Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedTarri Poha : घरीच बनवाल असा 'तर्री पोहा'

Tarri Poha : घरीच बनवाल असा ‘तर्री पोहा’

साहित्य –

– एक वाटी काळे चने म्हणजे आख्खे हरभरे

- Advertisement -

– दोन मोठे कांदे, आल एक इंच

– आठ ते दहा लसून पाकळ्या

– दोन हिरव्या मिरच्या

– दोन टोमॅटो,

– हळद , हिंग, दोन चमचे लाल मिरची पावडर

– एक चमचा रंगासाठी काश्मिरी लाल मिरची पावडर

– धने पावडर, एक चमचा कसूरी मेथी

– एक चमचा बेसन पीठ

– एक चमचा गरम मसाला किंवा वर्‍हाडी मसाला किंवा काळा मसाला

– बारीक चिरलेली कोथिंबीर

– मीठ चवीनुसार

– तेल

कृती –

सर्वप्रथम हरभरे रात्रभर पाण्यात भिजवूने त्याला कुकरमध्ये छान मऊसर मीठ घालून शिजवून घेणे. कांदा हिरवी मिरची आलं लसूण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणे. पॅनमध्ये तेल घालणे. तेल जरा जास्त घालणे कारण तर्री म्हटल्यावर तेलाचा तवंग वरती दिसायला हवा. तेलात मोहरी जीरे तडतडल्यानंतर हिंग आणि हा वाटलेला कांद्याचा मसाला घालून छान परतवून घेणे. त्यात लाल मिरची पावडर हळद धने पावडर वर्‍हाडी मसाला कसूरी मेथी हे सर्व मसाले घालून झाले कि छान तेल सुटेपर्यंत परतून घेणे. एक चमचा बेसन पीठ घालून छान एकत्र करून घ्या. आपला मसाला परतवून झाला की मग त्यात शिजवलेले काळे चणे घालून घेणे तसेच एक ग्लासभर पाणी घालणे आणि मंद आचेवर उकळायला ठेवणे. चवीनुसार मीठ घालणे. दोन टोमॅटो मोठे काप करुन म्हणजे दोन किंवा चारच फोडी करून त्यात घालणे आणि पुन्हा उकळायला ठेवणे. पंधरा ते वीस मिनिटे बारीक गॅसवर छान उकळल्या नंतर आता यात वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणे. आपली तर्री तयार आहे .

पोह्याची रेसिपी –

साहित्य –

– एक मोठा कप जाड पोहे

– दोन कांदे बारीक चिरलेले

– चार हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या

– मुठभर शेंगदाणे

– जीरे, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता,

– मीठ चवीनुसार

– बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम जाड पोहे पाणी घालून धुवून घेणे आणि नंतर ते एका चाळणीमध्ये काढणे म्हणजे जास्तीच पाणी निघून जाते आणि पोहे छान भिजतात. एका कढईमध्ये तेलात मोहरी तडतडल्यानंतर जीरे आणि शेंगदाणे घालून खरपूस तळून घेणे . आता त्यात हिरवी मिरची कढीपत्ता आणि कांदा परतवणे. कांदा छान गुलाबीसर झाल्यावर त्यात हळद घालणे. आता यात भिजवलेले पोहे घालून त्यात चवीनुसार मीठ घालून छान सर्व एकजीव मिक्स करून घेणे. आवडत असेल तर साखर एक चमचा घालणे. त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ देणे आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करून घेणे. पोहे तयार आहेत. एका मोठ्ठ्या प्लेट मध्ये पोहे घेणे आणि त्यावर थोडे चणे घालून बाजूने जास्त तर्री घालणे. यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव किंवा फरसाण आणि लिंबू पिळून मस्त सजवणे. झणझणीत तर्री पोहे तयार आहे.

– योगिनी साठे (सोलापूर)

- Advertisment -

ताज्या बातम्या