Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedस्टार्टअप आणि संशोधन झाले पाहिजे

स्टार्टअप आणि संशोधन झाले पाहिजे

: अपूर्वा जाखडी

नाशिक मुंबई, पुण्यानंतरचे सर्वात वेगवान विकास साधणारे शहर मानले जातेय. यामुळे अनेक कंपन्यांना याठिकाणी बस्तान बसवण्यासाठी मोठ्या संधी आहेत.

- Advertisement -

आगामी काळात पुणे रेल्वे सुरू झाली तर सहा ते सात तास वेळेच्या अंतरावर असलेला नाशिक-पुणे प्रवास अवघ्या काही तासांवर येणार आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी अधिक प्रभावी जोडली जाणार असून यातून आणखी विकासाला वाव आहे.

नाशिकमध्ये शिक्षणाच्या उत्तम संधी आहेत. अनेक शाळांनी प्रयोगशील शिक्षणपद्धतील अंमलात आणत प्रात्याक्षिकांवर आधारित शिक्षण देऊ केले आहे. याचे चांगले परिणाम बघायला मिळाल्याचा अनुभव अनेकदा समोर येतो. विद्यार्थ्यांना विचार मंथनासाठी अनेक शैक्षणिक संस्था विविध उपक्रम राबवताना नजरेस पडतात.

प्रत्येक शाळेने प्रयोगशील शिक्षणपद्धतील अंमलात आणली तर सुशिक्षित बेरोजगारी घटण्यास मदत होईल.नाशिकमध्ये अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाले आहेत, मात्र संशोधनासाठी कुठलाही वाव याठिकाणी नाही. त्यामुळे ही मंडळी गाव सोडून इतर गावात स्थायिक झाली, नंतर नाशिकचे नाव केवळ आठवणीच जणू त्यांच्यासाठी राहिलेले दिसते.

शहरासह जिल्ह्यात अनेक शासकीय आणि खासगी आयटीआय आहेत. याठिकाणी औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठीच्या उत्तम संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, जेणेकरून औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात समांतर प्रगती साधता येईल.

नाशिक शहरात तारांगण आहे, तिथे अंतराळाबाबत सविस्तर माहिती मुलांना प्रत्यक्षात आकाशाच्या अनुभवातून उपलब्ध केली जाते. यामुळे मुलांना या बाबी अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. नाशिक शहर स्मार्टसिटीकडे वाटचाल करत आहे.

अनेक कामे स्मार्टसिटी अंतर्गत पार पडू लागली आहेत. शिक्षणातही स्मार्टसिटीच्या अंतर्गत शिक्षणपद्धतीत बदल करण्यास किंवा ही पद्धत रुजविण्यात यश आले तर प्रगती साधता येऊ शकते. शिक्षणासोबतच नाशिकची शेतीदेखील वाखाणण्याजोगी आहे. अनेक शेतकर्‍यांनी नवनवीन बदल शेतीत केलेले दिसून येतात.

अ‍ॅॅग्रोबेस तंत्रज्ञानावर आणखी संशोधन झाले पाहिजे, यातून शेतीमध्ये प्रगती साधता येईल. शेती, आरोग्य, उद्योग, व्यापार, व्यवयाय यामध्ये स्टार्टअपचा सहभाग वाढला पाहिजे. यातून स्थानिक सुशिक्षितांना नोकरी तर मिळेलच, शिवाय शहरविकास अधिक साधला जाईल.

येणार्‍या 25 वर्षांत नाशिकही देशाच्या आर्थिक राजधानीप्रमाणे जगातल्या मोठ्या शहरांमध्ये गणले जाईल. अंतराळ संशोधनासाठी लागणार्‍या साधनसामुग्रीसाठी अनेक लहान, मोठे उद्योग काम करत असतात. नाशिकमध्ये आजही अनेक कंपन्या देशासाठी अनेक उपकरणे, साधनसामुग्री बनवून देताना दिसतात.

यापुढे यात अधिक भर पडली पाहिजे. संशोधन झाले पाहिजे, येथील वातावरणाचा चांगल्या जीवनशैलीत फायदा करून घेतला पाहिजे. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, तसेच उच्चशिक्षित स्थानिक इतरत्र न जाता त्यांचेही योगदान मायभूमीसाठी असणे आवश्यक आहे. संधी उपलब्ध झाल्या तर ही मंडळी कुठेही बाहेर पडणार नाही हे तितकेच खरे!

- Advertisment -

ताज्या बातम्या