Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedबासरीने सावरला जगण्याचा सूर

बासरीने सावरला जगण्याचा सूर

अनिल चव्हाण

धुळे – Dhule

- Advertisement -

अलीकडे नैराश्य हा एक व्यापक सामाजिक आजार बनला आहे. नैराश्यापोटी केवळ सामान्य माणूसच नव्हे तर चित्रपट सृष्टीतील बडे स्टार, वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती देखील स्वतःला संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतात. प्रतिष्ठीत व्यक्तीने केलेल्या आत्महत्येचा गाजावाजा होतो. मात्र सामान्य व्यक्तीच्या आत्महत्येकडे सहज म्हणून बघितले जाते.

पोलीस दप्तरी देखील ‘अदखल पात्र’ एव्हढीच या घटनेची नोंद होते. सध्या देशभर गाजत असलेला अभिनेता सुशांतसिंगचे प्रकरण ताजेच आहे. मात्र कितीही संकटे आलीत, कितीही संघर्ष करावा लागला तरी परिस्थितीशी दोन हात करुन लढाणारे योध्ये हे देखील समाजातील आदर्श उदाहरणे मानली पाहिजेत. ‘लाख संकटे झेलून घेती, अशी आमुची छाती’ असे म्हणत परिस्थितीला न जुमानता हिंमतीने जगणार्‍यांपैकी धुळ्यातील एक अंध कलावंत रोहिदास नारायण आल्हाट हे एक नाव आहे.

जन्मापासून घरात रोहिदासह दोन्ही भाऊ दोन्ही डोळ्यांनी अंध. लहानपनीच पितृछत्र हरपल्यानंतर आता करायचे काय? असा मोठा प्रश्न समोर असतांना त्यांच्या आईने साफ-सफाईचे कामे करून या मुलांना वाढविले. रोहिदासचे धुळ्याच्या अंध शाळेतंर्गत दहावीपर्यंत शिक्षण झाले असून त्यात त्याने 71 टक्के मिळविले हे विशेष. परंतु परिस्थिीतीला पुढील शिक्षण घेणे कदाचीत मान्य नसावे. नियतीनेही समोर काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज येण्या आधीच हातातील पुस्तके सोडून कामासाठी त्यास घराबाहेर पडावे लागले. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोराणे येथील जवाहर सूतगिरणीत त्यांनी त्यास रोजगार उपलब्ध करुन दिला. रोहिदास अल्हाट हे मोराण्याचेच रहिवाशी असल्याने जवळच उपलब्ध झालेल्या रोजगारामुळे सोय झाली. पाठोपाठ त्यांच्या भावालाही याच सुतगिरीणीत रोजगार मिळाला. परंतु काही कारणास्तव नंतर हे काम रोहिदासने सोडले.

गेल्या दहा वर्षांपासून शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्स, शासकीय कार्यालय, बँक यांच्या बाहेर रस्त्याच्या कडेला बसून आपल्याकडे असलेल्या बासरीच्या माध्यमातून सुमधूर गीत सादर करीत दोन पैसे मिळविणे हाच आता त्यांचा व्यवसाय बनला आहे. आठ वर्षांपूर्वी विवाह करुन आणलेल्या अन् जळगावचे माहेर असलेल्या गंगुबाईंची त्यास भक्कम साथ आहे. हे दांम्पत्य दररोज कुठल्या न कुठल्या कार्यालयाबाहेर कुणाला अडथळा होणार नाही अशी जागा बघून आपले बस्तान मांडतात. हातातील केवळ एका लाकडी बासरीच्या माध्यमातून रस्त्याने जाणार्‍या प्रत्येकाला आकर्षीत करण्याची कला रोहिदास आल्हाट या कलावंताकडे आहे.

नाकानेही वाजवितो बासरी तोंडातून फेकल्या जणार्‍या हवेला लाकडी बासरीच्या सहा शिंद्रांच्या माध्यमातून सूर काढण्याचीही कला एखाद्याला किती मोठे करु शकते, याचीही उदाहरणे आहेत. अंध कलावंत रोहिदास हा तोंडासह नाकानेही बासरी वाजवितो.

याशिवाय पेटी आणि कॅसिओही वाजविण्याची कला त्याच्या अंगी आहे. ‘मोहमंद रफी’ हे रोहिदासचे विशेष आवडते गायक असल्याने रफीची अनेक गाणी तो बासरीच्या माध्यमातून सहज म्हणतो. ‘आने से ऊसके आये बहार’, ‘चाहूँगा मै तुझे सांज सवेरे’, ‘बहारो फुल बरसाओ’, ही सदाबहार गाणी तो तेव्हढ्याच अधिकाराने सादर करतो. याशिवाय ‘आया रे खिलोने वाला’, ‘बहारो फुल’, ‘दिवाना हुवा बादल’, ‘छू लेने दो नाजूक ओटो को’, ‘कब आऐ गा मेरे बंजारे’ यासारखी कितीतरी सदरबहार गाणी वाजवून तो ऐकणार्‍याला पुन्हा त्या दूनियेत घेवून जातो. त्यामुळेच रोहिदासच्या बासरीचे सूर कितीही दूरुन कानावर पडले तरी पाऊले आपोआपच त्याच्या दिशेने पडू लागातात. त्यामुळे रस्त्याने जाणारे-येणारे हमखास त्याच्याजवळ थांबतात.

किंबहूना अनेकांच्या वाहनांचा वेग कमी होतो. एक अंध कलावंत दिवसभरात अनेकांना अशा सुरेल गाण्यांनी रिझवतो. त्यामुळे आपसूकच त्याच्या परिस्थितीवर मग चर्चा सुरु होते. कला असून उपयोग काय? शेवटी भीकच मागावी लागते आहे ना! असे काही जण म्हणतात. तर कला आहे म्हणून तरी तो जगतो आहे. कलाच त्याच्या जगण्याचे साधन बनले असल्याचे काहीजण म्हणतात. अर्थात परिस्थिती कोणतहीही असो रोहिदासचा आत्मविश्वास मात्र दांडगा आहे आणि त्याच्या आत्मविश्वासा इतकाच त्याला गंगुबाईची भक्कम साथ आहे. असे असले तरी किती दिवस असे रस्त्याच्या काठाला गटारी शेजारी बसायचे? हा रोहिदासचा प्रश्न मात्र अनेकांना निरुत्तर करणारा आहे.

– मो. नं. 98222 95194

- Advertisment -

ताज्या बातम्या