युक्तीच्या काही गोष्टी

लेखीका - प्रा.वैशाली पाटील, धुळे
युक्तीच्या काही गोष्टी

दैनंदीन जीवनात आपण सहजपणे कसे वागतो हे बर्‍याचदा आपल्या लक्षातही येत नाही. आपले बोलणे, वागणे कृती काहीजण प्रेमापोटी समजून घेतात. पण त्यावेळी खरच तसे करण्याची गरज होती का? याचा विचार बर्‍याचदा आपण करतच नाही. त्यामुळे आपण आहोत त्या वयात इतरांशी कसे वागावे? घरी आलेल्या पाहूण्यांबाबत काय बोलावे? या गोष्टी भलेही छोट्या असतील पण त्या युक्तीच्याच ठरतात.

या लेखाचे टाईटल वाचुन लगेचच उत्सुकता वाढली ना! मानसशास्त्राच्या द्रुष्टीने युक्ती च्या गोष्टी कोणत्या असतील. डाव्या हातातल्या चहाच्या कपातून दरवळणार्‍या वाफा, उजव्या हातात वर्तमानपत्र आणि सकाळची प्रसन्न वेळ.

अवतीभवती कुटुंबीयांचा वावर वाढतो. मुलांची गडबड, कधी प्रेशर कुकरच्या शिट्टी चा आवाज, तर कधी बाथरूम मधल्या शॉवरच्या आवाजाच पार्श्वसंगीत लाभलेल्या मुक्त आवाजाच्या लकेरी ऐकू येतात.

एफ.एम.रेडिओ वरली झुठा घुस्सा बंद पलक में प्यार, जिना भी मुश्कील हाय, मरना भी मुश्कील.. हे संगीत कानात घोळत असत आणि मनाच्या कोपर्‍यात दिवसभरच्या कामाची यादी चालू असते.

सकाळची सर्व काम थांबून तुम्ही माझ्या लेखातील हे चार शब्द वाचत आहेत...

म्हणजे रोजच्या धडपडीला पुरून उरेल अशी समजदारीची करमणुकीची शिदोरी शोधताय हो ना...

म्हणून स्वतःहून तुम्हाला म्हटलं ‘येस गुड मॉर्निंग’. आज काल खास मैत्रिणीला, नातेवाईकांना कामाशिवाय फोन करायची सवड होत नाही. म्हणून ‘दिल ढुंढता है. फुरसत के चार लम्हे’. मनाला तरतरी देणारे दोन-चार शब्दांचे गुड माँर्निग. हे अभिवादनाचे शब्द वापरुन इतकी ही शब्दांची नाणी इतकी गुळगुळीत झाली आहेत, की त्यांच्या वरचा गुडवेलचा आणि मैत्रीच्या सद्भावना चा छापा दिसेनासा झालाय. पण ती भावना मुळात असते, कामाच्या तंत्रीत मला तुझी आठवण राहते हं....

गुडमाँर्निगच्या शुभेच्छा असतातच कधी बोलक्या तर कधी ठरलेल्या.

मिनिट भरच्या भेटीनंतर आपण सहज म्हणतो हँव अ नाईस डे. म्हणजे जो-जे वांछिल तो ते लाभो. असे पसायदानाच आपण एकमेकांना देतो. तेव्हा मनापासून हँव अ नाईस डे होतो. चला तर मग आता.

मला समजलेल्या आयुष्यात युक्तीच्या चार गोष्टी सांगते....त्याला वयाचा अनुभव लागतोच अस काही नाही....

वय वर्षे 7 - आपल्याला शाळेत जातांना मम्मी ने दिलेल्या डब्यातील भाजी पोळी आवडत नाही, तेव्हा संपूर्ण वर्गात सांगायच मी ही भाजी आणली आहे. तेव्हा ज्यांना ती भाजी आवडते ते आपली भाजी आवडून खातात, इकड मैत्रीण पण खुष. तिकडे मम्मी पण खुष, डबा संपला म्हणून...

वय वर्षे 12- आता खेळायला जा असं मम्मीने म्हटलं तर थोडा सिरीयस फेस करून अभ्यास फिनिश करून जाते असं म्हणावं. मग मम्मी जाम खुश होते, मग अभ्यास केल्यासारखे दाखवून जास्त वेळ खेळता येते...

वय वर्षे 22- स्पोर्ट्स, फिल्म करिअर पेक्षा अभ्यासाला निश्चित महत्त्व आहे. पण त्यावेळी आपण कोणत्या कामात जास्त वेळ रमुन आनंदाने काम करु शकतो. तेच क्षेत्र निवडा म्हणजे यश तुमच्या मुठीत राहिल.

वय वर्षे 35- आपल्या मुला- मुलींचे पालकत्व पेक्षा मित्र मैत्रीण बना. मुलांच्या आयुष्यात काय चालू आहे हे कळेल. आणि योग्य वेळी त्यांच्या विचारांना योग्य दिशा देता येईल....

वय वर्षे 45- पाहुण्यांना घरी जेवायला बोलल्यानंतर पानसुपारी देताना आमच्या कश्मीरचा अल्बम दाखवते..असं म्हणून अल्बम दाखवू नये. लोक सौजन्याने हो म्हणतात पण त्यांना बोअर होतं असतं. म्हणून मस्त पैकी गप्पानं मध्येच रमाव...

वय 65- जेवणाची चव आवडो वा ना आवडो तुझ्या हाताची सर कोणत्याही हाताला नाही अस म्हणावे कारण..

अन्न वाढणारे हात महत्त्वाचे असतात हो की नाही. अन्नाची गोडी काही सेकंदाची पण मनाला भिडणारी शब्दांचे सुख जीवन रुचकर बनविते. वय 70- नात्याचा उभा धागा प्रेमाचा नी आडवा विश्वासाचा. दोन्ही धागे महत्त्वाचे. नात्याची वीण जितकी घट्ट तितकं वस्त्र अधिक उबदार. लक्षात घ्या पंतग उंच उडण्यासाठी मांजाला ढील द्यावी लागते. तसेच नात्याची प्रगती होण्यासाठी समोरच्या व्यक्ती ला अपेक्षांच्या बाबतीत मोकळीक द्या. नात्याच्या रोपट्याचा वृक्ष होण्यासाठी सहनशीलतचे खतपाणी घालावे लागते.

गरिबी-श्रीमंती या दोन्ही संकल्पना या आपल्या विचारातून व असमाधानातुन जन्माला येतात. अखेरीस आत्मसुख महत्त्वाचे असते. सकारात्मक मानसिकता व विचारधारा यात खुप मोठे बळ असते. या चैतन्याला अशक्य हा शब्दच ठावुक नसतो. जो संघर्षाविना कृतीशील जीवन जगतो आणि सकारात्मकतेने पुढे जात राहतो, तो नेहमीच यशस्वी होतो हाच इतिहास आजवर आहे...

मग या समजलेल्या युक्ती च्या गोष्टी आचरणात आणण्यासाठी.. बेस्ट लक.

- मो नं. 84596 04234

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com