चिंधी झाली सिंधू, सिंधूची झाली माई

चिंधी झाली सिंधू, सिंधूची झाली माई

ओळख तिची अनाथांची माय, प्रेमाला पोरक्या निराधारांची माय,
हिमतीसमोर तिच्या हरला तो की काळ, चिंधी झाली सिंधू, सिंधूची झाली माई
अशी ओळख तिची ती सिंधूताई

शब्दात वर्णन न करता येणारी या माऊलीची ओळख आहे.  जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे या ओळींप्रमाणे सिंधूताईंच्या आयुष्याची वाटचाल आपल्या दृष्टीस पडते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 15 महिन्यानंतर 14 नोव्हेंबर 1948 ला भारत देश पंडित नेहरूंचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करत होता त्याच सुमारास वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे गुरे चारणार्‍या अभिराम साठेंच्या घरात ही नकोशी कन्या जन्माला आली. आयुष्य सुरु झालं खरं पण लाडकी लेक म्हणून नव्हे तर नकोशी म्हणून. या बाळाला आई बापाच आजी आजोबाच कोड कौतूक मिळालच नाही मुलगी म्हणून कायम हेळसांड आणि दुर्लक्ष तिच्या वाट्याला आलं. तरीही नकोशी त्यातही समाधानी होती, काही तक्रार म्हणून नव्हती हसतच आयुष्याला सामोरी जात होती ही नकोशी...

या नवजात बालिकेच नाव ठेवलं गेलं चिंधी.  चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीच्या चिंधीला शिक्षणाची खूप आवड! वडिलांच्या प्रेमामुळे ओढून ताणून 4 थी पर्यंतच  शिक्षण घेता आले. गुरे चरायला गेल्यावर चिंधी संधी साधत शाळेत जाऊन बसे. तिच्या वडीलांना तिला शिकविण्याची इच्छा होती, परंतु आईचा दुस्वास आणि अवहेलना झेलत लहानशी चिंधी कुठपर्यंत मजल मारणार? जेमतेम 11 वर्षांची असेल तेव्हा चक्क 30 वर्षाच्या श्रीहरी सपकाळ नावाच्या इसमाशी तिचा विवाह लावून देण्यात आला.लहानपणीच लग्न झाल्यावर खेळण्या बागडण्याच्या वयात ती कोवळी पोर तीन लेकरांची आई झाली होती.  

काही दिवसातच एकमेव आधार असलेलं वडिलांचं मायेचं छत्रदेखील काळाने हिरावून घेतलं. गावातील इतर स्त्रियांप्रमाणेच चिंधीचं जगणं देखील शोषण आणि अपमानाने भरलेलं होतं पण तिच्यात एक वेगळेपण होतं, ते म्हणजे तिच्यातील आत्मविश्वास आणि चार चौघात आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याची निर्भीडता तिच्यात ठासून भरलेली होती. गावातील जनावरांचे शेण उचलण्याचा मोबदला मिळविण्याकरता ताईंनी पहिलं बंड पुकारलं. गावातल्या स्त्रियांना न्याय मिळवून दिला. ताईंचा विजय झाला पण गावातल्या जमीनदाराचा अहंकार दुखावला. झालेल्या अपमानाचा त्याला सूड घ्यायचा होता, त्यावेळी चिंधी नऊ महिन्यांची गर्भवती होती, सावकाराने तिच्या पोटातील मूल त्याचे असल्याचे सांगत तिच्या नवर्‍याचे कान भरले.

चिंधीचा नवरा देखील सावकाराच्या सांगण्यात आला आणि चिंधीला बेदम मारहाण करून गोठ्यात हाकलले. अर्धमेल्या अवस्थेत चिंधीने गोठ्यातच एका मुलीला जन्म दिला, एकाकी पडलेल्या चिंधीला काहीही सुचत नव्हते.  बाळाला घेऊन चिंधीने आपल्या विधवा आईचं घर गाठलं. पण समाजाच्या धाकाने आईने चिंधीला घरातून बाहेर काढलं. निराधार झालेली चिंधी दहा दिवसांच्या चिमुकलीला घेऊन जीव देण्यासाठी निघाली, वाटेत तिला पाण्याकरता तळमळत असलेला भिकारी दिसला. त्याला चिंधीने पाणी पाजलं जवळचा भाकर तुकडा दिला. त्या भिकार्‍याला थोडी तरतरी आली.  या प्रसंगानं तीचं मन बदललं हे दुसरं जीवन अनाथांना आश्रय देण्याकरता मिळालंय असं तिला वाटून गेलं.

मुलीला घेऊन ती बसमध्ये चढायला गेली असता कंडक्टरने तिकीटाचे पैसे नसल्याने चढू दिले नाही. खूप गयावया केल्यानंतर देखील त्याने तिला हाकलून लावले. बस थोडी पुढे जात नाही तोच त्या बसवर आभाळातून कडकडत वीज कोसळली. चिंधी करता हा पुनर्जन्म होता. तिच्याकरता आता चिंधीचे काही अस्तित्व उरले नव्हते. ती आता सिंधू झाली होती, ती नदी जिच्याविषयी ती लहानपणापासून ऐकत आली होती. ती सिंधू जी वाहतांना लोकांच्या आयुष्यात शीतलता प्रदान करते.

अनाथांचे जीणे जगता-जगता सिंधुताई अनाथांची माय झाली, आणि तिचा न संपणारा प्रवास सुरू झाला. निराधार अनाथांना गोळा करत माईंनी भिक मागून त्यांची पोटं भरली. परभणी-नांदेड-मनमाड या रेल्वेस्थानकांवर माई दिवसभर भिक मागायच्या आणि रात्री झोपायला स्मशानात जात असता. त्या सांगतात की, ज्यावेळी त्यांना भिक मिळायची नाही त्यावेळी त्या स्मशानातील जळणार्‍या चितेजवळ ठेवलेल्या कणकेचे उंडे चितेवरील विस्तवावार भाजून आपली भूक शमवत. रस्त्यावरचं एक एक मुल ताई आपलसं करत गेल्या आणि आज जवळ-जवळ 2000 पेक्षा जास्त मुलांच्या सिंधुताई आई झाल्या.

सिंधुताई देवाकडे मागणं मागतांना म्हणतात :

देवा आम्हाला हसायला शिकव..

परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस.

सिंधुताई आदिवासींच्या हक्कासाठी देखील लढल्या. त्या आदिवासींच्या मागण्यांसाठी  प्रधानमंत्री इंदिरा गांधींपर्यंत देखील पोहोचल्या होत्या. हळूहळू लोक सिंधूताईंना माई म्हणून ओळखू लागले आणि स्वतःहून पुढे येऊन त्यांनी स्वीकारलेल्या अनाथ मुलांना दान देऊ लागले. आता या मुलांना देखील हक्काचे घर मिळाले होते. हळूहळू सिंधुताई इतर अनेक मुलांच्या माई झाल्या. सिंधू ताईंना वाटायचे की पोटच्या मुलीच्या प्रेमामुळे इतर मुलांवर अन्याय व्हायला नको म्हणून त्यांनी आपल्या मुलीचे पालकत्व पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या संस्थापकांना देऊ केले. त्यांची मुलगी ममता देखील समंजस आणि आईच्या भावना जाणणारी होती. आईच्या प्रत्येक निर्णयात तिने आईला साथ दिली. सिंधूताईंचे वक्तृत्व उत्तम असल्याने हळूहळू त्यांची भजनं आणि भाषणं फार प्रिीसद्ध होऊ लागली. त्यांच्या भाषणाच्या प्रसिद्धीमुळे त्यांना 2009 साली अमेरिकेतून देखील बोलावणे आले होते.

अनाथांच्या संस्थेसाठी ताई विदेशात देखील जाऊन आल्या आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांच्या पतीने त्यांच्याजवळ येऊन राहण्याचा आग्रह धरला असता ताईंनी आपल्या मुलाच्या रुपात त्यांना स्वीकारलं. त्यांची कन्या ममता या आपल्या आईप्रमाणेच ममता बाल सदन नावाचे अनाथ आश्रम चालवत आहेत. आपल्या मुलीचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला आणि गाईनीच तिचं रक्षण केलंय या भावनेने सिंधूताईंनी वर्धा जिल्ह्यातील नवरगावला गोपिका गाय रक्षण केंद्र सुरु केलं. या गोरक्षण संस्थेत आज जवळ-जवळ 200 ते 300 गायींना संरक्षण मिळालंय. पुण्यातील हडपसर भागात असलेली ताईंच्या सन्मती बाल निकेतन संस्थेत अनेक अनाथ मुलांना आश्रय मिळाला आहे. त्यांची काळजी घेण्याकरता ताईच्याच मुलांना नियुक्त करण्यात आलं आहे.

चिखलदरा इथे मुलींसाठी सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह निर्माण करण्यात आले आहे शिवाय वर्धा येथे आपल्या वडिलांच्या नावाने अभिराम बाल भवन ची स्थापना केली आहे. माईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे.

750 पेक्षा अधिक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सिंधूताईंच्या जीवनाने निर्माता-दिग्दर्शक अनंत महादेवन एवढे प्रभावित झाले की त्यांनी माई वर आधारीत मी सिंधुताई सपकाळ नावाचा चित्रपट तयार केला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. 54 व्या लंडन फिल्म फेस्टिवल मध्ये देखील हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. कवितांची आवड असलेल्या सिंधूताई म्हणतात,  

लकीर की फकीर हुं मै, उसका कोई गम नही,                             

नही धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नही!        

अनाथांची माई म्हणून आपली ओळख निर्माण करणार्‍या सिंधुताई सपकाळ यांचा 4 जानेवारी 2022 रोजी पुण्यातील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये निधन झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com