Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedनिसर्ग सौंदर्यात वसलेले श्रीक्षेत्र वृध्देश्वर

निसर्ग सौंदर्यात वसलेले श्रीक्षेत्र वृध्देश्वर

श्री क्षेत्र वृद्धेश्वर हे नाथ पंथाचे आद्य शक्तीपीठ आहे. हे स्थान अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे. वृद्धेश्वर हे महादेवाचे खूप जुने मंदिर असल्याचे म्हटले जाते. डोंगर सानिध्यात, निर्सग रम्य परीसरात वृद्धेश्वराचे हे पवित्र स्थान आहे.

देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थान नैसर्गिक सौंदर्यामुळे येणार्‍या भाविकांचे लक्ष वेधून घेते. वृध्देश्वर देवस्थानच्या भूमीत पाय रोवताच भाविक भक्तांचे मन प्रसन्न होते. कारण येथे साक्षात वृध्देश्वराची स्वयंभू पिंड (शिवलिंग) आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी या शिवलिंगामध्ये वाढ होते, हे या देवस्थानचे मोठ वैशिष्ठय आहे. वृध्देश्वर देवस्थानचा अनेक नावांनी नामोल्लेख केला जातो. जुन्या काळातील लोक म्हातारदेवांची भूमी, तर काही लोक आदिनाथांची भूमी या नावानेही ओळखतात. या देवस्थानचा नामोल्लेख वृध्देश्वराची भूमी असाही केला ज़ातो. देवांचा देव महादेव भगवान शंकर आपल्या भक्ताला सहज पावन होतात व तशी त्यांची आखायिका आहे.

- Advertisement -

श्रीक्षेत्र वृध्देश्वर येथे 33 कोटी देवांच्या उपस्थितीत या ठिकाणी मोठा महायज्ञ झाला होता. त्यामुळे या भूमीला आणि देवस्थानला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे. चार प्रमुख धामांपैकी वृध्देश्वरदेखील एक धाम आहे. या देवस्थानच्या माध्यमातून वर्षभरात महत्वाचे दोन उत्सव साजरे केले जातात. यामध्ये महाशिवरात्री आणि श्रावणी महिन्यातील तिसरा सोमवार, यासह इतरही अनेक धार्मिक उत्सव येथे साज़रे केले ज़ातात. देवस्थानच्या विकास कामांसाठी देवस्थानचा तीर्थक्षेत्र क वर्गात समावेश करण्यात आला आहे.

वृध्देश्वर देवस्थानच्या विकास कामांवर प्रकाश टाकला असता, मंदिराच्या मुख्य गाभार्‍यावर आकर्षक रंगकाम केलेले आहे. तसेच मुख्य मंदिरावर रेखाटलेल्या विविध देवादिकांच्या मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेतात. देवस्थान समितीच्या माध्यमातून या ठिकाणी दर रविवारी आमटी -भाकरीचा प्रसाद दिला जातो तसेच भक्तगण देखील सोमवार किंवा एकादशी व चतुर्थीला भाविकांना फराळ वाटप करतात. वृध्देश्वर देवस्थान देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असून, येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी देखील या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव भरतो.

वृध्देश्वर देवस्थानपासून पुढे काही अंतरावर मच्छिंद्रनाथ गड (मायंबा) देवस्थान आहे तसेच जवळच चैतन्य कानिफनाथ देवस्थान मढीदेखील आहे. एकाचवेळी एकाच दिवशी या तीनही देवस्थानचे देवदर्शन भाविकांना सहजरित्या मिळू शकते. मोहटादेवी देवस्थानदेखील याच तालुक्याचे भूषण आहे. पाथर्डी तालुका हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. राष्ट्रसंत आनंदऋजी महाराज, राष्ट्रसंत भगवानबाबा, राष्टसंत तनपुरे बाबा, सद्गुरू गव्हाणे बाबा, तारकेश्वर गडाचे महंत नारायण बाबा. याच तालुक्याचे भूमिपुत्र. अशा महान संत -महंतांनी पुनीत झालेल्या या भूमीचे नाव हिमालयासह सातासमुद्रापार नेण्याचे काम याच संतांमुळे झाले आहे. या भूमीला अनन्य महत्व प्रात्प झालेले आहे.

वृद्धेश्वराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी मच्छींद्रनाथांच्या समाधानासाठी गुरू आज्ञा म्हणून येथे खूप मोठा भंडारा झाला होता. त्या निमित्ताने मच्छींद्रनाथ व गोरक्षनाथांनी नाथ पंथाचा मेळा जमवला आणि गहिनीनाथांना उपदेश केला. गोरक्षनाथांनी गहिनीनाथास अनुग्रह दिला, त्यावेळी त्रिभुवनातील सर्व देवता ऋषीमुनी, संन्यासी सर्व एकत्र जमले. या ठिकाणी गर्भगिरी पर्वत आहे. गोरक्षनाथांनी सुर्वण सिद्ध मंत्राचा वापर करत संपूर्ण गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला. गुरू मच्छीद्रनाथांनी सुवर्ण डोंगर कुबेराला अर्पण करत वृद्धेश्वर येथे 33 कोटी देव साधू, संत-महंत. ऋषीमुनी आदी सर्व देवदिकांना महाप्रसाद देण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार महाप्रसाद भंडारा होऊन महादेव-पार्वतीने ब्राम्हण वेषात प्रकट होऊन पंगती वाढल्या. देवराईपर्यंत देवाच्या रांगा जेवायला बसल्या म्हणून तेथील स्थानाला देवराई हे नाव पडले देवाच्या पंगतीत महादेव वृद्ध म्हतार्‍याचे रूप घेऊन जेवत होते. सर्व देवानी विनंती केली की, हे महादेवा आता हे रूप घेतले, आम्हाला याच रुपात दर्शन दिले; तुंम्ही याच रूपात विश्व कल्याणासाठी येथेच राहावे, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. नाथांनी व सर्व देवांनी विंनती केल्यावर महादेव वृद्ध रूपात राहीले म्हणून त्यांना म्हतारदेव (वृद्धेश्वर) म्हणू लागले. वृद्धेश्वरचे शिवलिंग स्वयंभू असून शिवलिंगाजवळ 12 ज्योतिर्लिंग गुप्त रूपात असल्याचे म्हटले जाते. महाशिवरात्रीला हे शिवलिंग वृद्धींगत (वाढते) होते, असे म्हटले जाते. राजा रामदेवराय यांनी अकराव्या शतकात मंदिराला मोठी पितळी घंटा अर्पण केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. संत ज्ञानेश्वर, साईबाबा यासारख्या महान संतांनी येथे भेट दिल्याचा उल्लेख विविध धर्मग्रंथात आहे.

संक्रातीनिमित्त येथे अखंड सौभाग्य समृद्धी, संतती भाग्य, सौख्य आरोग्य प्राप्तीसासाठी महिला भक्तीभावाने येतात. पार्वती मातेची जिल्ह्यातील फक्त वृद्धेश्वर देवस्थानात यात्रा भरते, असे हे वृद्धेश्वरचे स्थान आहे.

– विलास मुखेकर/ अरविंद आरखडे

- Advertisment -

ताज्या बातम्या