Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedऔद्योगिक प्रगतीचा निरंतर प्रवास

औद्योगिक प्रगतीचा निरंतर प्रवास

डॉ. अनंत सरदेशमुख- जेष्ठ अर्थतज्ञ

महाराष्ट्र हे भारतातील प्रगत, सर्वांत मोठे आणि प्रमुख औद्योगिक राज्य राहिले आहे. गेल्या 50 वर्षांत महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर इत्यादी ठिकाणी झालेले औद्योगिकीकरण मुख्यत्वेकरून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मूलभूत सुविधा, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, चांगले औद्योगिक संबंध, चांगली उत्पादकता या गोष्टींमुळे घडून आले आहे. राज्याची ही समृद्धी, उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्राच्या उलाढालीने प्राप्त झाली आहे.

- Advertisement -

1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्य स्थापनेनंतर उद्योग, शिक्षण, कला, सहकार, शेती, सेवा इत्यादी अनेक क्षेत्रात राज्याला देशातच अव्वल स्थान नव्हे तर परदेशातसुद्धा महत्त्व प्राप्त करून दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात अहमदाबादनंतर मुंबई कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र बनले. मुंबईच्या औद्योगिकीकरणाची सुरुवात मुख्यत्वे करून कापड उद्योगांनी झाली आणि एक चांगले बंदर असल्यामुळे मुंबईत इतर व्यापाराचीही वाढ झाली.

महाराष्ट्रातील एका प्रमुख उद्योगाची, औद्योगिकीकरणाची सुरुवात दुसर्‍या महायुद्धाच्या सुमारास झाली आणि पुणे परिसरात या काळात दारुगोळा कारखाने ब्रिटिशांनी प्रस्थापित केले. याच सुमारास लक्ष्मणराव किर्लोस्कर या महाराष्ट्राच्या आद्य उद्योजकाने शेती अवजारांचे उत्पादन किर्लोस्करवाडीसारख्या ठिकाणी सुरू केले. त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे किर्लोस्कर उद्योग समूहाने आपल्या पंपाच्या उद्योगाला पुण्यात सुरुवात केली आणि इतरही काही उद्योजक उद्योग सुरू करते झाले.

मुंबईतील गिरणगाव हे स्वातंत्र्योत्तर काळातसुद्धा पुढील अनेक वर्षे कापड उद्योगाचे एक प्रमुख केंद्र बनले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबईतील जागेच्या टंचाईमुळे आणि इतर काही कारणांमुळे तेथील अनेक उत्पादन क्षेत्रातील कंपन्या पुण्याजवळील भोसरी, पिंपरी-चिंचवड, तळेगाव इत्यादी ठिकाणी विकसित झाल्या.

या झपाट्याने वाढणार्‍या आणि औद्योगिकीकरण होणार्‍या क्षेत्राकडे बघूनच महाराष्ट्र सरकारने इथे एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. 1962 च्या सुमाराला महाराष्ट्रातील एक महत्त्वाची आणि मोठी एमआयडीसी पुण्याजवळ स्थापन झाली. यात टेल्को, बजाज ऑटो, बजाज टेम्पो, कायनेटिक, फिनोलेक्स इत्यादी अनेक कंपन्या प्रस्थापित झाल्या. पुढे या एमआयडीसीचा विस्तार ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि राज्यातील अनेक छोट्या गावातसुद्धा झाला.

महाराष्ट्र हे भारतातील प्रगत, सर्वात मोठे आणि प्रमुख औद्योगिक राज्य आहे. महाराष्ट्र राज्याचा देशांतर्गत स्थूल उत्पादनात हिस्सा सुमारे 25 टक्के राहिला आहे. देशाच्या एकंदर निर्यातीपैकी सुमारे 22 टक्के निर्यात महाराष्ट्र राज्यातून होते.

महाराष्ट्राची राज्य स्थापनेच्या वेळी लोकसंख्या सुमारे 3.96 कोटी होती ती 2011 च्या गणनेनुसार 11.24 कोटीपर्यंत पोहोचली आहे. यावरून राज्याचा किती विस्तार झाला हे लक्षात येते. परंतु या विस्ताराबरोबरच अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे राज्याचे दरडोई उत्पन्न. 2014 चे राज्याचे दरडोई उत्पन्न रुपये 117091 होते, तर देशाचे 80388 रुपये. महाराष्ट्राच्या कामगारांची उत्पादकता 9.9 होती तर भारताची 8.38. हे महाराष्ट्रातील उद्योजकांच्या, कामगारांच्या तसेच सरकारच्या प्रयत्नांचे, परिश्रमांचे फळ आहे, असे नक्कीच म्हणावे लागेल.

राज्याची लोकसंख्या वाढली, विस्तार जरी झाला तरी त्याचबरोबरीने राज्यात उद्योग, रोजगारनिर्मितीसुद्धा झाली आणि आर्थिकदृष्ट्या राज्य प्रगती करते झाले हे आकडे राज्य किती प्रगतिशील आहे हे दाखवून देतात. ही समृद्धी, उद्योग, व्यापार, कृषी आणि सेवा क्षेत्राच्या उलाढालीनेच प्राप्त झाली आहे, यात काहीच शंका नाही.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, चंद्रपूर, नागपूर इत्यादी ठिकाणी झालेले औद्योगिकीकरण मुख्यत्वेकरून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मूलभूत सुविधा, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, चांगले औद्योगिक संबंध, चांगली उत्पादकता या गोष्टींमुळे घडून आले आहे. अर्थातच यामागील उद्योजकता तितकीच महत्त्वाची आहे. एकेकाळी मराठी माणसाला उद्योग जमत नाही असे म्हटले जायचे; परंतु आज परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. मराठी उद्योजक महाराष्ट्रासह जगातील अनेक देशांत उद्योग प्रस्थापित करता झाला आहे.

2016 मध्ये भारतातील एक लाखावरील लोकसंखेच्या सुमारे पाचशे शहरांत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार सुमारे तीस शहरे अशी आहेत जेथील 20-34 या वयोगटातील लोकसंख्या एकंदर त्या शहराच्या लोकसंखेच्या तीस टक्के जास्त आहे. या तीस शहरांपैकी 10 शहरे महाराष्ट्रातील आहेत, ही एक महत्त्वाची बाब आहे.

यात नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड इत्यादी शहरे आहेत. हा ‘डेमोग्राफिक डिव्हीडंड’ महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. ही तरुणाईची ऊर्जाच महाराष्ट्राच्या पुढील प्रगतीला चालना, वेग, दिशा देणार आहे. या नव्या पिढीत उद्योजकतासुद्धा चांगल्या प्रमाणात दिसून येते.

फक्त गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची, सुविधांची, सामुग्रींची आणि प्रोत्साहनाची. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात प्रस्थापित झालेल्या परदेशी कंपन्या त्यांना लागणार्‍या सुट्या भागांची जी आयात करतात ती हळूहळू थांबवून हे सुटे भाग इथेच बनवून घेण्याच्या मागे लागल्या. कारण याने उत्पादन खर्च आणि जास्त लागणारा वेळ वाचतो. आजच्या स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जितका उत्पादन खर्च कमी तितकी मालाला मागणी जास्त. त्यामुळे या परदेशी कंपन्या इथेच हे सुटे भाग बनवून घेतील.

आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांना महाराष्ट्रात आपले उद्योग उभारण्यात खूपच स्वारस्य आहे. याची प्रचिती आज पुणे, औरंगाबाद, नाशिक, ठाणे येथील प्रचंड प्रमाणात असणारे जर्मन, स्वीडिश, कोरियन, तैवानी उत्पादन कंपन्या देत आहेत. फोक्सवॅगन, मर्सिडीज, फियाट, जॉन डियर, जेसीबी, स्कोडासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात आल्या, त्यांना लागणार्‍या सुट्या भागांची गुणवत्ता, पुरवठा वेळापत्रक, उत्पादकता ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि गुणवत्तेची होती, त्यांच्या उच्च गुणवत्ता पात्रतेला महाराष्ट्रातील मध्यम आणि लघु उद्योग उतरले.

कोविड-19 च्या संकटाने महाराष्ट्राच्या उद्योग जगताला प्रचंड मोठा धक्का दिला. लॉकडाऊनचे खूप मोठे दुष्परिणाम इथल्या उद्योग जगतावर झाले. उद्योगाचे चाक प्रचंड मोठे अवजड असते. ते एकदा बंद पडले किंवा थांबले म्हणजे त्याला पुन्हा गती मिळण्यासाठी खूप वेळ व प्रयत्न करावा लागतो. साधे उदाहरण घ्या. आज अनेक उद्योगांतील कामगार करोनाच्या भीतीने, लॉकडाऊनमुळे आपल्या गावी परत गेले आहेत. लॉकडाऊन जरी उठला असला तरी त्यांना आपल्या गावातून परत येऊन कामावर रुजू होण्यासाठी बराच काळ लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या