प्रशासन करोना आपत्तीत व्यस्त!

नागरीक गैरसोईमुळे त्रस्त !
प्रशासन करोना आपत्तीत व्यस्त!

करोना महामारीने सर्व जीवन चक्र बदलवून टाकल्याने या आजाराचा दुष्परिणाम समोर येत आहे. शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांच्या दूतर्फा प्रचंड प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने सर्वत्र ट्राफिक जाम होत आहे. जनतेला पायी चालणेही मुश्कील झाले आहे. अशा परिस्थितीत पाचोरा नगरपालिकेचे कोणत्याही प्रकारचे नियोजन दिसून येत नाही. पालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स लगत असलेले फूटपाथ हे चालणार्‍याचे हक्काचे पादचारी मार्ग आहेत. मात्र ह्याच फुटपाथवर दुकानदारांनी बेकायदेशीर कब्जा करून सरकारी जागा वर्षानुवर्षांपासून राजकीय व प्रशासकीय आशीर्वादाने बळकाविल्या आहेत.

फुटपाथच्या पुढे दुकानदारांची वाहने व दुकानातील सामानाचे सामान लावले जात असल्याने लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बर्‍याच वेळा वाहनधारक व पायी चालणारे यांच्यात हमरीतुमरीवर येऊन शिवीगाळ व भानगडी होतांना दिसतात. शहराच्या मुख्य रस्त्यांवर हातगाडीवर जागोजागी फळविक्री, व अनेक प्रकारचे खाद्य पदार्थ विक्री करणाऱयांनी स्टेशनरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मानसिंगका कॉर्नर, बस स्टॅन्ड रोड, भुयारी मार्गा जवळील मुख्य रस्ता ते विघ्नहर्ता हॉस्पिटल समोर- पोलीस लाईन पासून ते छत्रपती संभाजी महाराज चौक या सर्व शहराला जोडणार्‍या रस्त्यांवर हातगाडी वर व्यावसाय करणारे व दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून आगोदरच अरुंद रहदारीचे रस्ते अडविल्याने भरमसाठ वाढलेल्या चारचाकी- दुचाकी वाहनांची वारंवार कोंडी होत आहे.

अशा परिस्थितीत पाचोरा नगरपालिका दिवसेंदिवस वाढणार्‍या अतिक्रमणाला अंकुश न लावता पालिका प्रशासनाचे तत्कालीन व येणारे मुख्याधिकारी बघ्याची भूमिका घेत कार्यकाळ पूर्ण करून निघून जातात. यामागे कुचकामी अतिक्रमण पथक, या प्रकाराला जबाबदार असल्याच्या चर्चा जनतेत नेहमीच होतात. सद्यस्थितीला निर्माण झालेल्या कोरोना आजाराच्या आपत्तीत नगरपालिका, पोलीस, महसुल प्रशासनाच्या उपाययोजना प्रभावी ठरत नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नियमांचे पालन होत नाही. यामुळे कोरोना सारख्या संसर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतांना दिसत आहे. आता पर्यंत आठ ते दहा वेळा लॉक डाऊन करूनही कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात न येता दर दिवसाला वाढतच आहे. पाचोरा शहराच्या संभावित विकासात्मक धोरणातून आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वात सद्या शहराच्या विविध भागात उर्वरित भुयारी गटार योजना व काही मुख्य रस्त्यांवर काँक्रीटीकरण जोमात सुरू आहे.

हायवे रस्त्यावर देखील केंद्र शासनांतर्गत करोडो रुपयांच्या योजनेचे गेल्या दीड-दोन वर्षांपासून रस्त्याचे काम कासव गतीने होत आहे. महामार्गाचे काम करणार्‍या कंपनी कडून पाणी पुरवठा करणार्‍या पाईपलाईन वारंवार तोडल्या व फोडल्या जात असल्याने शहरवासियांना नियमित व वेळेवर पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात अडचणी आणि पालिकेची यंत्रणा या कामात वेळ आणि कररूपी पैसा वाया घालत आहे.

के.टी. वेअर पाण्याने तुडुंब भरलेला असतांनाही शहरात सहा ते आठ दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो अशी ओरड होत आहे. शहराच्या चारही बाजूला व गावाच्या आतमध्ये विकासकामे सुरू असल्याने आजच्या घडीला शहरात गल्लोगल्ली व प्रमुख रस्त्यांवर फुटा-फुटावर गड्डे-खड्डे तसेच पाईप लाईन किंवा केबल टाकल्या नंतर रस्त्याच्या मधोमध खोदलेल्या चार्‍या काम झाल्या नंतर लगेच बुजविल्या जात नसल्यामुळे गल्ली ते नगरपालिका पर्यंत असा एकही रस्ता वाहन व पायी चालण्यायोग्य शहरात सद्या तरी दिसून येत नाही.शहरात रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे ही विकासाची व अत्यावश्यक आहेत. रस्ते करतांना व्यवसायिकांच्या व नागरिकांच्या सोयी करिता पर्यायी मार्गाने रहदारी करणेही आवश्यक आहे. सद्या मुख्य रस्त्यांचे काम होतांना नगरपालिका प्रशासनाने सुरळीत रहृदारीसाठी पर्यायी मार्ग काढून दिले नसल्याने ठिकठिकाणी वाहने लावून कोंडी होत आहे. त्यातच व्यापारी संकुला समोरील फुटपाथ व दुकानांन समोर जागेत विना परवाना शेड वाढवून किराणा दुकानदार ,मोबाईल शॉप वाले, फळे विक्री करणारे, लहान -मोठे हॉटेल चालकांनी जागा वर्षानुवर्षां पासून राजकीय वजन वापरून बेकायदेशीर अतिक्रमण करीत आहे.

या अर्थपूर्ण प्रकारांकडे मागील व विद्यमान सत्ताधारी-विरोधक, मुख्याधिकारी यांचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने रस्ते आणि व्यापारी संकुलना समोर दिवसेंदिवस भरमसाठ अतिक्रमण वाढत आहे. विस्कळीत व बेशिस्त रहदारीमुळे जनतेच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे चौका-चौकात नो-पार्किंग झोन सह कोणत्याही ठिकाणी दुचाकी व चारचाकी-माल वाहतुकीची वाहने लावली जातात याकडे ट्रॅफिक पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेतात. बेशिस्त रहदारीमुळे वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असल्याने अपघाताची दाट शक्यता असून प्रत्येक ठिकाणी भांडणाचे स्वरूप पाहायला मिळत आहे. अशाच कारणांवरुन 2015 साली वाहनधारकाचा कट लागल्याने मोठी जातीय दंगल उसळली होती. याची अद्यापही पालिकेला व पोलीस प्रशासनाला घेणेदेणे व जाणीव नसल्याने रहदारीच्या समस्येकडे पोलीस व पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. भविष्यातले धोके ओळखून नगरपालिकेने पोलिसांची मदत घेऊन तातडीने सर्वच शॉपिंग कॉम्प्लेक्सचे पादचारी मार्ग व मुख्य रस्त्यांवरचे अतिक्रमण काढून नागरिकांसाठी खुले करावे. अशी नियमित वार्षिक कर भरणार्‍या नागरिकांची मागणी आहे.

सत्ताधारी पदाधिकारी- हतबल ठरलेले विरोधक, कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी, पोलीस- महसुल प्रशासन या सर्वांनी संयुक्तिक कोरोना आपत्तीचे आव्हान पेलतांना शहराच्या जनतेच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही ही दक्षता घेऊन नागरिकांना त्यांच्या मूलभूत सोयी व सुविधा देणे कर्तव्य समजावे. कायदा-सुव्यवस्था व शांततेला आव्हान देणारे विना परवाना कोणताही कर न चुकविता जागोजागी दुकाने थाटून, रस्ते अडवून शहराला वेठीस धरणारे बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याची हिम्मत दाखविण्याची गरज आहे .तसेच अनेक भागात स्वच्छतेच्या तक्रारी वाढत असल्याने जन्तु नाशक फवारणी होणे आवश्यक आहे. ठिकठिकाणी साचलेले कचर्‍याचे ढिगारे वेळेवरच उचलली पाहिजे.दररोज गटारींची स्वच्छता झाली पाहिजे. कोरोना आपत्तीत शासन-प्रशासन या राष्ट्रीय कार्यात व्यस्त आहे हे मान्य. पण जनतेच्या अनेक गैरसोयी कडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी जनतेच्या चर्चेत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com