ड्रोनच्या सहाय्याने शेतीत फवारणी

ड्रोनच्या सहाय्याने शेतीत फवारणी

सिन्नर । विलास पाटील | Sinnar

मजूर मिळत नाहीत, पुरेसा पाऊस पडत नाही, पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा (Power supply) होत नाही, दिवसा विजच नाही अशी एक ना अनेक कारणे देत अनेक लोक शेती परवडतच नाही असं म्हणत फिरतात. मात्र, ठरवलं तर प्रत्येक अडचणीवर मात करता येते. अर्थात त्यासाठी काळानुरूप बदलावंही लागतं.

पेरणीनंतर शेतात तण वाढलं तर फवारणी करण्यासाठी माणसं मिळत नाहीत. त्यातून तण माजतं आणि पीक धोक्यात येतं. मात्र, अत्याधुनिक सुविधा (modern facilities) बाजारात उपलब्ध होऊ लागल्या असून ड्रोनच्या (Drone) साह्याने शेतीत फवारणीची (Spraying in agriculture) कामे करता येतात. तालुक्यातील पंचाळे (panchale) येथील वैभव अशोक वडक या 22 वर्षीय युवकाने ड्रोनच्या साह्याने शेतातील फवारणीचं व्रत हाती घेतलं असून अवघ्या 6-7 महिन्यात त्याने तालुक्यातील 350 एकरहून अधिक क्षेत्रावर फवारणीचे काम केले आहे.

वैभव जेमतेम 12 वी कॉमर्सपर्यंत गावातीलच हायस्कूलमध्ये शिकला. त्यानंतर त्याने वीजतंत्री हा आयटीआयचा (ITI) अभ्यासक्रमही पूर्ण केला. मात्र, त्यातून त्याला म्हणावा तसा रोजगार (Employment) उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे रोजगारासाठी त्याने थेट पुण्याची वाट धरली. एका कोल्ड स्टोरेज कंपनीत (Cold Storage Company) त्याने दोन वर्ष नोकरी केली. मात्र, तेथे त्याचे मन रमले नाही. त्यामुळे तो पुन्हा पंचाळेत परतला.

गावातीलच एका खताच्या दुकानात तो कामाला लागला. तिथे शेतकरी (farmers) यायचे, अमुक पिकावर अमुक रोग पडलाय त्यावर फवारायचं औषध द्या. तण फार वाढलं, तणनाशक द्या. सोयाबीनवर मारायचं पोषक द्या. औषध प्रत्येक शेतकरी न्यायचा. मात्र, प्रत्येकाचं दुखणंही त्यामुळे त्याला ऐकायला मिळायचं. फवारण्यासाठी पाठीवरचा पंप आहे. पण, मजूरच मिळत नाही.

बॅटरीवरचा पंप आहे. पण, आता पहिल्यासारखं काम होत नाही. आजकाल फवारणीच्या कामाचा ठेका घेणारे तरुणही गावागावात मिळतात. मात्र, प्रत्येक पंपासाठी त्याला पन्नास रुपये मोजावे लागतात. एकरभर फवारणी करण्यासाठी 20 पंप मारावे लागतात. त्यासाठी हजार रुपयांची मजुरी जाते. त्याबरोबरच वेळही जातो. सध्या बॅटरीवरील पंप (Battery pump) आल्याने हाताचे हालही कमी झाले आहेत.

मात्र, पाठीच्या दुखण्याने अनेकांना पंप घेऊन सारखे फिरता येत नाही. शेतकर्‍यांच्या वेगवेगळ्या व्यथा दुकानात बसल्या बसल्या वैभव ऐकत होता. यावर काही मार्ग शोधता येईल का याचाही तो विचार करत होता. युट्युब (Youtube), फेसबुक (Facebook) पाहणं तर नेहमीच होतं. असंच एक दिवस फेसबुकवर त्याला ड्रोनच्या साह्याने शेतीचे (Farming with drones) सुरू असलेल्या फवारणीचा व्हिडिओ (video) बघायला मिळाला आणि त्याला नवा मार्ग सापडला.

इंडिया मार्टवर त्याने अशा ड्रोनची चौकशी सुरू केली आणि क्षणात त्याला मेसेजस, उत्पादक कंपन्यांचे फोन सुरू झाले. त्यातच नाशकातीलच एक ड्रोन विक्रेत्याच्या शब्दावर विश्वास ठेवत त्याने जवळपास चार लाखांचा ड्रोनच खरेदी केला. हा ड्रोन कसा वापरायचाही त्याला माहीत नव्हतं. यूट्यूबवरचे व्हिडिओज पाहून ड्रोन चालवायला आणि फवारणी करायला तो शिकला.

आज अवघ्या सातशे रुपयात तो एकरभर शेतीत अवघ्या पाच सात मिनिटात फवारणी करून देतो. जानेवारी 2022 मध्ये घेतलेल्या ड्रोनच्या सहाय्याने त्याने आतापर्यंत साडेतीनशे एकर शेतीत फवारणी करत पिकांना वेगवेगळ्या रोगांपासून वाचवले आहे. शेतात वाढू पाहणारे तण जागेवरच मारत पिकही वाचवले आहे. पाठीवरच्या पंपाच्या तुलनेत या ड्रोनला पाणी कमी लागते व फवारणीचा वेळही कमी लागतो.

ड्रोन (Drone) मध्ये जेमतेम दहा लिटर पाणी बसते आणि ते एकरभर शेतीसाठी पुरेसे ठरते. एक एकरसाठी लागणारे औषध या दहा लिटर पाण्यात विरघळल्यानंतर ड्रोन उड्डाणासाठी सज्ज होतो आणि सात आठ मिनिटात कामगिरी फत्ते करून परत येतो. ड्रोनसोबत दोन बॅटर्‍यांचे दोन संच येतात. एक संच एक एकर फवारणी करतो तर ही बॅटरी चार्ज करण्यासाठी जवळपास अर्धा तास लागतो. त्यानंतर बॅटरी पुन्हा फवारणीसाठी तयार होते. असा विचार केल्यास दिवसभरात वीस एकर क्षेत्रावर ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करता येते.

सुरुवातीला ड्रोनच्या साह्याने फवारणी करण्यास शेतकरी फारसे उत्सुक नसायचे. मात्र ड्रोन पाच सात फूट उंचीवरून फवारणी करत जाताना त्यातील हवेच्या दाबामुळे औषध थेट झाडाबरोबरच जमिनीपर्यंत पोहोचत असल्याचे बघून फवारणीला तयार होऊ लागला आहे. सोयाबीन, मका, हरभरा, कांदा, गहू यासह विविध पिकावर वैभवने यशस्वीपणे कीटनाशक, तननाशक, बुरशीनाशक, पोषकांची फवारणी केली आहे.

कुठल्या पिकाला कुठल्या औषधाची फवारणी करायची याचाही त्यांनी अभ्यास केला असून शेतकर्‍याचे पीक बघून औषधाबाबतचा सल्लाही तो शेतकर्‍यांना देऊ लागला आहे. थेट शेतात न जाता शेताच्या बांधावरून तो संपूर्ण ड्रोन रिमोटच्या साह्याने फिरवतो. त्यासाठी त्याने आपल्या मोबाईलवर ग्री असिस्टंट नावाचे प डाऊनलोड करून घेतले असून बसल्या जागेवर तो पिकाचे क्षेत्र काढून देतो आणि ड्रोन फवारणी केलेले क्षेत्रही अवघ्या काही सेकंदात काढून पैसे मोजून नेतो. हा ड्रोन फारसा जड नसला तरी त्याच्या आकारामुळे त्यावरील पंख्यामुळे तो डोक्यावर उचलून नेता येत नाही.

मोटरसायकलवर तो नेता येऊ शकतो. मात्र, आपल्याला रोजीरोटी देणारा ड्रोन सुरक्षितपणे नेता यावा यासाठी वैभवने आता एक मालवाहू चारचाकीही घेतली आहे. या चारचाकीच्या माध्यमातून वैभवच्या फवारणीचा वेगही वाढला असून मजुरांची कमतरताही भासू न देता शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ड्रोन घेऊन तो केव्हाही तयार असतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com