Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedसर्वसामान्यांना न कळलेले स्वामी विवेकानंददर्शन

सर्वसामान्यांना न कळलेले स्वामी विवेकानंददर्शन

डॉ.रूपेश मोरे

मित्रांनो.. आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांची जयंती ही राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो. या करोनाकाळात आपल्याकडून स्वहिताच्या, गावाच्या हिताच्या, राष्ट्रहिताच्या दृष्टीने काय काय प्रयत्न होत आहे ? याविषयी युवकांनी आत्मचिंतन करण्याचा हा दिवस आहे.

- Advertisement -

सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, साबूत डोक्याच्या तरुणांनी उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्त होईपर्यंत थांबू नका असा मंत्र देणारे स्वामी विवेकानंदांची शिकवण या करोनाकाळातही कशी उपयुक्त आहे? हे समजुन घ्यावे आणि प्रगती करायला हवी. त्यामुळे मानवता धर्माला उन्नत करणार्‍या गोष्टींचा पराभव होणार नाही. नारायण सुर्वे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘शास्त्राने दडवावा अर्थ, आम्ही फक्त टाळच कुटावे’ अशी अवस्था होऊ नये, थोर पुरुषांना शेंदूर फासून त्यांचा विचार मारण्याचा प्रयत्न होऊ नये ; म्हणून आस्तिकतेची खरी व्याख्या सांगणारे स्वामी विवेकानंदांच्या अस्सल ग्रंथांचेच वाचन केले पाहिजे. आज समाजात करून दिलेली विवेकानंदांची ओळख अपुरी, एकांगी, चुकीची, विकृत आहे कारण ते परिवर्तनाच्या वाटेचे अग्रदूत होते.

सर्वसामान्यांनी स्वामी विवेकानंद पूर्णत्वाने जाणून घेण्यासाठी विवेकानंदांनी सुरू केलेल्या बेलूर मठात ‘स्वामी विवेकानंद ग्रंथावली’चे दहा खंड बेलूर मठाने प्रसिद्ध केले आहेत. विवेकानंदांचे सख्खे भाऊ डॉ. भूपेंद्रनाथ दत्त जे नावाजलेले प्रसिद्ध लेखक आहेत त्यांनी ‘माझा समाजवादी भाऊ विवेकानंद’ तसेच प्रसिध्द शास्रज्ञ, लेखक, थोर विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या शोध स्वामी विवेकानंदांचा यासारख्या पुस्तकांत विवेकानंदाच्या जीवनातील घटनांक्रम सविस्तरपुराव्यांसह मांडला आहे. आज आपण फक्त त्यांच्या काही विविध प्रसंगांवर, विविध पैलूंवर प्रकाश टाकणार आहोत.

ज्योतिषशास्त्रानुसार ‘मकर संक्रांती’च्या शुभ दिवशी जरी जन्माला आले तरी, ‘बल हेच जीवन, दुर्बलता हाच मुर्त्यू’ असे मंत्र देणारे स्वामी विवेकानंदांनी ज्योतिषशास्त्रावर प्रचंड टीका केल्याचे विश्लेषण ‘स्वामी विवेकानंद ग्रंथावली’च्या दहाव्या खंडात 136 पानावर दिसते. त्यात ते सांगतात, हिंदूचे प्रचंड नुकसान फलज्योतिषमुळे झाले. फलज्योतिष आणि तत्सदृश सर्व गूढ गोष्टींमुळे सामान्य लोक दुर्बल मनाचे झालेत, मानसिक रोगी झालेत. राष्ट्राला जिवंत ठेवायचे असेल तर या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. हाडाचे विचारवंत असलेल्या विवेकानंदांनी 15 जानेवारी 1893 ला दिलेल्या मुलाखतीत तसेच श्री. अळसिंगांना 30 नोव्हेंबर 1893 रोजी लिहिलेल्या पत्रात चमत्कार स्पष्टपणे नाकारले.

रामकृष्ण मठाच्या स्वामी विवेकानंद ग्रंथावलीच्या तिसर्‍या खंडात सातव्या पानावर दिलेला प्रसंगाचा येथे उल्लेख करावसा वाटतो. एकदा स्वामी विवेकानंद आपल्या मठात बसले होते. मुंबईचे काही अतिशय श्रीमंत असे व्यापारी तेथे त्यांना भेटावयास आले. त्यांनी सांगितले, आम्ही गोरक्षक आहोत, गाईंसाठी पांजरपोळ चालवतो.

कसायांकडून पैसे देऊन किंवा त्यांना धमकावून गायींना गोशाळेत आणतो. तेव्हा आमच्या कार्याला आपण आशीर्वाद द्या. स्वामी विवेकानंदांना सदर उपक्रमाकरता केलेल्या खर्चाचा खूप मोठा आकडा ऐकून खूप आश्चर्य वाटले. स्वामी विवेकानंद म्हणाले मध्य भारतात भयंकर दुष्काळ पडला आहे. खुद्द सरकारने नऊ लाख लोक उपासमारीने मेल्याचे जाहीर केले आहे. आपल्या या मंडळाने या भुकेलेल्यांना मदत करण्यासाठी काही ठरवले आहे का? तेव्हा प्रचारक म्हणाले आमचे धर्मग्रंथ सांगतात की ते लोक त्यांच्या दुष्कर्मांमुळे मरत आहेत. गेल्या जन्मीच्या पापामुळे मरत आहेत. या उत्तराने दया आणि प्रेम म्हणजे ईश्वर असे मानणारे विवेकानंद यांच्या मनाला खूप वाईट वाटले.

चीड आली आणि ते हजरजबाबीपणे उत्तरले … असे जर असेल तर त्या गाईसुद्धा पापी असल्यामुळे त्यांच्या दुष्कर्मांमुळे कसायाकडून मरत आहेत. त्यावर हादरलेले प्रचारक चलाकपणे म्हणाले, त्या गायी पापी जरी असल्या तरी त्यांचे रक्षण करायचे असते. कारण त्या आपल्या माता आहेत .तेव्हा प्राण्यांपेक्षा माणसं श्रेष्ठ मानणार्‍या, माणसांच्या सेवेसाठी आयुष्य खर्च करणार्‍या स्वामीजींनी म्हटले, भारतभर हिंडतांना मला नेहमी प्रश्न पडत असे इतकी बुद्धिमान जनता येथे कशी काय आहे?, तुमचे आई-वडील मला आता समजले असे खेळकरपणे उत्तर दिले.

कृतीशूर संन्याशी असणारे स्वामी विवेकानंद सुधारणावादी, विज्ञानवादी आणि स्त्री-पुरुष समानताचे पुरस्कर्ते होते. त्याकाळी असलेल्या बालविवाह प्रथेला विरोध करतानाच त्यांनी प्रश्न विचारला आहे जी प्रथा मुलगी वयात येण्यापूर्वीच तिला मातृत्व बहाल करते, त्यात कसला आलाय धर्म ?. अशा प्रकारे त्यांनी धर्माच्या अपप्रवृत्तींवर आघात केला आहे. मानवतावादी विचारांचे स्वामी विवेकानंदांनी 2 नोव्हेंबर 1893 च्या मुदलियार यांना लिहिलेल्या पत्रात ते सांगतात ख्रिश्चन, मुसलमान यांनी अत्याचार केल्यामुळे धर्मांतरे झालेली नसून, उच्चवर्णीयांनी अनिष्ट प्रतीच्या आधारे अत्याचार केल्यामुळे धर्मांतरे झालेली आहेत. भारतात जातिव्यवस्था,अस्पृश्यता, चमत्कार, स्त्री-पुरुष असमानता, स्त्रीशिक्षणाचा अभाव असे मोठे अडथळे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सनातनी लोकांचा बालेकिल्ला असलेल्या कुंभकोणम येथे आपल्या भाषणात त्यांनी आवाहन केले आहे की आपल्या दलित बांधवांना उत्कर्षासाठी त्यांना आपण शिकवले पाहिजे.

आपल्याला एक शिक्षक लागत असेल तर त्यांना सात शिक्षक उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यामुळे समता निर्माण होईल. समता निर्माण करण्यासाठी निसर्गाने मनुष्याची निर्मिती केली आहे. स्वामी विवेकानंदाचे स्मृती, पुराणे, शंकराचार्य, पुरोहितवर्गाने लिहिलेले ग्रंथ यांच्यावरील मते जाणून, समजावून घेण्यासाठी त्यांचे 30 मे 1897 चे श्री. ‘प्रमदादास मित्र’ यांस लिहिलेले पत्र वाचकांनी जरूर अभ्यासावे.

अमेरिकेत आयोजित झालेल्या सर्वधर्म परिषदेचे प्रमुख निमंत्रक श्री. चालर्स कँरोल बॉनी यांनी भारतातही निमंत्रणे पाठवली. परंतु काही संदर्भ सांगतात भारतातील चारही शंकराचार्यांना अनेकदा निमंत्रणे मिळाली. परंतु या परिषदेला जाण्याचे निमंत्रण नाकारले. कारण त्यांच्या मते समुद्रप्रवास करणे म्हणजे ‘धर्म बुडवणे’ होय. काही ख्रिश्चन लोकांचा हिंदू धर्म बुडवण्याचा कट आहे अशी त्यांची समजूत होती.

स्वामी विवेकानंद अमेरिकेला सर्वधर्मपरिषदेत जाण्यामागेची भूमिका श्री. हरिपद यांना 28 डिसेंबर 1893 रोजी लिहिलेल्या पत्रात सांगतात, आपल्या देशातील गरिबांच्या उन्नतीसाठी काही उपाय सापडतो की काय? हे बघण्यासाठीच मी आलो आहे.

या पार्श्वभूमीवर विवेकानंद अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत अमेरिकेत सर्वधर्मपरिषदेला गेले. ज्याप्रमाणे आरमार उभारण्यासाठी, समुद्रउल्लंघन करण्यासाठी राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रोत्साहन दिले तसेच प्रोत्साहन स्वामी विवेकानंदांनी थोतांड, कर्मकांडावर लाथ मारून स्वतः समुद्रउल्लंघन करून देशबांधवांना दिले. विवेकानंदांनी सर्वधर्मपरिषदेत आपल्या भाषणात म्हटले, अमेरिकेतील भावांनो आणि बहिणींनो…. हे शब्द उच्चारल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट दोन मिनिटे चालू होता. यापुढे ते काय बोलले हे बहुतेकांना माहित नाही किंवा फारसे मर्म जाणत नाही, मनावर घेत नाही. स्वामी विवेकानंदांनी विसावा वक्ता म्हणून कंटाळलेल्या श्रोत्यांना काय सांगायला हवे, याचा अचूक वेध त्यांनी घेतला होता, श्रोत्यांचे अचूक माप घेतले होते.

म्हणून ते पुढे म्हणतात, धर्म, पंथ, आणि संप्रदाय यांच्या दुराभिमानामुळे आजवर अनेकदा हे जग मानवी रक्ताने न्हाऊन निघाले आहे. त्यामुळे मानवी संस्कृतीचा विनाश झालेला आहे आणि समृद्ध राष्ट्र नामशेष झाली आहे. तलवार आणि लेखणी यांच्या साह्याने माणसांचा केला जाणार्‍या सर्व प्रकारच्या छळांचा अंतिम क्षण जवळ आलाय…. ही सर्वधर्मपरिषद धर्मवेडेपणाची मृत्युघंटा आहे. धर्मांध, अंधश्रद्धाळू व्यक्तींना अशाप्रकारे चपराक मारणारे विवेकानंद फक्त पाचच मिनिटं बोलले. परंतु या भाषणामुळे ते अमेरिकेला, भारताला तसेच संपूर्ण जगाला परिचित झाले.

केवळ मंदिरातच ईश्वराला पाहणार्‍या माणसापेक्षा जो माणूस जाती, वंश, संप्रदाय इत्यादींचा विचार न करता एखाद्या गरिबामध्ये ईश्वराला पाहून त्यांची सेवा करतो, त्यांची मदत करतो त्यांच्यावरच ईश्वर अधिक प्रसन्न राहतो. अशा मानवीमूल्यांचा पुरस्कार करणार्‍या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचे विचार सांप्रदायिक चौकटीत बंदिस्त होऊन संकुचित होऊ नये.

भविष्यात त्यांच्या शिकवणुकीचा अभ्यासकांनी अभ्यास करून त्यांचे खरे विचारधन जगापर्यंत पोहोचावे आणि त्यांचा जन्मदिवस हा केवळ राष्ट्रीय स्तरावर साजरा न करता जागतिक स्तरावर साजरा केला जावा, या उद्देशाने हा लेखनप्रपंच. त्यांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प आजपासून करू या…

शेवट त्यांच्या एका विवेकसुत्राने करतो.

स्वतःच्या खर्‍या स्वरूपाचा बोध करून घ्या आणि सर्वांना खर्‍या स्वरूपाचा बोध करून द्या. त्यांच्यातील निद्रिस्त आत्मबोधाला जागे करा आणि मग बघा तो काय करतो!! शक्ती, सत्यशीलता येईल, चारित्र्य निर्माण होईल. जे जे म्हणून उत्कृष्ट असेल, ते ते प्राप्त होईल. फक्त तो निद्रिस्त आत्मबोध एकदाचा जागा झाला पाहिजे….

संदर्भ:

1.स्वामी विवेकानंद ग्रंथावली (खंड 1ते10) ,रामकृष्ण मठ,नागपूर

2.‘शोध स्वामी विवेकानंदांचा’, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, मनोविकास प्रकाशन

3.स्वामी विवेकानंद म्हणतात, रामकृष्ण मठ,नागपूर

4. बल हेच जीवन.., स्वामी विवेकानंद,रामकृष्ण मठ,नागपूर

5.विश्वमानव स्वामी विवेकानंद(खंड 1ते3) डॉ.वि.रा. करंदीकर,रामकृष्ण मठ,नागपूर

6.स्वामी विवेकानंदांची पत्रे,रामकृष्ण मठ,नागपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या