बांधकाम क्षेत्राच्या आशा पल्लवित

बांधकाम क्षेत्राच्या आशा पल्लवित

- संजय निकम, बांधकाम अभ्यासक

रिअल इस्टेट क्षेत्राला यंदा कोरोनाच्या महामारीची झळ बसली असली, तरी 2021 मध्ये या क्षेत्राला उज्ज्वल भवितव्य असल्याचे मानले जाते. पुढील वर्षात रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही बांधकामांना मागणी वाढणार आहे.

कारण गृहकर्जावरील कमी व्याजदर, मुद्रांक शुल्कात कपात अशा उपाययोजना सरकारने वेळेत केल्या आहेत. त्याचप्रमाणे पुढील वर्षी जागा भाड्याने घेण्याऐवजी विकत घेण्याची प्रवृत्ती वाढेल, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

2020 मध्ये प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक क्षेत्राला कोरोनाच्या संसर्गाची झळ बसली आहे. कोविड-19 मुळे झालेल्या परिणामांपासून वेगळे राहणारे क्षेत्र क्वचितच आढळू शकेल. महामारीचा प्रसार रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे संपूर्ण जगभरातील व्यवहार ठप्प केले. भारतातही लॉकडाउनमुळे प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला. रिअल इस्टेट म्हणजे बांधकामाचे क्षेत्रही त्या झळीपासून दूर राहू शकले नाही. भारतीय बांधकाम क्षेत्रासाठी 2020 वर्ष खूपच आव्हानात्मक होते. वर्षाच्या सुरुवातीलाच उद्योग क्षेत्रात असलेल्या मंदीचे सावट या क्षेत्रावरही पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. घरांच्या किमती आणि वाढती इन्व्हेन्टरी हे त्याचे परिणाम होत. घरांचे दर वाढल्यामुळे खरेदी कमी होत गेली. त्यानंतर आलेल्या कोविडने उरलीसुरली कसर भरून काढून या क्षेत्राचे आणखी नुकसान केले.

एका प्रॉपर्टी कन्सल्टन्ट फर्मच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकता या प्रमुख सात शहरांत घरांची विक्री 2020 मध्ये 47 टक्क्यांनी कमी होऊन ती 1.38 लाख युनिटवर आली असल्याचा अंदाज आहे. एका डेटा अ‍ॅनालिटिक्स फर्मच्या मते, यावर्षी एप्रिल-जूनमध्ये घरांची विक्री केवळ 24,936 युनिट इतकीच होती. अर्थात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत परिस्थिती काहीशी सुधारून विक्री 50,983 युनिटवर पोहोचली. परंतु वार्षिक आधारावर हा आकडा 35 टक्क्यांनी कमीच आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल झाल्यानंतर म्हणजे एप्रिल ते जून या तिमाहीनंतर देशातील रिअल इस्टेट क्षेत्राने चांगली प्रगती केली.

गेल्या दोन तिमाहींमध्ये करण्यात आलेल्या धोरणात्मक उपाययोजना, ऑफर्स आणि योजनांच्या सादरीकरणामुळे तसेच सर्व संबंधित घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे प्रमुख शहरांमधील घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले. या अहवालात पुढे म्हटले आहे की, वर्क फ्रॉम होमचा वाढता ट्रेन्ड हा व्यावसायिक जागांच्या विक्रीपुढील एक संभाव्य जोखीम मानला जात होता. परंतु अनलॉक उपाययोजनांमुळे कार्यालयांना विशिष्ट क्षमतेपर्यंत कर्मचार्‍यांना कामावर बोलावण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे व्यावसायिक जागा खरेदीची भावना टिकून आहे. कमर्शियल रिअल इस्टेट, ऑफिस स्पेस अ‍ॅग्रिमेन्ट आदींच्या कराराचा कालावधी दीर्घ स्वरूपाचा असतो आणि काही महिन्यांमधील पीछेहाटीचा त्यावर फार सखोल परिणाम होऊ शकत नाही. वर्क फ्रॉम होम हा केवळ तात्पुरता उपाय असू शकतो. परंतु ग्राहकांना समोरासमोर भेटणे, कर्मचार्‍यांमधील बातचीत यांची जागा व्हर्च्युअल साधने दीर्घ कालावधीसाठी घेऊ शकत नाहीत.

माहीतगारांच्या मते, आगामी वर्षात म्हणजे 2021 मध्ये घरे खरेदी करण्याची इच्छाशक्ती वाढल्याचे दिसेल आणि त्यामुळे विक्री चांगली होईल. भारताने कोरोनावरील लशीला परवानगी दिल्यानंतर तातडीने लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यास ग्राहकांचा विश्वास वाढून विक्री वाढेल. रिअल इस्टेट बाजारात तेजी निर्माण होईल. बांधकाम व्यावसायिक सरकारकडून 2021 मध्ये प्रोत्साहनात्मक धोरण, करप्रणालीतील सुटसुटीतपणा, मुद्रांक शुल्कात कपात आणि अशाच काही अपेक्षा करीत आहेत.

येणार्‍या वर्षात ङ्गहाउसिंग फॉर ऑलफचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्जपुरवठ्याचा प्रवाह वाढेल आणि कमीत कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध होईल, अशी आशा बांधकाम व्यावसायिकांना आहे. जाणकार मानतात की, कोविडच्या नंतरच्या जगात कार्यालयांचे ले-आउट आणि डिझाइन बदलावे लागणार आहे. मोठे कार्यालय, प्रशस्त बैठक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंग शक्य व्हावे, असे डिझाइन लोकांना अपेक्षित असेल. आतापर्यंत कार्यालयीन जागांची आवश्यकता आयटी, बीएफएसई आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनाच होती. आता स्टार्टअप्स, को-वर्किंग आणि डेटा सेंटर अशा उपक्रमांसाठी कार्यालयीन जागांच्या मागणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. 2021 मध्ये अनेक प्रमुख कमर्शियल मायक्रो-मार्केट, सॅटेलाइट ऑफिसेसचा उदय होईल. भाडेकरूंच्या गरजांचे भान ठेवून जास्तीत जास्त उत्तम कार्यालयीन जागा तयार करण्यास प्राधान्य असेल.

आर्थिक व्यवहारांमध्ये तेजी आल्यानंतर आगामी काही तिमाहींमध्ये इमारतींच्या किमतीही वाढू लागतील तसेच भाड्याचे दरही वाढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही जाणकारांच्या मते, 2020 च्या दुसर्‍या सहामाहीत म्हणजे लॉकडाउन हटविण्यास सुरुवात झाल्यानंतर ग्राहकांनी विशेषत्वाने हाउसिंग सेगमेन्टमध्ये नव्या जोशाने पुनरागमन केले. वेळेत आणि केंद्रित सरकारी हस्तक्षेपामुळे बाजारातील विक्रीची भावना वाढीस लावण्यास मदत केली. 2021 मध्ये जसजसे व्यवसाय आणि ग्राहकांच्या संख्येत वाढ होईल, तसतशी महामारीच्या कचाट्यातून बाहेर पडलेल्या बाजाराची स्थिती सुधारेल आणि 2020 च्या तुलनेत खूपच चांगली परिस्थिती असेल, असे मानले जाते.

बांधकाम क्षेत्रातील अव्यक्त मागणीची क्षमता आणि मागणीची गतिशीलता या आघाडीवर हे क्षेत्र 2021 मध्ये अग्रेसर राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कमर्शियल आणि हाउसिंग अशा दोन्ही सेक्टरमध्ये येत्या वर्षी मोठ्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. रिअल इस्टेट क्षेत्राचे एकंदर चित्र 2021 मध्ये चांगले असेल, असे त्यामुळेच मानले जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, रहिवासी घरांच्या विक्रीसाठी चांगली वातावरणनिर्मिती झाली आहे. कमी व्याजदरात गृहकर्जाची उपलब्धता आणि मुद्रांक शुल्कात कपात असे सरकारने जे उपाय योजले आहेत, ते त्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जाते. येत्या वर्षात बाजारात रोकड वाढणार असून, चांगले नियमन आणि कमी व्याजदर या आधारावर रिअल इस्टेट क्षेत्रात आणखी तेजी पाहायला मिळेल. 2021 या वर्षात जागा भाड्याने घेण्याऐवजी त्या खरेदी करण्याकडे अधिक कल राहील, असे जाणकारांचे अनुमान आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com