Friday, April 26, 2024
HomeUncategorizedलग्न जमवण्याचा धंदा

लग्न जमवण्याचा धंदा

येवला । सुनील गायकवाड | Yeola

आयुष्यातील नाजुक विषय. आपल्या कन्येला चांगला शोभेल असा तालेवार घराण्यातील जोडीदार मिळावा. किंवा मुलाला खानदानी घराण्यातील सुस्वरुप मुलगी पत्नी म्हणून मिळावी अशी इच्छा सर्वच पालकांची असते, मात्र याच इच्छा, अकांक्षांना कॅश करण्याचा नवीन धंदा (business) आता जोर धरु लागला आहे. त्यातच करोना सारख्या आजाराने माणसाने माणासाजवळ जाण्याला लगाम घतला आहे. त्यामुळे लग्न (marriege) जमविण्यात मध्यस्थाची भूमिका पर पाडणार्‍यांना आता सुगीचे दिवस इाले आहेत.

- Advertisement -

लग्न जमविणे हे काम पूर्वी नातेवाईक (Relatives) मंडळी कोणत्याही लाभाचे गणित न मांडता करायची. लग्न ठरविणे, इच्छुक वधू – वरांची ओळख करुन देणे, एक नवा संसार सुरु करण्यासाठी पुढाकार घेणे, वधु – वराकडील मंडळींना एकमेकां विषयी खरी खुरी माहिती देणे, आदी कामे केल्याने ईश्वराची सेवा केल्याचे पुण्य प्राप्त होते, असे समजुन लग्न गाठी जुळून आणल्या जात होत्या. मात्र लग्न जमविणे ही आता समाजसेवा किंवा ईश्वराची सेवा न रहाता त्याकडेही व्यवसायाच्या नजरेने बघितले जावु लागले आहे.

पूर्वी लग्न जमविताना पोटाला कुंकू लावण्याचा प्रकार होता. परंतू जसजसा जमाना बदलत गेला तस तशी लग्न पध्दतीही बदलत गेली. हे तसे खूप चांगले काम; या कामाचा काहींनी धंदा सुरु केल्याने त्यात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. सध्या समाजातील मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा जास्त असल्याने अनेक गावात काही मंडळी उपवर होउन काही वर्ष उलटली तरीही त्यांचे लग्न जमेना.

त्यामुळे लग्न जमविताना थकलेले पालक अशा धंदेवाईक वधू-वर सूचक मंडळींचे लक्ष्य ठरत आहेत. विभक्त कुटुंबपध्दती, नातेवाइकांशी कमी झालेला संपर्क, प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना, अव्यवहार्य अपेक्षा यामुळे या एजंटांचे महत्व वाढीस लागले आहे. प्रत्येक जण आता बीझी झाला आहे. कार्य बाहुल्यामुळे नातेवाईकांकडे येणे – जाणे होत नसल्याने अशी मंडळी या एजंट कडे चकरा मारतात. नोकरीस असलेल्या लोकांच्या मुलांचे विवाह जुळविण्यास विवाह सुचक मंडळींना मोठी मागणी आहे. दोघंही नोकरीला असणार्‍या पालकांची चांगले स्थळ मिळावे म्हणून ही मंडळी एजंटाचें उंबरे झिजवताना दिसतात.

एजंटकडे नावनोंदणी केल्यानंतर लगेचच विनापावतीचे काही हजार रुपये भरावे लागतात. फोनचा खर्च, येण्या-जाण्यासाठी दिलेल्या वेळेचा मोबदला, चांगले स्थळ दाखविण्या साठी वेगळे शुल्क व लग्न ठरल्यावर खुशीच्या नावाखाली सक्तीने घेतला जाणारा आहेर, असे काही वधू-वर सूचक मंडळींचे स्वरुप आहे. या मंडळींनी शहरी भागासह आपला मोर्चा ग्रामीण भागाकडेही वळविल्याने या लोकांकडे वधू – वरांच्या नाव पत्त्यासह मोठ मोठ्या याद्या पहावयास मिळतात.

स्थळ दाखविणे यासाठी अक्षरश: नको ती स्थळे सुचविण्याचा प्रयत्नही होतो. वधू किंवा वराची अतिशयोक्तीपूर्ण माहिती सांगायची व वस्तुस्थिती लपवायची, हेच तंत्र काही ठिकाणी प्रभावीपणे राबविले जात आहे. खरी माहिती न मिळाल्यामुळे अशा जोडप्यांचे भविष्य काय राहील याचा साधा विचारही ही मंडळी करीत नाही.

फसवणुकीचा प्रकार

लग्न जमविताना स्वजातीच्या घराण्यात जमविण्याकडे वधू – वर पालक कटाक्षाने पाहतात. आंतरजातीय विवाहाला कुटूंब मान्यता देत नाही. आंतरजातीय विवाहांना शासन मान्यता असली तरी अद्याप समाज मान्यता देत नाही. मात्र पैसे उकळण्यासाठी काही एजंटांनी दुसर्‍या जातीतही लग्न जमविल्याची चर्चा ऐकावयास मिळते. काही वधु – वर सूचक मंडळे हे काम वेगळ्या जाणिवेने करीत आहेत.

अशी मंडळे जवळपास सर्वच शहरात कार्यरत आहेत. मात्र काही सुशिक्षीत तरुणांनी कोणतेही काम मिळेना म्हणून विना भांडवली कमाईचे साधन म्हणून हे काम निवडले आहे. त्यामुळे ते याकडे संपूर्ण व्यवसाय म्हणूनच पहात आहेत. एखादा विक्रेता आपल्या उत्पादनाची जाहिरात करताना कोणतीही उणीव ठेवत नाही त्याच प्रकारे ही मंडळी वधू – वरांची, घरदार, खानदानाची माहिती सांगताना कोणतीही कसूर ठेवत नाहीत.

आदिवासी वधूही पसंत

अनेक पाईनी जमिन असणार्‍या काही तालेवार घराण्यातही आता जमिन बिघ्यावर आली आहे. अशातच काहींची मुले कर्तृत्ववान न निघाल्याने मुलांचे लग्नाचे वय निघुन गेले, तरीही कुठेच लग्न जमेना, म्हणून तालुका व परिसरात काही तालेवार घराण्यातही आता जातीयवादाच्या भिंती तोडून एजंटा मार्फत आदीवासी पट्ट्यातील सुस्वरुप मुलीं हूडकुन त्यांचे पालकांशी सोयरीक करण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे.

करोना सारख्या आजाराने तर अनेकांना जमिनीवर आणले आहे. गेले वर्षभरात पेठ, सुरगाणा, गुजरात आदी भागातून वधू आणून छोटेखानी पध्दतीने विवाह उरकले जात आहेत. तर देशमुख, 96 कुळी मराठा, कुणबी या जातीत आता कोणतेही अंतर राहीले नाही. गेल्या काही वर्षांपासून या व अशा अनेक जातीत जातीयवादाच्या भिंती तोडून सोयरीक केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या