शहरांमध्ये राहणार्‍या लोकांची श्वसनयंत्रणा मुळातच प्रदूषणामुळे कमकुवत झालेली असते. अशा लोकांना जर कोरोना विषाणूने आपली शिकार बनविले तर त्यांच्या फुफ्फुसांची परिस्थिती वेगाने बिघडत जाऊ शकते. कोरोना विषाणूमुळे ज्यांचा मृत्यू झाला, त्यामध्ये 50 टक्के लोक असे होते ज्यांना वायू प्रदूषणामुळे आधीपासूनच श्वसनयंत्रणेच्या समस्या जाणवत होत्या. जागतिक बँकेच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पर्टिक्युलेट मॅटरशी (पीएएम) असणारा संपर्क एक टक्क्याने जरी वाढला तरी कोरोनामुळे मृत्यू होण्याची शक्यता 5.7 टक्क्यांनी वाढते.

उत्सवाच्या उत्साहात सतर्कता हरवून बसणे म्हणजे स्वतःला आणि स्वतः बरोबरच कुटुंबाला आणि समाजाला संकटात टाकणे. उत्सवकाळात सार्वजनिक समारंभ आयोजित केले जाऊ नयेत, हेच चांगले. एखाद्या वेळी समारंभ आयोजित केलाच किंवा अशा पूर्वनियोजित कार्यक्रमास हजेरी लावण्याची वेळ आलीच, तरी मास्क घातल्याखेरीज अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. समारंभांच्या ठिकाणीही लोकांनी अतिजवळ न येता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला हवे तसेच सॅनिटायजर सोबत ठेवले पाहिजे. अगदी छोटासा आनंदसुद्धा मोठ्या दुःखास कारणीभूत ठरू शकतो, म्हणूनच कोरोना अजून संपलेला नाही, हे लक्षात ठेवून उत्सवात स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी ठरते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com